गुंतवणूक कुठे करायची याबाबत अनेकजण संभ्रमात असतात. सुरक्षित गुंतवणूक म्हणून कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. गुंतवणूक करण्यासाठी गाठीशी पैसेच असणं गरजेचं आहेच, पण चांगला पर्यायही उपलब्ध असावा लागतो. कमाई अशा ठिकाणी गुंतवावी लागतेे, जिकडे सर्वाधिक परतावा मिळेल. तसंच ही गुंतवणूक सुरक्षितही असायला हवी. या गुंतवणुकीवर लागणार्‍या करावरही लक्ष असणं गरजेचं असतं. म्हणूनच गुंतवणुकीची नवनवी कवाडं वारंवार तपासून बघावी लागतातच, पण बारकाईने माहिती घेऊन तुलनाही करुन बघावी लागते. त्यानंतरच सुरक्षित गुंतवणुकीचं ब्रीद साध्य करता येतं. या दृष्टीने पाहता आजघडीला काही वेगळे पर्याय तपासून बघता येतात.

अलीकडच्या काळात यासंदर्भात लिक्विड फंडचा पर्याय उत्तम मानला जातो. लिक्विड फंडमध्ये बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळतं तसंच पैसेही सहज काढता येतात. मागच्या वर्षामध्ये लिक्विड फंडमधून नऊ टक्क्यांपर्यंत व्याज मिळालं आहे. एफडी आणि आरडीवर मिळणार्‍या व्याजापेक्षा हा दर जास्त आहे. लिक्विड फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या गुंतवणुकीमध्ये धोका कमी असतो तसंच लॉक ईन पिरियड नसल्यामुळे गुंतवणुकीच्या दुसर्‍या दिवशीही पैसे काढता येतात. याच मालिकेत काही टपाल योजनांचा पर्यायही तपासून पाहता येतो. आज बँकेतल्या मुदत ठेवींवरील व्याजदर कमी होत असताना पोस्टातल्या योजनांच्या व्याजदरामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. बँकेमध्ये सध्या सहा ते सात टक्के व्याज मिळत असताना पोस्टाच्या काही योजनांमध्ये 7.9 टक्के व्याज मिळत आहे. त्यामुळे नऊ वर्षांमध्ये गुंतवणूक दुप्पट होऊ शकते. त्याचप्रमाणे बँकांमध्ये जास्तीत जास्त सात टक्के व्याज मिळत असताना सरकारी बाँड्समधून 7.8 टक्के व्याज मिळत असल्यामुळे बँकेच्या तुलनेत सरकारी बाँड्समधली गुंतवणूक लवकर दुप्पट होते.

कोरोनाच्या संकटकाळात सामान्य नागरिकांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, अजूनही करावा लागत आहे. या काळात जशी पैशांची चणचण भासली, तशी परिस्थिती भविष्यात येऊ नये, यासाठी छोट्या स्तरावर बचत करणं आवश्यक आहे. अशा वेळी टपाल खात्याची छोटी बचत योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या बँकांच्या एफडीमधून मिळणार्‍या व्याजाचा दरही कमी होत असल्यामुळे पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममधून बँकांच्या मुदत ठेवीपेक्षा चांगला परतावा मिळत आहे. यामध्ये पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. त्याचबरोबर यामध्ये जमा केल्या जाणार्‍या पैशांवर सॉव्हरेन गॅरंटी देखील आहे. पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट खातं ही योजना छोट्या बचतीसाठी फायद्याची आहे. या खात्यामध्ये एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. फायदा असा आहे की या ठिकाणी बँकांच्या तुलनेमध्ये मुदत ठेवीवरील व्याजदर सुमारे 1.40 टक्क्यांनी जास्त आहे. देशातली सर्वात मोठी बँक असणार्‍या एसबीआयमध्ये पाच वर्षांच्या एफडीवर 5.3 टक्के वार्षिक व्याज आहे तर पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेचं वार्षिक व्याज 6.7 टक्के आहे. अशी तुलना करून सुरक्षित गुंतवणूक आणि जादा परताव्याचा विचार करून गुंतवणूक करता येईल.

