बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्याशी वैचारिक मतभेद असल्याने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केली आहे. गंमत म्हणजे, त्याच वेळी भाजपशी कोणतीही कटुता नसून, निकालानंतर भाजपबरबरच मैत्री करणार असल्याचंही या पक्षाने जाहीर केलं आहे. लोकजनशक्ती हा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतला घटक पक्ष असून बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजप युतीमध्ये भागीदार होता. नीतीशकुमार यांचं नेतृत्व मान्य नसल्यानेच एलजेपीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी रालोआमध्ये कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. भरीस भर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही पासवान यांनी विश्‍वास, प्रकट केला आहे. चिराग यांचे वडील, एलजेपीचे संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. एके काळी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मंडल राजकारणात ते आघाडीवरील नेते होते. व्हीपींचे उजवे हात आणि सामाजिक न्यायाची मशाल घेतलेले रामविलासजी डाव्या आणि पुरोगामी नेत्यांचे डार्लिंग होते. परंतु अटलबिहारी वाजपेयी यांच्या रालोआत ते सामील झाले आणि भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. कधी लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर, तर कधी त्यांच्या विरोधात असा त्यांचा संधिसाधू एक्स्प्रेसमधून प्रवास सुरू आहे.

येत्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जदयू-भाजपच्या विरोधात लालूंचा राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांची आघाडी झाली आहे. अगोदर या निवडणुका दुरंगी होतील असं वाटत होतं, पण आता त्या तिरंगी होतील, अशी चिन्हं आहेत. एलजेपीच्या या घोषणेमागे भाजपचा हात असल्याची शंका जदयूला आहे आणि तो अंदाज बरोबरही आहे. कारण एलजेपी जदयूविरोधात उमेदवार उभे करणार आहे, भाजपच्या विरोधात नाही. लालू तुरुंगात आहेत. त्यांच्या आघाडीत अगोदरच बेकी आहे. लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचं नेतृत्व अनेकांना मान्य नाही. ते आणि त्यांचा भाऊ तेजप्रताप यांचं फाटलं आहे. त्यामुळे आपला रस्ता साफ आहे, असे मांडे नीतीशकुमार मनातल्या मनात खात होते. परंतु आता ते सावध झाले आहेत. गेले काही महिने चिराग नीतीश यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे उद्या नीतीश यांनी एलजेपीची रालोआमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी करून मान्य करून घेतली, तरीदेखील चिरागची पुढची दिशा स्पष्ट आहे. बिहारमध्ये आपल्या पक्षाची किती ताकद आहे, हे त्यांना आजमावायचं आहे आणि निवडणुकीत नीतीशचा पराभव करणं ही चिरागची मनीषा आहे. एलजेपीच्या या डावपेचांना प्रदेश भाजप नेत्यांचा सुप्त पाठिंबा आहे. आम्ही किती दिवस नीतीशकुमार यांच्या मागे राहून तुतारी वाजवणार, दुय्यम भूमिकेत राहणार असा त्यांचा सवाल आहे. निवडणुकीत जदयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू शकेल. 2015 मध्ये नीतीश यांनी काँग्रेसप्रणीत यूपीएला अचानक आलिंगन दिलं, लालूंशी दोस्ताना केला आणि दोन वर्षांमध्यच रालोआबरोबर फुगडी खेळायला सुरुवात केली.

या पार्श्‍वभूमीवर बिहारमध्ये चांगल्या जागा मिळूनही महाराष्ट्राप्रमाणे सत्ता गमावावी लागू नये, ही भाजपची इच्छा आहे. मात्र बिहारमध्ये कोणतीही समीकरणं जुळू शकतात. फक्त भाजप आणि काँग्रेस किंवा राजद आणि भाजप एकत्र येऊ शकणार नाहीत. 2006 मध्ये एलजेपीने राजदच्या विरोधात 178 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. खरं तर राजद आणि एलजेपी हे दोघंही दिल्लीत यूपीए किंवा संपुआ सरकारमध्ये सहभागी होते. रामविलास यांनी पाचर मारल्याने, लालूंची बिहारमधली 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. त्यावेळी एलजेपीने बारा टक्के मतं मिळवून 29 जागा पटकावल्या. यावेळी याच प्रकारची पुनरावृत्ती होऊन एलजेपीने जदयूला फटका दिल्यास, नीतीशकुमार यांना ङ्गचिराग कहाँ रोशनी कहाँफ असं म्हणत घरी जावं लागेल. 2005 मध्ये लालूंच्या विरोधात जेवढी ङ्गअँटी इनकम्बन्सीफची लाट होती, त्यापेक्षाही अधिक जोरदार लाट आज नीतीश यांच्याविरोधात आहे. आम्हाला नीतीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी आणायचं नाही, असा पण नागरिकांनी केला असल्याची जळजळीत टीका चिराग यांनी केली आहे. नीताशकुमार यांनी जनतेसाठी कवडीचंही काम केलेलं नाही. त्यांना फक्त सत्तेवर टिकून राहण्यात रस आहे, असंही चिराग यांनी म्हटलं आहे. दीर्घकाळ रालोआमध्ये जदयूबरोबर राहूनही एलजेपीला या सर्व आक्षेपांचा साक्षात्कार ऐन निवडणुकीच्या वेळी झाल्याचं दिसतं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ङ्गडबल इंजिनफचं म्हणजेच भाजप-एलजेपीचं सरकार येईल, असा त्यांचा आडाखा आहे.

