कृषी  क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी भरीव कार्य विविध पातळींवर केले जात आहे.  शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून त्यासाठी महिलांचाही प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी महिलांना आधुनिक तंत्रज्ञान देवून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिकाचे आयोजन, विविध कृषी  निविष्ठांची खरेदी करणे, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे, साठवणूक आणि पणन कार्यामध्ये तसेच कृषी  पुरक व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी महिलांसाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके तसेच इतर आधुनिक कृषी  विस्तार माध्यमांचा वापर केला जात आहे.

या सर्व बाबींचा अवलंब करूनही आजही महिलांचा सहभाग पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. कारण आजही महिलांसमोर सामाजिक, आर्थिक, कौटुंंबिक आणि इतरही अनेक प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांचा विचार करून महिलांसाठी विविध कार्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे.

ग्रामीण महिलांच्या अडचणी

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण महिला कौटुंबिक जबाबदारी मुळे पाहिजे त्या प्रमाणात पुढे येत नाहीत. तसेच आजही महिला पारंपारिक तंत्रज्ञानामध्ये अडकल्याने त्यांना नवीन तंत्रज्ञान अवलंबनाची तसेच नवीन उद्योगाचा अवलंब करण्यासाठी मानसिक दृष्टया तयार होत नाही. कारण त्यांचा बाहेरच्या जगाबरोबर कमी संपर्क येत असल्यामुळे बाहेरचे होणारे बदल याबाबत त्वरीत माहिती मिळत नाही. तसेच व्यवसाय करण्याबाबतच्या दूरदृष्टीचा अभावामुळे महिलांना उद्योजक बनण्यात अडथळे येतात. आहार आणि आरोग्याबाबतही आजही ग्रामीण महिलांमध्ये मोठया प्रमाणात जुन्या चालिरिती/अंधश्रध्दा आणि गैरसमज आहेत. महिलांना एखादा उद्योग करावयाचा किंवा एखादे तंत्रज्ञान वापरावयाचे वाटले तरी त्यासाठी त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता कमी असते. तसेच त्यांना शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये आणि स्वयंरोजगाराबाबतच्या तंत्रज्ञानाचीही माहिती असते. तांत्रिक मार्गदर्शन घेण्यासाठी लांब अंतरावर जाण्यास उत्सुक नसतात. तसेच जास्त कालावधीच्या प्रशिक्षणासाठीही उपस्थित राहू शकत नाही. शासनाच्या योजनांची पुरेपुर माहिती नसल्याने या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता महिलांनी संघटीत होऊन कृषी  अन्न कृषी  पूरक व्यवसायामध्ये सहभाग वाढविण्याची गरज आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेवून पुढील काळात हाती घ्यावयाच्या योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे.

आहार आणि आरोग्यदायी जीवन

आज आहार आणि आरोग्याबाबत समाजामध्ये जागृती निर्माण होत आहे.  विशेषत: सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. चांगला आहार मिळाला तर आरोग्याचे अनेक प्रश्‍न सुटू शकतील. महिला आणि कुटुंबातील माणसांचा आहार यांचा जवळचा संबंध आहे. याचा विचार करून महिलांना आहार आणि आरोग्यावर विशेष भर देण्याची गरज आहे. घरच्या घरी यासाठी अनेक बाबी महिला करू शकतात. आहाराच्या दृष्टीने भाजीपाला, फळझाडांची लागवड करून त्याचे सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेतले तर चांगला आहार घरचेघरी मिळू शकतो. त्यासाठी काही प्रमाणात जमिनीवर त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आज काही औषधी वनस्पती आहेत त्याचा किरकोळ आजारावर उपाय करण्यासाठी बाजारातून औषधे विकत आणण्याऐवजी बागेत लागवड केलेल्या औषधी वनस्पतीपासून औषधे तयार करून घरचे घरी उपचार करता येईल, परंतु याकरिता पारंपारिक ज्ञान शास्त्रीय दृष्टीकोन लक्षात ठेवून अवगत करणे महत्वाचे आहे. यामुळे पैशाची बचत होईल तसेच आहार आणि आरोग्याचा महत्वाचा प्रश्‍न सुटेल.

परसबागेतील कुक्कुटपालन आणि शेळीपालन

आज ग्रामीण महिलांच्या दृष्टीने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला फार महत्व आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्याचे काम शेळी-कोंबडीच्या विक्रीतून होत असते. परंतु हा व्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने केल्यास त्यापासून जास्त फायदा होतो. स्थानिक कोंबड्या, शेळयांच्या प्रतिमध्ये सुधारणा करून त्यांचे पालनपोषण केल्यास महिलांना यापासून चांगले उत्पन्न होऊ शकते. विविध शासकिय/अशासकिय संस्थामार्फत चांगल्या प्रतिच्या कोंबड्या आणि शेळयांबाबत सल्ला आणि सेवा मिळू शकते.

मालाची एकत्रित उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री

 आज ग्रामीण महिलांचा भाजीपाला उत्पादनामध्ये महत्वाचा वाटा आहे. काही ठराविक भाजीपाल्याची, फुलांची फळझाडांची लागवड करून मिळालेले उत्पादन जसेच्या तसे किंवा त्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करून त्याची विक्री करणे, कडधान्याच्या डाळी तयार करणे, फळांवर प्रक्रिया करणे, भाजीपाला प्रक्रिया करणे, शेवया, कुरडया, पापड, लोणचे यासारखे पदार्थ तयार करणे, मसाला तयार करणे यासारख्या अनेक व्यवसायाद्वारे महिला चांगल्या प्रकारे अर्थाजन करू शकतात. अर्थात यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. दुग्धव्यवसायामध्येही महिलांचा मोलाचा वाटा आहे. दुधाचे शीतकरण करणे आणि पिशवीमध्ये पॅक करून विकणे किंवा दुग्धजन्य पदार्थ बनविणे यासारखे व्यवसायही महिला संघटित होऊन करू शकतात.

