नवी दिल्ली

तसं पाहता, हे लिहून काहीच फायदा होणार नाही, याची मला पुरेपूर कल्पना आहे. कारण, जनतेच्या आक्रोशाला मान देऊन झुकण्याची नैतिकता तुमच्यात नाही. याआधी 18 वर्षांपूर्वी तुमच्या राजीनाम्याची मागणी गोव्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केली गेली होती. पण, त्यावेळी गोध्रा दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर  हिंदू मसिहाफ या तुमच्या जाणीवपूर्वक तयार केल्या गेलेल्या प्रतिमेखाली ती मागणी दाबली गेली. त्यावेळी तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता आणि पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी.  

पण, आज देशातील  विविध  महानगरांतून मजुरांचे तांडेच्या तांडे हजारो कि.मी. दूर असलेल्या आपल्या राज्याकडे पायी जाताना पाहिले आणि त्यांना तातडीने मदत करण्याऐवजी तुम्ही तुमच्या रबर स्टॅम्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या शब्दांचे हिंदी भाषांतरकार अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यामार्फत 20 लाख कोटींचे हवेतील बुडबुडे आर्थिक पॅकेजफ या नावाखाली देताना पाहिलं तेव्हा मात्र मला राहवलं नाही.

आणि, म्हणून या लेखरुपी पत्राद्वारे मी मागणी करत आहे, मोदी राजीनामा द्याफ.

543 सदस्यांच्या लोकसभेत 303 सदस्य तुमच्या पक्षाचे असताना आणि तुमच्या पितृ संघटनेचे, अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तुम्हाला एक हजार वर्षात लाभलेला पहिला हिंदू शासक म्हणत असताना, तुम्ही राजीनामा देण्याची सुतराम शक्यता नाही याची जाणीव असूनही ही मागणी करत आहे.

मोदी, त्या मजुरांकडे आणि त्यांच्या दुःखाकडे पाहून एक शासक या नात्याने तुम्ही कुठेतरी चुकलात याची जाणीव ठेवून तरी राजीनामा द्या. अनवाणी अन्नपाण्याविना लहान मुलांना, म्हातार्‍यांना कडेवर, खांद्यावर घेऊन चालणारे मजूर, वाटेत प्रसूत होणार्‍या त्यांच्या बायका यांच्यासाठी तातडीने गाड्यांची आणि अन्नपाण्याची सोय न करता तुम्ही घोषित करवून घेतलेलं पॅकेज म्हणजे  मुंगेरीलाल के हसिन सपनेफ किंवा लबाडाघरच्या जेवणाचं आमंत्रण असून, विविध योजनांद्वारे वर्ग करण्यात आलेली रक्कम पॅकेज या नावाखाली कर्जरुपाने दिली जात आहे, हे त्या अशिक्षित मजुराला कसे कळणार?

तातडीच्या मदतीची आवश्यकता असताना, ती न देता पुढील पाच वर्षांत होणार्‍या पुनर्वसनासाठी कर्ज देण्याची अजब आर्थिक नीती फक्त तुमच्यासारखे  हार्ड वर्किंगफ पंतप्रधानच अंमलात आणू शकतात हार्वर्ड शिक्षित अर्थतज्ज्ञ अशा चुका करू शकत नाही.

वाजपेयींना मोदींचा राजीनामा हवा होता  असे छातीठोकपणे सांगणारे नेते पक्षात आजही आहेत. त्यापैकीच संजय जोशींसारखे काही पक्षाच्या बाहेर फेकले गेले आहेत. स्तिफेकी पहल तो उनको करनी चाहीयेफ, असं खासगीत बोलणारे वाजपेयी भर पत्रकार परिषदेत तुम्ही बाजूला बसले असताना राजधर्माचं पालन करा, असा सल्ला देताना बरंच सांगून गेले. त्यावेळी तुम्हाला जिवाच्या आकांताने वाचवलं ते तुमचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी. ते तुमचे गुरू! पण, तुम्ही त्यांना गुरुदक्षिणा दिली राष्ट्रपतीपद नाकारून! अर्थात, हे संघ -भाजप संस्कृतीला नवीन नाही. स्व. बलराज मधोक, गोविंदाचार्य, जसवंतसिंह, संजय जोशी आणि प्रवीण तोगडिया हे संघाच्या अशाच राजकारणाचे बळी ठरले आहेत.

18 वर्षांपूर्वी तुमच्यावर आरोप होता गोध्रा ट्रेन हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीला कथित प्रकारे साथ देत वाढवण्याचा. अहमदाबादमध्ये गुलबर्ग सोसायटीत माजी खासदार एहसान जाफरीसह 40 जणांना जाळून मारण्यात आले होते. तुम्ही मुख्यमंत्री असून आणि दंगलीच्या ठिकाणापासून फक्त 22 कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीनगरमध्ये राहात असताना या दंगली थांबविण्याचा कथित प्रकारे योग्य प्रयत्न न केल्याचा आरोप केला गेला. दंगलीत अधिकृत माहितीनुसार, 790 अल्पसंख्याक, 254 बहुसंख्याक अशा एकूण 1044 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि यात आधी गोध्रा ट्रेनमध्ये जाळल्या गेलेल्या 58 कारसेवकांचाही समावेश होता. मी स्वतः दंगलीच्या काळात गांधीनगरमध्ये राहात होतो. आणि, या सर्व घटनांचं वार्तांकन केलं आहे.

