Thursday, December 03, 2020 | 12:47 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

आयटीमधल्या कारकिर्दीच्या नव्या वाटा... डॉ.दीपक शिकारपूर
रायगड
28-Oct-2020 07:12 PM

रायगड

करिअर हा शब्द आजच्या तरुणाईच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे, हे आपण पाहतोच. करिअर या शब्दाचं  ढोबळमानाने भाषांतर उपजीविकेसाठी केलेले काम किंवा व्यवसाय  असं होत असलं तरी एखाद्याच्या एकंदर जीवनशैलीच्या आणि मुख्य म्हणजे जीवनपद्धतीच्या संदर्भात या शब्दाचं नव्हे, तर संकल्पनेचं वजन निश्‍चितच जास्त भरतं. करिअर म्हणजे काय? घेतलेल्या शिक्षणाचं प्रतिबिंब? मिळवलेला पैसा किंवा स्थान? आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने मिळणारं मानसिक समाधान? हे आणि असे आणखीही पर्याय प्रत्येकालाच सुचतील. मात्र व्यावहारिक पातळीवर पाहता केलेल्या कामातून मिळणारं उत्पन्न हाच निकष बहुसंख्य प्रकरणांमध्ये पाळलेला आढळतो. याच मार्गाने करिअर या संकल्पनेचा विचार केला आणि जरा मागे वळून पाहिलं तर गेल्या शतकात म्हणजे सन 2000 च्या जरा आधीपर्यंत इंजिनिअर होणं ही बहुतेकांची महत्त्वाकांक्षा असे (म्हणजे ती आजही आहे परंतु तिचे संदर्भ बदलले आहेत) असं म्हणता येईल. परंतु एकविसाव्या शतकाची सुरूवातच आपणा सर्वांचे जीवन व्यापणार्‍या संगणक आणि संगणकाधारित प्रणालींनी झाली आणि इच्छुकांना करिअर करण्यासाठी नवा पैलू, नवं क्षेत्र सापडलं, ते म्हणजे कॉँप्युटर!

कॉँप्युटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन आणि या तिघांचं जमलेलं त्रिकूट यासारख्या घटकांमुळे वर म्हटल्याप्रमाणे  महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनात फरक पडला. खाजगी व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांबरोबरच गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये सरकारी विभागही संगणकीय सेवा-सुविधांवर चालू लागल्याने आणि त्या पुरवूही लागल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्र उर्फ आयटी सेक्टर  मध्ये प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता भासली. इलेक्ट्रनिक इंजिनिअर तर सोडाच तुलनेने अगदीच प्राथमिक पातळीवरचे संगणकीय अभ्यासक्रम पास होणार्‍यांनाही, थोड्या-फार उमेदवारीनंतर, नोकर्‍या सहज मिळत राहिल्या. महत्त्वाचं म्हणजे (करिअरच्या इतर पारंपारिक पर्यायांच्या मानाने) आयटीमध्ये बहुतेक सर्वांनाच अगदी सुरूवातीपासूनच भरपूर पगार मिळू लागला! (पगाराला पॅकेज असं संबोधण्याची लाटही बहुधा आयटीमधूनच उगम पावली असावी) परिणामी, करिअर म्हणजे आयटी असं नवं समीकरण प्रस्थापित झालं. या बाबीला आता पंधरा-वीस वर्षं झाली...

...आणि या गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग  म्हणजेच बदल हीच सर्वात पायाभूत बाब आहे या वाक्प्रचाराचा विसर पडू लागला. संगणकीय विश्‍व खरं तर इतक्या झपाट्याने बदलत आलं आहे की जुनं तंत्रज्ञान किंवा पद्धत कालबाह्य होण्याचा वेग (याला रोलओव्हर पीरिअड असं नाव आहे) इथे सर्वाधिक आहे. काही बाबतीत तर अक्षरशः गेल्या महिन्यातल्या प्रणालीची जागा या महिन्यात हाती आलेलं नवतंत्रज्ञान घेत आहे. अर्थात इतके क्रांतिकारी बदल अत्युच्च पातळीवरच होत असले तरी कधी ना कधी ते शेवटच्या स्तरापर्यंत झिरपणारच ना. आता तीच वेळ संगणकीय क्षेत्रांमध्ये तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणार्‍या बहुतेकांवर येऊ घातली आहे आणि यामागचं मुख्य कारण आहे ऑटोमेशन म्हणजेच स्वयंचलित प्रणालींचा वाढता वापर.    

ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रातल्या सध्याच्या हजारो नोकर्‍या येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये संपुष्टात येऊ शकतात. उदा. आज सॉफ्टवेअर टेस्टिंग या क्षेत्रात अनेकजण काम करतात. त्याचप्रमाणे सिस्टिम इंजिनिअरिंग, डेटा एंट्री, सर्व्हर मेंटेनन्स यासारख्या कामांसाठीही प्रशिक्षित मनुष्यबळ वापरलं जातं. परंतु या क्षेत्रांवर ऑटोमेशनचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. या सर्व कामांमध्ये नवकल्पना वापरण्याची किंवा स्वतःची अंगभूत प्रतिभा आणि सर्जनशीलता दाखवण्याची वेळ येत नाही. कारण तशी गरजही नसते. अशी (लेबर स्वरूपाची) कामं माणसांऐवजी स्वयंचलित प्रणालींकडून करवून घेण्याकडे कंपन्यांचा कल राहील. अर्थात ऑटोमेशनमुळे सगळ्यांवरच घरी बसण्याची पाळी येईल, अशी भीती बाळगण्याचं बिलकुल कारण नाही. उद्योग-व्यापार आणि व्यवसायामध्ये नवी क्षेत्रं कायमच खुली होत असतात. आयटी या नियमाला अपवाद नाही. सायबर सुरक्षा, क्लाउड काँप्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा यासारख्या क्षेत्रांमध्ये अनेक नवीन नोकर्‍या किंवा कामं उपलब्ध होतील असं दिसतं. संबंधित क्षेत्रांमध्ये या बदलाची चिन्हं जाणवतही आहेत. आता सॉफ्टवेअर टेस्टिंगचं काम त्या प्रणालीद्वारेच आपोआप केलं जाऊ शकतं. यामुळे काम झटपट आणि अधिक अचूकतेने होतं असं दिसलं आहे. यापुढे या ऑटोमेशनचं प्रमाण वाढतच जाईल.   प्रत्यक्ष प्रोग्रॅमिंगशी संबंधित असलेल्या नोकर्‍यांवरही, बदलत्या आणि अधिक प्रमाणात वापरल्या जाणार्‍या स्वयंचलित तंत्रांमुळे, परिणाम होईल. दैनंदिन, न बदलत्या व किंचित एकसुरी प्रकारच्या कामांचा मोठा हिस्सा उरकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्त प्रमाणात केला जाईल. यामुळे सध्या आयटी कंपन्यांना मिळणार्‍या कामांच्या आणि कंत्राटांच्या पद्धतीत, प्रमाणात आणि स्वरूपात येत्या पाच-दहा वर्षांमध्येच मोठे बदल होतील. नव्याने येणारी कामं आणि प्रकल्प मुख्यतः  बिग डेटा, क्लाउड कॉँप्यूटिंग, सायबर सुरक्षितता अशा क्षेत्रांमधली असतील. तरीदेखील, संगणकीय क्षेत्राला आणि त्यामधल्या प्रणालींनाच चिकटून राहूनही, बदलत्या जमान्याला अनुरूप असे करिअरचे अनेक पर्याय समोर आहेत आणि पुढे येऊ शकतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 1990 च्या दशकात संगणकांचा वापर सुरू झाला तेव्हाच अनेकांनी संगणक आले, आता हजारो-लाखो कारकुनांचं काय होणार, त्यांच्या नोकर्‍या जाणार असं बर्‍यापैकी काळं आणि त्यावेळी पुष्कळच खरं भासणारं चित्र उभं केलं होतं. त्याचं काय झालं?

संगणकीय यंत्रणा चालवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी आज तितकेच नवे रोजगार इतर क्षेत्रांमधून उपलब्ध झाले. उलट, संगणकीय प्रणालींच्या वाढत्या वापराने अनेकांना नव्याने नोकर्‍या मिळाल्या. खरं तर कोणतंही नवं तंत्रज्ञान आलं की त्या पूर्वीच्या यंत्रणांनी त्यावर हरकत घ्यायची हा जगाचा नियमच राहिला आहे. अगदी शंभर वर्षांपूर्वी टांगे जाऊन मोटारी आल्या तेव्हापासून! किंबहुना, मोटारीही ङ्गअसेंब्ली लाइनफवर मिनिटाला एक या वेगाने तयार होऊ लागल्या तेव्हा अमेरिकेत हाच गदारोळ झाला होता. परंतु त्यानंतर कार्सच्या तत्कालीन तीन मोठ्या उत्पादकांना विविध सेवा पुरवूनच हजारो उद्योग वर आले. तंत्रज्ञानाशी थेट संबंध नसलेल्या क्षेत्रातही हीच सनातन शंका घेतली गेली आहे. .

थोडक्यात काय, बदलत्या जमान्याची पावलं ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणार्‍या, नवनवीन कौशल्यं शिकत राहणार्‍या आणि अर्थातच थोडा वेगळा उर्फ हटके विचार करणार्‍या कोणत्याही व्यक्तीवर किंवा उद्योगावरही   आता कसं होणार, अशी भीती बाळगायची वेळ येत नाही.  

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top