सकाळी सकाळी बातमी कळली... रविराज गेला! माझा विश्‍वासच बसेना! रविराज म्हणजे, कृषीवलमधील सहकारी मित्र! त्याच्या अशा ऐन तारुण्यातील ‘एक्झिट’ने काही क्षणासाठी मीसुद्धा निःशब्द झालो. एकदम धक्काच बसला. कसला विचित्र नियतीचा खेळ हा! ‘असं व्हायला नको हवं होतं’. पण, नियतीला काहीतरी वेगळंच पसंत होतं. ही घटना म्हणजे सारं अटळ, सारं असह्य, सारं खोटं असावं, असं वाटण्याइतकंच खरं! भयानक सत्य. नियतीचा खेळ वगैरे तत्त्वज्ञान ठिक आहे; पण, माझं मन अजूनही हे सत्य स्वीकारायला तयारच नव्हते!

मागील पंधरा दिवस कोरोनावर मात करुन ठणठणीत बरा होणारा आमचा हा धैर्यवान गडी. एक-दोन दिवस आड त्याच्याशी तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी बोलणे व्हायचेच! परवासुद्धा जेव्हा मी फोन केला, तेव्हा तोच म्हणाला, आता मी बरा आहे, आणि उद्यापासून ऑफिसला येणार आहे! पण, आता त्याच्या जाण्याने त्याचा उद्या कधी उजाडणारच नाही! गेल्या आठवड्यातच त्याच्या प्रकृतीत अतिशय चांगली सुधारणा होऊन या आठवड्यापासून तो ऑफिसला येणार असल्याची चांगली बातमी त्यानेच स्वतः मला दिली. या चांगल्या बातमीचा आनंद घेत असतानाच मंगळवारी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि सारं काही संपलं! रविवराज म्हणजे, सकारात्मक ऊर्जेचा एक वाहता झरा, मनमिळाऊ, प्रेमळ स्वभाव, सगळ्यांना जिंकून घेणारा, उत्तम खवय्या (स्वतः वेगवेगळे पदार्थ बनविण्याची आवड असणारा) व स्वतःकडे असणारे ज्ञान दिलखुलासपणे हातचे काहीएक न ठेवता दुसर्‍याला देणारा असा हा एक आगळावेगळा अवलिया. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची जिद्द नेहमीच त्याच्यात जाणवत असे. कोणतेही काम असो, विषय रविवराजकडे गेल्यास त्याचा तो पाठपुरावा करणारच! ऑफिसात वरिष्ठांनी एखादी जबाबदारी त्याच्यावर टाकली, की ते काम पूर्ण करण्यासाठी सकाळपासून ऑफिसात येऊन बसत असल्याचे मी त्याला अनेकदा पाहिलं आहे. मग त्या कामाच्या पूर्ततेसाठी तो एकनिष्ठ असे. तो मला कायम म्हणायचा, आपल्याकडून 100 टक्के देण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा! तेव्हाच ते काम पूर्णत्वास जाते. मित्रा, फक्त ते शब्दच राहिलेत रे आज आठवणी म्हणून! आज तू निघून गेलास मित्रा, पण ही मनाला चटका लावून जाणारी बातमी पचवणं थोडं अवघडच जाणार आहे. आयुष्य जगण्याचा मार्ग खडतर आहे, पण त्या खडतर वाटेवर हसत-खेळत चालत जाऊन पुढे सरकायचं असतं, असंही तू सांगायचास!

मला जास्त काळजी वाटते ती सर्वात जवळच्या असणार्‍या आई-वडिलांची, आयुष्यभरासाठी साथ देणार्‍या त्या पत्नीची, बाबा-बाबा म्हणणार्‍या त्या दोन लहान लेकरांची, की ज्यांचा बाबा आता त्यांना कायमचा सोडून गेलाय. ज्या आईने नऊ महिने जीवाचा आटापिटा करुन त्या लेकराला जन्म दिला, ते लेकरु अचानक त्या माऊलीला सोडून निघून गेलं! काय वाटलं असेल त्या माऊलीला. पोटचा गोळा ज्या मातेने गमावलाय तिचे हे दुःख शब्दात मांडताही येऊ शकत नाही. किती काळजाला पिळवटून टाकणारी ही गोष्ट. असा प्रसंग कोणावरही न येवो! अर्धांगीनी म्हणून सर्व सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी राहिलेली पत्नी, तिने संसाराची पाहिलेली गोड स्वप्ने... सर्व सर्वकाही एका क्षणात कुस्करुन गेले आहे. दोन जीवांचे अतूट नाते, ‘त्याच्या’ अकाली जाण्याने गळून पडले आहे. हा मोठा धक्काच आहे. देवा, हां कसला न्याय..? जन्माला येणारा प्रत्येकजण एकटा येतो आणि एकटाच निघून जातो; हे सत्य मलाही पटतंय. पण, रवी तुझे असे जाणे, म्हणजे सर्वांच्या काळजावर आघातच म्हणावा लागेल.तू आता आमच्यासोबत नाही, ही गोष्ट मन अजून स्वीकारत नाही. पण, सत्य हेच आहे, की एक सच्चा सहकारी अगदी अचानक कोणत्याही प्रकारचा आस भास नसताना सर्वांचा निरोप घेऊन गेलाय, आपल्या आठवणी ठेवून. तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि हे पहाडाएवढे दुःख सहन करण्याची तुझ्या कुटुंबियांना ताकद मिळो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना!

 

अवश्य वाचा