तुम्ही त्यावेळी आधार घेतला स्व. राजीव गांधींच्या एका वाक्याचा. स्व. इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीला उद्देशून राजीवजी म्हणाले होते,  जब बडा पेड गिरता है तो धरती हिलती है!  राजीवजींचं हे वाक्य त्यावेळी समर्पक होतं. कारण, तेव्हा देशाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच सुरक्षा रक्षकाकडून झाली होती. पण, गोध्रा हत्याकांडात ते निश्‍चितच समर्पक नव्हतं. कारण, राम मंदिर हा विषय 1989च्या पहिल्या रथयात्रेपासून संघ परिवाराने लावून धरला आणि 1992ला कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती.

1528 साली बाबराच्या मीर बाकी नावाच्या सरदाराने अयोध्येत कथितरित्या राम मंदिर पाडून  बाबरी मशीद उभारली असेलही! पण, त्याचा सूड 464 वर्षांनंतर विज्ञान युगात मशीद पाडून घेणं आणि त्यासाठी आतापर्यंत सुमारे दहा हजार लोकांचा बळी जाणं हे असमर्थनीयच नव्हे, तर निंदनीय आहे. पण, आपल्या हातून घडलेल्या चुका दुसर्‍याच्या हातून घडलेल्या चुकांच्या मागे लपवायची आणि त्यासाठी इतिहासाची मोडतोड करायची संघ परिवाराची परंपरा तुम्ही चालू ठेवत आहात. आणि, म्हणूनच तुम्ही स्व. राजीव गांधींच्या वाक्याचा आसरा घेतला. 7 ऑक्टोबर 2001 पासून आपल्या हिंदूंचा तारणहार या प्रतिमेवर 13 वर्षे गुजरातवर तुम्ही राज्य केलं. त्या काळात तुम्ही पत्रकारांना वर्षातून केवळ एक किंवा दोन वेळा भेटत होतात. त्या दरम्यान झालेल्या चार निवडणुकीत  तुम्ही पत्नीच्या नावाचा कॉलम रिकामा ठेवला होता. पण, 2014 साली निवडणूक आयोगाने माहिती लपविल्यास उमेदवारी रद्द होईल, असा नियम केल्यानंतर मात्र तुम्ही कॉलममध्ये जसोदाबेन यांचं नाव लिहिलं. पण, हा प्रश्‍न तुम्हाला कोणी विचारूच शकल नाही. कारण, गेल्या सहा वर्षांत पत्रकारांशी तुम्ही एकदाही बोललेले नाहीत. स्वतंत्र भारताच्या 72 वर्षांच्या इतिहासात पत्रकारांशी न बोलण्याचा विक्रम केवळ तुमच्याच नावावर आहे.

तुमच्यानंतर आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री बनल्या. पण, त्यांचे पती प्रा. मफतलाल पटेल यांनी वाजपेयी आणि आडवणींना पत्र लिहून आनंदीबेन या कशा नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाखाली आहेत, याची तक्रार केली होती. संघ परिवाराला या सर्व गोष्टी कशा चालल्या आणि संघाच्या नीतीमत्तेत कशा बसल्या, हाही एक प्रश्‍नच आहे.

2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत मिळविले. हे बहुमत मिळविताना तुम्ही काळा पैसा परदेशातून आणू इथपासून प्रत्येक गरजूच्या बचत खात्यात 15 लाख रुपये देण्यापर्यंत अनेक घोषणा केल्या. अर्थात, त्यातील एकही घोषणा कधीही अंमलात आणली गेली नाही.

30 जानेवारीला भारतात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर लगेच जर तुम्ही आंतरराष्ट्रीय हवाई आणि सागरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असता, तर आज संपूर्ण भारताला लॉकडाऊन करण्याची वेळ आली नसती. राहुल गांधींनी कोरोनाकडे लक्ष द्या, असे फेब्रुवारी महिन्यातच सांगितले होत. पण, तुम्ही त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत नेहरु-गांधी कुटुंबाची बदनामी करण्यात मशगुल राहिलात. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आवभगत आणि मध्य प्रदेशात काँग्रेसच्या 22 आमदारांचे राजीनामे कथितरित्या 25 कोटींच्या मोबदल्यात घेण्यात आणि तिथे शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री बनवण्यात व्यस्त होता. सहा वर्षे हा सगळा अन्याय सहन केला जात आहे. आणि, तो अजून चार वर्षे चालेल या भीतीनेच मी ही मागणी केली आहे. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्याल ही अपेक्षा! न समजल्यास पुढील चार वर्षांत होणार्‍या वाताहातीला तुम्ही आणि तुमचा समर्थक परिवार जबाबदार असेल, याची जाणीव ठेवावी.

कळावे!

लोभ नाहीच!

कृपादृष्टी तर नकोच, पण वक्रदृष्टी तरी नसावी, ही अपेक्षा!

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!