गेल्या काही वर्षांमध्ये आपण सातत्याने तंत्रक्रांती अनुभवत आहोत. संगणक आणि मोबाईलच्या क्षेत्रात सतत नवनवे शोध लागत असून, ही संपर्कसाधनं आपलं जगणंच नाही तर विचार करण्याची दिशाही बदलून टाकत आहेत. विशेष म्हणजे बँकिंग, आरोग्य, संदेशवहन, मार्केटिंग आदी बाबतीत रोजच्या आयुष्यातले जगण्याचे आयाम ही साधनं बदलून टाकत आहेत. म्हणूनच यापुढील काळात आणखी एक मोबाईलक्रांती पाहायला मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये. या लगबगीत आपली विचारपद्धत बदलून टाकायचीही क्षमता आहे. तशी ती आता प्रत्ययाला येऊ लागली आहे. काल-परवापर्यंत आपल्याला मोबाईलची वैशिष्ट्यं, त्यामध्ये समाविष्ट असणारी रोजच्या जगण्याला उपयुक्त ठरणारी तंत्रं आकृष्ट करत होती. आता परिस्थिती त्यापुढे गेली असून, मोबाईलची जागा घेणार्‍या स्मार्टफोनची क्षमता, विशेषत: हा स्मार्टफोन हाताळू शकत असलेली आव्हानात्मक कामं यामुळे सामान्यजन नवनव्या कवाडांना स्पर्श करु लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्मार्टफोन आणि त्यावर दररोज नव्याने मिळू शकणारी हजारो अ‍ॅप्स उर्फ अ‍ॅप्लिकेशन्स याबाबत फारसं काही सांगायची गरज नाही. या अ‍ॅप्समध्ये गेम्स, शब्दकोश, नकाशे इत्यादीपासून औषधोपचारांपर्यंत वाट्टेल त्या बाबीचा समावेश असू शकतो, हेदेखील आता बहुतेकांना माहीत आहे. अगदी परग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेण्याचीही सोय या अ‍ॅप्समध्ये आहे. या प्रोग्रामचा वापर करून कोणीही, अगदी तुम्हीसुद्धा एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल लाइफचा मागोवा घेऊ शकता. ङ्गसर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल इंटेलिजन्सफ नामक अमेरिकन अवकाश तंत्रज्ञान विभाग प्रसिद्ध आहे. इंडिपेंडन्स डेसारख्या हॉलिवूडपटांत याचा वारंवार उल्लेख आढळतो. संगणकांना फारसं काम नसेल तेव्हा जगभरातून सुमारे 30 लाख व्यक्ती हा उद्योग करत असतात. टाइमपास तर होतोच आणि त्यादरम्यान खरोखरीच काही सापडलं तर...

जगभरातल्या हजारो-लाखो संगणकांची सुप्त कार्यक्षमता उर्फ स्पेअर कपॅसिटी  वापरून, हौशी व उत्साही व्यक्तींच्या सहभागाद्वारे, एखादी दीर्घकालीन शोधप्रक्रिया राबवण्याची ही संकल्पना कॅलिफोर्निया विद्यापीठाने आयबीएम या संगणक-उत्पादक कंपनीशी सहयोग करून चालवली आहे. गणित, पदार्थविज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवरसायन-विज्ञान (बायोकेमिस्ट्री) यासारख्या विषयांमधल्या किचकट संशोधनकार्यावर प्रक्रिया करण्यासाठी जगभरातल्या संगणकांचा उपयोग करून घेतला जातो. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलण्याच्या या क्रियेला क्राऊडसोर्सिंग  असं नाव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची दुनिया फारच वेगाने बदलली. पीसी प्रकारच्या संगणकांचा खप कमी होऊ लागला आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम शास्त्रज्ञ आणि विद्यापीठांना जाणवू लागला. क्राऊडसोर्सिंग करण्यासाठी त्यांना पुरेसा ङ्गक्राऊडफ मिळेना. काळाची पावलं ओळखून त्यांनी स्मार्टफोनधारकांकडे आपलं लक्ष वळवलं. परिणामी, संगणकांची जागा लवकरच स्मार्टफोन घेणार असं दिसू लागलं आहे. आज विविध गुणदर्शना मध्ये सेलफोनने संगणकाला मागे टाकलं आहे, हे नक्कीच. सेलफोनमध्येच एक परिपूर्ण संगणक जाऊन बसल्याने हे झाले आहे. शिवाय, संगणकांपेक्षा स्मार्टफोन्सची संख्या जास्त आहे आणि आकार व किंमत कमी. संगणक चालवण्यास जरा घाबरणार्‍या तसंच अगदी निरक्षर व्यक्तीदेखील स्मार्टफोन लीलया वापरतात, हे आपण दररोज पाहतोच. अगदी नव्वदीतल्या आजींकडेदेखील स्मार्टफोन असू शकतो. मग ती भारतातली असो, युरोपातली असो वा आफ्रिकेतली. तर अशा या अब्जावधी स्मार्टफोनधारक स्वयंसेवकांचा वापर परग्रहांवरील जीवसृष्टीपासून दुर्धर रोगांवरील इलाज शोधण्यापर्यंत करणं शक्य आहे.

