Monday, March 08, 2021 | 08:18 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण
रायगड
20-Jan-2021 06:58 PM

रायगड

  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून भारतानं ही मालिकाही जिंकली. कोट्यावधी भारतीय या इतिहासाचे साक्षीदार झाले.एकाअर्थी भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरणच केलं आहे.ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये 33 वर्षांपासून कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारताने ही कसोटी तीन विकेट्सनी जिंकली. या मैदानावर मागील 32 वर्षांपासन अजिंक्य असणार्‍या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव भारतानं चाखायला लावली आहे.धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघानं नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.याआधी 236 ही सर्वोत्तम धावसंख्या होती.भारतानं हा विक्रम मोडीत काढला.ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे खेळायचे याच्या कक्षा आपण आणखी रुंदावल्या. आपण दुखापत आणि अनिश्‍चिततेला संयम आणि आत्मविश्‍वासाने प्रत्युत्तर दिले.भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन कसोटीचा विजय हा आतापर्यंतचा पाठलाग करताना तिसरा सर्वात मोठा विजय आहे. भारताने ब्रिस्बेन कसोटी विजयासह अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत ही प्रत्येकासाठीच अभिमानाची गोष्ट आहे.त्यातील हा एक विक्रम खूपच महत्त्वाचा आहे.भारताने एका दिवसात ऑस्ट्रेलियाविरोधात 324 धावा काढून एक नवा विक्रम केला. तसेच 328 धावांचा पाठलाग करत तिसरा मोठा विजय आपल्या नावावर केला. यापूर्वी धावांचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिज विरूद्ध 1976 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर 4 विकेट गमावून 406 धावा काढल्या आणि विजय मिळविला. त्यानंतर 32 वर्षांनी 2008 मध्ये चेन्नई कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडच्या 387 धावांचा पाठलाग करताना 4 गडी गमावले होते. यात त्यांनी 98.3 षटकांचा सामना केला होता. आज ब्रिस्बेन कसोटीचा विजय मिळविण्यासाठी भारताने 97 षटके आणि सात गडी गमावून 329 धावा पूर्ण केल्या. या विजयाचे अनेक शिल्पकार होते. त्यात रिषभ पंत नाबाद 89 धावा, शुभमन गील 91 धावा, चेतेश्‍वर पुजारा 56 धावा,शार्दुल ठाकूर 67 धावा,वॉशिंग्टन सुंदर 65 धावा,मोहम्मद सिराज 5 विकेट,शार्दुल ठाकूर 4 विकेट असे योगदान होते.ऑस्ट्रेलियाचा या मैदानावर झालेला गेल्या 32 वर्षातला हा पहिलाच पराभव आहे.विजयासाठी दुसर्‍या डावात 328 धावा करण्याचं लक्ष्य भारतापुढे होतं.ते भारतीय फलंदाजांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.भारताच्या दुसर्‍या डावात शुभमन गिलनं 91 धावांची उपयुक्त खेळी केली.मात्र विजयाचा खरा शिल्पकार रिषभ पंत ठरला.त्यानं नाबाद 89 धावांची अविस्मरणीय खेळी केली. चेतेश्‍वर पुजारानं 56 धावांचं योगदान दिलं.या संपूर्ण सामन्यात भारतीय संघानं आपल्यातला उत्साह आणि क्षमतांचं दर्शन घडवलं. भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकला आहे.या सामन्याआधी टीम इंडियाने 6 कसोटी सामने खेळले होते, त्यातील 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता आणि एक अनिर्णित राहिला होता. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतरही भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर कसोटी मालिका जिंकली,ही अभिमानाची बाब आहे.संयम राखत भारताच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. भारताच्या या विजयाबद्दल प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री सार्‍यांनीच संघाचे अभिनंदन केले.विशेष म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर अभिनंदनाचा वर्षावच झाला.विराट कोहलीनंतर संघाचे नेतृत्व करणारा खिलाडी सापडला,अशा प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिला.एकूणच भारतीय संघाप्रमाणेच अजिंक्यनेही इतिहास रचला.मराठमोळया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही पराभव पाहावा लागला नाही. अजिंक्य रहाणेनं 2018 मध्ये  अफगाणिस्तान विरोधात पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं.रहाणेच्या नेतृत्वातील पाचही सामन्यात भारतीय संघ अजिंक्यच आहे.गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने कधीही पराभव बघितला नाही.या स्टेडिअममध्ये सलग 28 कसोटी सामने जिंकण्याचा मान कांगारुंना होता.मात्र त्याचं गर्वहरण करीत भारतीय संघाने कांगारुला जबरदस्त हादरा दिला.क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. त्यामुळे हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील. भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top