अधिक सुरक्षित आणि जादा परतावा देणारी गुंतवणुकीची संधी म्हणून पीपीएफमधल्या गुंतवणुकीकडं पाहिलं जातं. फक्त त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीची तयारी असावी लागते. प्रत्येक तीन महिन्यांनी सरकारकडून पीपीएफ खात्यावर व्याजदर निश्‍चित केला जातो. सध्या पीपीएफवरील व्याजदर 7.1 टक्के असून पीपीएफ खात्याचा कालावधी 15 वर्षं आहे. पीपीएफ हा एक लोकप्रिय दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. या गुंतवणुकीच्या पर्यायात गुंतवणूकदारांना प्राप्तिकरात तीन स्तरांवर सूट मिळते. प्रथम गुंतवणुकीच्या वेळी, त्यानंतर व्याज उत्पन्नावर आणि नंतर परिपक्वतेच्या रकमेवर. पीपीएफ गुंतवणूकदारांना उच्च व्याजदर देते. कोणताही प्रौढ भारतीय नागरिक पीपीएफ खातं उघडू शकतो. एखाद्या प्रौढ व्यक्तीकडून अल्पवयीन व्यक्तीच्या वतीनंही पीपीएफ खातं उघडता येतं. अल्पवयीन मुलाच्या वतीनं त्याचे किंवा तिचे पालक पीपीएफ खातं उघडू शकतात; परंतु दोन्ही पालक एकाच अल्पवयीन मुलासाठी वेगवेगळं पीपीएफ खातं उघडू शकत नाहीत. पीपीएफ खात्यात एकरकमी किंवा 12 हप्त्यांमध्ये गुंतवणूक करता येते. पीपीएफ खात्यात दर वर्षी किमान पाचशे रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तसंच एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. एखाद्या गुंतवणूकदारानं आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत किमान पाचशे रुपयांची गुंतवणूक न केल्यास वर्षाकाठी 50 रुपये दंड आकारला जातो. पीपीएफ परिपक्वता रक्कम, व्याज उत्पन्न, पीपीएफवरील कर्ज आणि इन्स्टंट पीपीएफ पैसे काढण्याची रक्कम मोजण्यासाठी गुंतवणूकदार पीपीएफ कॅल्क्युलेटर वापरू शकतात.

कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना आपल्याला जादा परतावा मिळवण्यासाठी बारीक अभ्यास करावा लागतो. सध्या बँकांच्या सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना कमी परतावा मिळणार आहे. टपाल खात्यात सध्या नऊ लहान बचत योजनांच्या माध्यमातून चार ते सात टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळवता येतो. त्यामध्ये 15 वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)चाही समावेश आहे.

टपाल खात्याची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे आपण घरबसल्या बरेच पैसे कमवू शकतो. तसे, टपाल कार्यालयात पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि आर्वती जमा योजनेसह अनेक योजना आहेत; परंतु मासिक उत्पन्न योजना ही एक विशेष योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणं फायदेशीर आहे. सध्या टपाल कार्यालयात मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळतं. या योजनेंतर्गत एकूण जमा रकमेमध्ये वार्षिक परतावा जमा केला जातो. ठेवींवरील एकूण परतावा वार्षिक आधारावर निश्‍चित केला जातो; पण मासिक आधारावर बारा भागात विभागल्यास आपल्याला मासिक उत्पन्न किती मिळालं, हे उमगतं. अधिकृत आकडेवारीनुसार मार्चमध्ये डाक जीवन विम्याचे 64.62 लाख आणि अडीच कोटी सक्रिय ग्राहक होते. डाक जीवन विमा सुविधा सरकारी आणि निमशासकीय कर्मचार्‍यांना उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या कर्मचारी व व्यावसायिकांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातले रहिवासी सामान्य नागरिक, दुर्बल घटक आणि महिला कामगारांना विमा संरक्षण देणं हे ग्रामीण टपाल जीवन विमाचं उद्दीष्ट आहे.

 

अवश्य वाचा