अशा कामासाठी बोइंक आणि सिऍटल ही दोन अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ही अँड्रॉइड ओएसवरून चालवता येतात. यामध्ये विविध प्रकल्पांची यादी दाखवली जाते आणि त्यापैकी आपल्या पसंतीच्या प्रकल्पासाठी आपल्या स्मार्टफोनची सुप्त कार्यक्षमता वापरण्याची परवानगी आपण देऊ शकता. सिऍटल हे अ‍ॅप गूगलच्या प्ले स्टोअरवर मिळू शकतं. विद्यार्थी-संशोधकांना बरेचदा संस्थेतले महासंगणक वापरणं परवडत नाही. अशांना स्मार्टफोन्सची प्रक्रिया-क्षमता मिळवून देण्यासाठी सिअ‍ॅटल प्रयत्न करतं. आयबीएमच्या बोइंकचं काम फोन चार्ज होत असताना चालतं; ज्यायोगे वापरकर्त्याच्या दैनंदिन कामात अडथळा येत नाही. सिअ‍ॅटल हे अ‍ॅप संबंधित फोनशी जुळवून घेत सतत काम करू शकतं. या प्रक्रिया करण्यासाठी फोनची दहा टक्क्यांपेक्षा जास्त बॅटरी वापरली जात नाही. सध्या या अ‍ॅप्सबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. परंतु, अ‍ॅपलच्या नवीन आयफोन आणि आयपॅडमुळे यांचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे.

हे काहीही असलं तरी, संगणकांच्या तुलनेमध्ये, स्मार्टफोनची प्रक्रिया-क्षमता म्हणजेच प्रोसेसिंग पॉवर अगदीच कमी असते. मूलतः अशा तर्‍हेच्या वितरित कार्यप्रक्रियेसाठी (वाइड एरिया डिस्ट्रिब्यूटेड कॉम्प्युटिंग) स्मार्टफोनची रचना केलेली नसते. सध्याचे टॉप-ऑफ-द-लाइन स्मार्टफोन्स दर सेकंदाला सुमारे दीड अब्ज सांख्यिकी प्रक्रिया करू शकतात  तरीही अत्याधुनिक पीसीच्या प्रक्रिया-क्षमतेच्या मानाने हे प्रमाण फक्त 25 टक्के आहे! अर्थात, यामध्ये सुधारणा करण्याचं काम वेगाने सुरु आहे. इंटेल, एनवीडिया, एएमडी यासारख्या मातब्बर कंपन्या स्मार्टफोनमधल्या मायक्रोचिपची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भरपूर पैसा खर्च करत आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात मोबाइल फोनमधल्या हार्डवेअरची प्रगती सर्वात जास्त राहील असं दिसत आहे. कारण, क्राऊडसोर्सिंगमध्ये स्मार्टफोनधारकांना सामील करणं आता अपरिहार्य बनलं आहे. जगभरात दर वर्षी स्मार्टफोन्सचा खप 20 ते 25 टक्क्यांनी वाढतो आहे. (2022 पर्यंत दरवर्षी पाच अब्ज फोन्स विकले जातील, असा अंदाज आहे) मोठा संगणक न घेता चांगला फोन खरेदी करणार्‍यांची संख्यादेखील वाढणार आहे. स्मार्टफोन्सची अतिशय मोठी संख्या असलेलं एखादं नेटवर्क बनवल्यास त्याची कार्यक्षमता अ‍ॅमेझॉन डॉट कॉमची बरोबरी करू शकेल असं शास्त्रज्ञांना वाटतं.

अशा फोन-नेटवर्कला खर्च कमी येईलच; शिवाय त्याचा वापर, शुद्ध संशोधनाबरोबरच सामाजिक कार्यासाठीही करून घेता येईल. उदाहरणार्थ सांसर्गिक रोगाच्या प्रतिबंधासाठी जगभर लसीकरण केलं जातं. तसेच विविध आरोग्य-कार्यक्रम, विशेषतः विकसनशील देशांमध्ये राबवले जातात. त्यासंबंधीच्या माहितीचं विश्‍लेषण करणं किंवा त्यावर प्रक्रिया करणं स्मार्टफोन्सच्या महाजालाला सहज शक्य होईल. इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्डचा वापर स्मार्टफोन्सद्वारे अधिक चांगल्या प्रकारे करणं शक्य होईल. विविध स्वयंसेवी संस्थांकडे जमा होणार्‍या माहितीचं वर्गीकरण (डेटा कॉम्प्युटेशन) करणंदेखील या मार्गाने शक्य आहे. क्लाऊड-कॉम्प्युटिंगमार्फत तसंच प्रत्यक्ष सर्व्हरवर डेटा ठेवण्यासाठी जगभरातल्या विविध कंपन्या सध्या दरवर्षी 100 अब्ज डॉलर्स खर्च करतात. स्मार्टफोन्सच्या महाजालात माहिती साठवणं आणि वापरणं यापेक्षा खूपच कमी खर्चात शक्य होणार आहे.

आयबीएमच्या नवसंशोधन (इनोव्हेशन) विभागाचे उपाध्यक्ष बर्नी मायरसन यांच्या म्हणण्यानुसार, लोक हौसेने नवनवीन स्मार्टफोन्स खरेदी करतात; परंतु दैनंदिन व्यवहारात या साधनाची एक टक्कादेखील कार्यक्षमता वापरली जात नाही. कल्पना करा  आत्ता या क्षणी जगभरातले काही अब्ज स्मार्टफोन्स, आपापल्या मालकांच्या शर्टच्या खिशात, काहीही काम न करता सुप्तावस्थेत बसले आहेत. या बाबीचा व्यावसायिक वापर करणं सहजशक्य आहे. गूगल आणि अ‍ॅॅमेझॉनसारख्या कंपन्यांनी क्लाऊड डेटा सेंटर (आभासी माहिती केंद्र) या संकल्पनेवर प्रचंड खर्च केला असून त्यांनाही स्मार्टफोन्सचं महाजाल तयार करण्यामध्ये रस आहे. त्यामुळे काय सांगावं, येत्या काही वर्षांमध्ये आपलाही स्मार्टफोन जागतिक पातळीवरील एखाद्या प्रकल्पात खारीचा वाटा उचलू शकेल...

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त