जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव डॉ. आंबेडकरांच्या या विचारांनी प्रेरित झालेले अण्णाभाऊ साठे, अर्थात तुकाराम भाऊराव साठे हे अत्यंत असामान्य व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उदयाला आले. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे त्यांंचा जन्म झाला. शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊंची आज जयंती. अमानुष अन्याय यांच्या गर्देत पिचत पडलेला गावकुसाबाहेर वास्तव्य असणारा जो शोषित अस्पृश्य असा वर्ग होता/आहे, या वर्गाची वेदना संवेदनशीलपणाने अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसते. अस्पृश्य समाजातील साहित्यिक म्हणून अण्णा नेहमीच उपेक्षित राहिले. दलित साहित्यिक म्हणून त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही मानाचे पान मिळाले नाही. आर्थिक आणि सामाजिक पिळवणुकीविरुद्ध लढा देणारा हा साहित्यिक प्रकाशकांकडूनदेखील आर्थिकदृष्ट्या पिळला गेला. थोडक्यात, या समाजाने नेहमीच या असामान्य व्यक्तिमत्त्वाची उपेक्षा केलेली दिसून येते. ज्या गावात जन्म झाला, त्या वाटेगावानेदेखील अण्णांबद्दल काहीही केल्याचे दिसून येत नाही. जर अण्णा उच्चवर्णीय असते, तर मात्र गावाने नक्कीच काहीतरी केले असते. पण, अण्णांच्या बाबतीत जातीयवादाची भिंत कोणी फोडू शकले नाही. परंतु, या साहित्यसम्राटाने मान-अपमान याचा कधीही विचार न करता आपला वैचारिक लढा ज्वलंत ठेवला. स्वत:पेक्षा समाजहित त्यांच्या दृष्टीने प्रथमस्थानी होते. अण्णा या महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचीत असले तरी कथा आणि कांदबर्‍या हे साहित्य प्रकारही त्यांनी मोठ्या ताकदीने हाताळले. त्यांनी आपल्या साहित्यांची निर्मिती करत असताना 35 कांदबर्‍या, 8 पटकथा, 14 लोकनाट्य, 13 कथासंग्रह, 1 प्रवासवर्णन, 10 पोवाडे, 13 उपहासात्मक लेख व इतर अनेक प्रकारचे लेखन करुन प्रचंड साहित्याची निर्मिती केली. वास्तविक, अण्णा हे पूर्णपणे निरक्षर होते. अशा व्यक्तीने अशा प्रकारे लेखनातून अफाट साहित्याची निर्मिती करणे ही बाब चमत्कारापेक्षा कमी नाही. एवढेच नाही तर, त्यांनी निर्मिती केलेले साहित्य हे जगमान्य झाले. त्यांच्या चित्रा आणि फकिरा या कादंबर्‍या रशियन भाषेमध्ये भाषांतरित झाल्या. गुलाम, बरबाद्या, कुंजारी, बंडखोर, तात्या अशी अनेक त्यांची पुस्तके झेक, जर्मन, पोलिष या भाषांमध्ये अनुवादित झाली. त्यांच्या काही कथा, कांदबर्‍या गुजराथी, हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळी, बंगाली या भाषांमध्ये भाषांतरीत झाल्या आहेत. त्यांच्या फकिरा या कांदबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट कांदबरीचा पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या वैजयंता, आवडी, माकडाची चाळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकिरा या कादंबर्‍यांवर उत्कृष्ट मराठी चित्रपटांंची निर्मिती झाली असून, त्यामाध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश व सामाजिक भान देण्याचं काम केले गेले आहे.

अण्णाभाऊंवर म. फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचा त्या चळवळीच्या विचारांचा मोठा ठसा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेमहाराज, श्रीपतराव शिंदे, शंकरराव मोरे जवळकर, अण्णासाहेब जेधे या समाजसुधारकांच्या सामाजिक चळवळीतून प्रेरणा घेऊन परंपरावाद्यांनी जी विषमता निर्माण केली आहे, त्याविरोधात दलित बहुजन समाजाला उभे राहण्याचे बळ त्यांनी दिले. म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अण्णाभाऊ म्हणतात, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भिवराव.समाजातील दीनदुबळ्यांचा विकास करून त्यांना स्वाभिमानाचे जीवन जगायचे असेल तर अन्यायांनी बरबटलेले जग, अर्थात समाज बदलावाच लागेल. तो बदल डॉ. आंबेडकरांच्या विचारांतून झालेला असेल. म्हणून मानवमुक्तीचा लढा अविरतपणे प्रज्ज्वलित ठेवणारे महामानव डॉ. आंबेडकर हे खरे बहुजनांचे उद्धारक आहेत, हे अण्णाभाऊंना ज्ञात होते. त्याच विचारांचा वसा घेऊन अण्णा आपले समाजपरिवर्तनाचे काम करत राहिले.