2013 मध्ये नीतीशकुमार यांनी रालोआला राम राम ठोकला होता. कारण तेव्हा भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं होतं. आपल्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचं जतन करण्यासाठी लबाड नीतीशकुमार यांनी हे पाऊल उचललं. त्यावेळी जदयूबरोबर जायचं की भाजपबरोबर, हे एलजेपीला ठरवायचं होतं. तेव्हा एलजेपीने भाजपची साथ करण्याचा निर्णय घेतला. चिराग पासवान यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. तेव्हापासून आपण मोदींचं समर्थन करत असून नीतीशकुमार यांच्याप्रमाणे सतत भूमिका बदलत नाही, असं चिराग यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत भाजप पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा डाव खेळत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा उद्योग भाजपने केला. तोच प्रयोग भाजप बिहारमध्ये जदयूवर करत आहे. निवडणुकीनंतर बिहारमधली राजकीय समीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, त्याचे पडघमही आता जाणवू लागले आहेत. चिराग पासवान यांची आक्रमक भूमिका एका बाजुला दिसत असतानाच दुसर्‍या बाजुला बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात दलित नेत्याच्या हत्येमुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दलित नेता शक्ती मल्लिक यांची हत्या केल्याचा आरोप सत्ताधारी संयुक्त जनता दलाने केला आहे. एका राजकीय षड्यंत्रात दलित नेत्याची हत्या झाली आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. या दलित नेत्याच्या पत्नीने तेजस्वीवर खुनाचा आरोप केला आहे. दलित नेत्याच्या हत्येचा पूर्वीचे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दलित नेते शक्ती मल्लिक यांनी आपला खून होण्याची भीती व्यक्त केली होती. तेजस्वी यादव आपल्याला ठार मारतील, असं त्यांनी म्हटलं होतं. राष्ट्रीय जनता दलाकडून विधानसभा निवडणुकीचं तिकिट न मिळाल्यामुळे शक्ती मल्लिक यांनी काही दिवसांपूर्वी बंडखोरी केली. त्यांना राष्ट्रीय जनता दलातून काढून टाकण्यात आलं होतं. मलिक यांच्या पत्नी खुशबू यांनीही तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि अनिल साधू यांच्यावर पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. तेजस्वी यादव यांनी शक्ती यांना निवडणुकीचं तिकिट देण्यासाठी पैसे मागितले आणि ते न दिल्यामुळे त्यांचे पती राणीगंजमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत होते, असं त्यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या वेळी अशी राजकीय हत्या अत्यंत संवेदनशील असल्याचं संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अजय आलोक यांनी म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांच्यावरील खुनाच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दलित नेत्याकडून तिकिटासाठी पन्नास लाख रुपये मागितले गेले. त्यांना अपमानित करून पक्षातून काढून टाकण्यात आलं, आधी त्याचं शोषण केलं गेलं आणि नंतर त्यांना ठार मारण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय जनता दलात सामंती व्यवस्था आहे. दलित आणि मागासलेल्या लोकांना तिथे किंमत नाही, असा आरोप संयुक्त जनता दल करत आहे.

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलानेही संयुक्त जनता दलाच्या आरोपांना उत्तरं दिली. तेजस्वी यादव यांच्याविरूद्ध सत्ताधारी कट रचत आहेत, षड्यंत्र रचणार्‍यांना या वेळच्या विधानसभा निवडणुकीत बिहारचे लोक चोख प्रत्युत्तर देतील, असं या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते चितरंजन गगन यांनी म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांची लोकप्रियता पाहून संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे ही मंदळी राष्ट्रीय जनता दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच वेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष राघवेंद्र कुशवाह म्हणाले की व्हिडिओ व्हायरल होत असताना सरकार आणि प्रशासन काय करत होतं? शक्ती मलिक यांच्या मृत्यूची भीती असताना प्रशासन हातात हात घालून का बसलं? या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, त्यांचा भाऊ तेजप्रताप यादव, अनिलकुमार उर्फ साधू यादव, कालो पासवान, मनोज पासवान आणि सुनीता देवी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक झाल्यास त्यांना निवडणुकीत प्रचार करता येणार नाही. त्याचं भांडवल निवडणुकीत दोन्ही बाजूंनी होईल, असं चित्र पहायला मिळत आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त