गांडूळखत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य किटकनाशके, बीजोत्पादन यासारखे शेतीला आवश्यक निविष्ठांच्या निर्मितीमध्ये महिला पुढाकार घेऊ शकतात. गावातील गरजांचा विचार करून त्याचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्रीव्दारे महिलांना चांगल्या प्रकारे अर्थाजन होवू शकते.  

बिगर शेती व्यवसायातून स्वयंरोजगार निर्मिती

 शहरी भागाप्रमाणेच आज ग्रामीण भागातही राहणीमानामध्ये बदल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजांमध्ये बदल झाला आहे. या गरजांचा विचार करून ग्रामीण भागातील तरूणी अनेक व्यवसाय करू शकतील. वेशभूषा, केशभूषा तसेच राहणीमानातील बदलामुळे आज अनेक सेवा-सुविधांची गावामध्ये गरज निर्माण झालेली आहे. फॅशन डिझायनींग, डे्रस डिझायनींग, ब्युटी पार्लर, आरोमा थेरपी सेंटर, बेकरी युनिट, ग्रामीण हस्तकला, स्वेटर तयार करणे, सॉप्ट टॉईज तयार करणे यासारखे अनेक व्यवसाय ग्रामीण युवती सुरू करू शकतात. त्यातून चांगले व्यवसाय गावातल्या गावात सुरू होवू शकतात. काही वस्तू ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये विकू शकतात. यासाठी भांडवलाची गरज लागेल. हे भांडवल बचत गटाद्वारे तसेच वित्तीय संस्थांमार्फत मिळू शकते. महिलांच्या पतसंस्था किंवा सहकारी संस्थाही याद्वारे स्थापन होऊन शकतात. ग्रामीण भागामध्ये कृषी, कृषीपूरक व्यवसाय तसेच बिगर शेती व्यवसायातून मोठया प्रमाणात महिलांना स्वयंरोजगार मिळू शकतो. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळूनही महिला यासारख्या व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात. महिला आर्थिक दृष्टया स्वयंपूर्ण झाल्यास एकूणच कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये महिलांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

शिक्षण व सामाजिक बाबी

महिलांमधील शैक्षणिक पात्रता वाढल्यास त्याचा सामाजिक सहभाग वाढण्यास निश्‍चित मदत होईल. त्यासाठी त्याचा प्रथम सामाजिक सहभाग वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांसाठी असणा-या योजनांचे ज्ञान घेूवन इतर विभागाशी त्यांचे संपर्क साधून उपलब्ध योजनेचा फायदा घेवून शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये भविष्यकाळात फायदा होवू शकतो.

 महिलांमध्ये नेतृत्व विकास

ग्रामिण महिलांमध्ये नेतृत्व विकास करणे ही काळाची गरज आहे. कारण महिलांमध्ये हा विकास झाला तर कुटुंबाचे नेतृत्व, व्यवसायाचे नेतृत्व तसेच सामाजिक, आर्थिक कार्यातील नेतृत्व महिलांच्या सर्वांगिण विकासास सहाय्यभूत ठरेल.  हे नेतृत्व तयार झाल्याशिवाय महिलांचा विकास आणि सक्षमीकरण अशक्य आहे. त्यासाठी महिलांनी पुढे येवून प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरीहिरीने सहभाग घेतला पाहिजे.

बचत गटाचे कामकाज / कार्यपध्दती

महिलांचे बचत गट सुरळीत न चालणे किंवा बंद पडणे विशेषत: दारिद्रय रेषेखालील गट यामध्ये महत्वाची बाब म्हणजे योजनेबद्दल जागृकता किंवा योग्य प्रबोधनाचा अभाव ही कारणे आहेत. सर्व बाबींची उपलब्धता होवूनही कार्यक्रम योग्य प्रकारे राबविला जात नाही. परिणामत: बचत गट बंद पडतात किंवा गटाचे पाहिजे ते उद्देश साध्य होत नाहीत. म्हणून बचत गट स्थापन करताना तसेच सुरू असताना बचत गटाच्या कार्याबद्दल पूर्णपणे जागरूकता असणे गरजेचे आहे.  बचत गटाचे कार्य करत असताना बचत गटाचे विविध स्वभावाच्या, वेगवेगळया कौशल्य, गुण असणा-या महिला एकत्रित आलेल्या असतात. त्यांच्यामधील कला गुणांचा अभ्यास करून त्या गुणांना चालना देण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या आवडीनुसार कामाची जबाबदारी द्यावी. तसेच त्यांच्या कला गुणांचा सर्वासमोर गौरव करावा. याचा उपयोग त्यांच्याबरोबर गटालाही होतो. तसेच गटामध्ये कायम नवनवीन विषय चर्चेत येवून गटाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मदत होते. या सर्व बाबींचा व्यवस्थित विचार करून चांगला कार्यक्रम तयार केला तर बचत गटाव्दारे महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि मानसिक विकास होवून कुटुंब आणि गावाचा विकास होईल.

विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार)

कृषी विज्ञान केंद्र, रोहा-रायगड

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त