कोणताही साहित्यिक जन्मजात प्रतिभावंत कधीच नसतो. त्याच्यात उपजतच असणारी संवेदनशीलता त्याला समाजाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते, आणि त्याच अंतरमनावर उमटलेले पडसाद त्याच्या लिखाणातून प्रेरित होऊन असंख्य वाचक वर्गाला अंतर्मुख होण्यास भाग पडतात. अण्णाचे साहित्यदेखिल यापैकीच एक असे म्हणावे लागेल. अण्णांनी इथल्या परंपरा, श्रद्धा, संस्कृती नाकारल्या नाहीत; पण काळाच्या ओघात संस्कृतीची विकृती निर्माण झाली. ती दूर करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी आपल्या साहित्यातून केला. अण्णाभाऊंच्या कांदबर्‍यांचे वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं, तर त्यांच्या कांदबर्‍यांतील बरीचशी पात्रं ही स्त्री आहेत; परंतु त्या पात्रांना त्यांनी शोषित कधीच दाखवले नाही, तर ती स्त्रीच त्या कांदबरीतील नायक दिसून येते. म्हणजे, त्यांनी स्त्रीला शोषित न मानता एक शक्तीशाली नारी म्हणूनच समाजापुढे उभी केली आहे. यावरुन अण्णाभाऊ हे स्त्रीला अबला न मानता सबला मानणारे आधुनिक विचारसरणीचे होते. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे वास्तववादी चित्रण हे अण्णांच्या लिखाणाचे वेगळेपण म्हणता येईल. त्यांच्या साहित्यात कल्पनाविलास, रंजकता अभावानेच दिसून येते, त्यामुळे असंख्य वाचकांना, साहित्यप्रेमींना त्यांचे लिखाण आकर्षित करते, त्यामुळे त्यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अद्वितीय आणि असामान्य असेच म्हणावे लागेल.

अण्णाभाऊंनी त्या काळातील गावकुसांबाहेर लाचारीचे जीवन जगणार्‍या शोषित, पीडितांचे दुःख आपल्या साहित्यातून समाजासमोर तळमळीने मांडून शोषणकर्त्या समाजव्यवस्थेला हादरा देणारे साहित्य जगासमोर आणले आहे. त्यांचे साहित्य हे खर्‍या अर्थाने परिवर्तनवादी असून ते अभ्यासले गेले पाहिजे, याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विद्यापीठाने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासनफफ सुरू करण्यात आले आहे. यावरुन त्यांंच्या साहित्याचा दर्जा व त्याचे मोल लक्षात येते. गालीब या प्रसिद्ध कवीने असे म्हटले आहे की, जीस खेतोंमे बारिश ना हो, तो वहाँकी फसले खराब होती है! और जीस समाज को अपना इतिहास पता ना हो, उसकी नसले बरबाद होती है। अर्थात, समाजाला आपल्या देशातील विचारवंतांचा, समाजसुधारकांचा, विरपुरुषांचा, लेखक, कवी यांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. कारण, त्यांचे बहुमूल्य विचार, त्यांनी दिलेले योगदान आपल्याला प्रेरणादायी ठरून त्याच प्रेरणेतून आपल्या हातून समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. म्हणून आपण ज्या महामानवांच्या, विचारवंताच्या जयंत्या-पुण्यतिथी साजरी करतो, तेव्हा त्यांनी दिलेल्या विचारांवर तो दिवस त्यांच्या विचारांचा पुनर्विचार दिवस म्हणून साजरा झाला पाहिजे, जेणे करून नवीन पिढीला त्यांच्या विचारांचा स्पर्श होऊन त्यामुळे नैतिकता, प्रामाणिकपणा आणि विचारी पिढी घडण्यास मदत होईल, म्हणून अण्णाभाऊंच्या आजच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आपण हे स्वच्छ मनाने समजून घेतले तर आजच्या तरुणांमध्ये प्रेरणादायी विचारांचा संचार होऊन सशक्त समाजव्यवस्थेचा सेतू निश्‍चितपणे बांधला जाईल. ज्याची गरज या देशातील सर्वांगीण प्रगतीसाठी आजही आहे.

अवश्य वाचा