भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यामध्ये बरेचदा रेपो दरांमध्ये कपात केली. यानंतर विविध बँकांनी मुदत ठेवींवरचे व्याजदर घटवले. सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदार मुदत ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवतो. आपला पैसा बँकेकडे सुरक्षित असल्याचा विश्‍वास त्याला वाटत असतो. या मुदत ठेवींवर ठराविक दराने व्याज मिळत राहतं. मात्र, व्याजदरांच्या कपातीनंतर मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय राहिलेला नाही. देशातल्या आघाडीच्या बँकांनी मुदत ठेवींवरच्या व्याजदरात मोठी कपात केल्यानंतर बचत खात्यावर मिळणारं व्याज आणि मुदत ठेवींवरचं व्याज यात फारसा फरक उरलेला नाही. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, काही लघु बँका तसेच खासगी क्षेत्रातल्या तुलनेने लहान बँकांचे बचत खात्यांवरचे व्याजदर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या मोठ्या आणि नावाजलेल्या बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येतं. अर्थात, लघु बँका तसेच छोट्या खासगी बँकांमधल्या बचत खात्यांमधल्या रकमेनुसार व्याजाचे दरही बदलतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या काही काळात रेपो दरांमध्ये सातत्याने कपात केली आहे. याच कारणामुळे विविध बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदर घटवल्याचं अर्थक्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गुंतवणूकदाराचं वय आणि गुंतवणुकीचा कालावधी या बाबी विचारात घेऊन बहुसंख्य बँका मुदत ठेवींवर चार ते सहा टक्के दराने व्याज देत आहेत. बचत खात्यांवर तीन ते पाच टक्के व्याज मिळतं. म्हणजे मुदत ठेवींवरचे व्याजदर फार जास्त नाहीत.

अधिक व्याज देणारे बचत खात्यांचे पर्याय सोडल्यास मुदत ठेवी आणि बचत खात्यांवरचे व्याजदर यात फारसा फरक नाही. बर्‍याच प्रसंगी हे व्याजदर सारखेच असल्याचं दिसून येतं, असं बँक बाजार डॉट कॉमचे सीईओ आहिल शेट्टी सांगतात. मात्र, फक्त व्याजदर कमी असल्याच्या एकमेव कारणामुळे गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांचा विचार करू नये. कारण सद्यःस्थितीत भांडवलवाढीपेक्षाही भांडवलाची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे ङ्गएफडी लॅडरिंगफसारखं तंत्र गुंतवणूकदारांना कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता गुंतवणुकीचे अधिकाधिक लाभ मिळवून देऊ शकतं. याआधी करून ठेवलेल्या मुदत ठेवींवर मुदत संपेपर्यंत किंवा नूतनीकरणापर्यंत ठरलेल्या दराने व्याज मिळेल. मात्र, आपला पैसा सुरक्षित ठेऊन अधिक व्याज मिळवायचं असेल, तर गुंतवणूकदार लघु बँका (स्मॉल फायनान्स बँक) किंवा खासगी क्षेत्रातल्या छोट्या बँकांमध्ये आपल्या ठेवी ठेवू शकतात. सार्वजनिक बँका तसेच खासगी क्षेत्रातल्या मोठ्या बँकांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरांच्या तुलनेत या बँकांचे व्याजदर 200 ते 300 बीपीएसने अधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या स्मॉल फायनान्स बँकांना आरबीआयने शेड्यूल्ड बँकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या बँकांमधल्या मुदत ठेवींना डीआयसीजीसीतर्फे देण्यात येणारं विमा संरक्षण मिळतं. यामुळे गुंतवणूकदारांचे पाच लाख रुपये सुरक्षित राहतात. त्यामुळे या स्मॉल फायनान्स बँकांमधल्या मुदत ठेवीही इतर शेड्यूल्ड बँकांमधल्या मुदत ठेवींप्रमाणेच पूर्णपणे सुरक्षित आहेत, याची नोंद घ्यायला हवी.

या मुदत ठेवींव्यतिरिक्त इतरही काही पर्याय आहेत. मात्र, या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी आर्थिक उद्दिष्ट, उत्पन्न, जोखीम घेण्याची तयारी, वय आणि रोख रकमेची गरज या बाबींचा आढावा घेणंही तितकंच आवश्यक आहे. जोखीम घेण्याची तयारी नसेल, तर भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि सुकन्या समृद्धी योजनेसारख्या लघु बचत योजनांचा विचार करता येईल. यासोबतच लिक्विड म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करता येईल. करबचतीच्या दृष्टीने लिक्विड म्युच्युअल फंड कॉर्पोरेट एफडीच्या तुलनेत अधिक लाभदायी ठरू शकतो. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करायची असेल, तर ङ्गसिपफच्या माध्यमातून आघाडीच्या इक्विटी म्युच्युअल फंडांचा पर्याय निवडता येईल. दीर्घकालीन गुंतवणुकीत मुदत ठेवींच्या तुलनेत इक्विटी फंड अधिक लाभदायी ठरू शकतात. अधिक जोखीम पत्करू शकणार्‍या गुंतवणूकदारांनी लघुकालीन गुंतवणुकीसाठी मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा देणार्‍या कमी कालावधीच्या डेब्ट फंडांचा विचार करायला हरकत नाही. त्यातच हे फंड कराच्या दृष्टीनेही लाभदायी ठरतात. 20 ते 30 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये मोडणारे गुंतवणूकदार तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या गुंतवणुकीसाठी या फंडांचा विचार करू शकतात.

बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदर कमी होत असताना आणि शेअर बाजाराच्या निर्देशांकात चढ-उतार होत असताना गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडांचा विचार करता येईल. गोल्ड ईटीएफने दरम्यानच्या काळात फार प्रभावी कामगिरी केली नसली, तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय खूप चांगला असल्याचं तज्ज्ञ सांगतात. स्टेट बँकेच्या कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर अवघं 2.9 टक्के दराने व्याज मिळत आहे, तर बचत खात्यावरचं व्याज 2.7 टक्के इतकं आहे. बँकांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात घसरण होत असताना स्थिर आणि चांगला परतावा देणार्‍या गोल्ड ईटीएफचा विचार करायला काहीच हरकत नाही. गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधली गुंतवणूक वाढवावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. गुंतवणूकदारांनी एकूण गुंतवणुकीपैकी पाच टक्के रक्कम गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवली असेल, तर यात वाढ करून 15 ते 20 टक्के रक्कम गुंतवण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या सोन्याच्या किंमती वधारत असल्यामुळे गोल्ड ईटीएफमधून चांगला परतावा मिळू शकतो. 2020 मध्ये सोन्यातल्या गुंतवणुकीतून 20  टक्के परतावा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याच्या किंमती प्रतिऔंस 1920 डॉलर्सचा आकडा गाठण्याची शक्यता आहे, तर 2021 मध्ये हा आकडा 2500 डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. म्हणूनच मुदत ठेवींचे दर कमी झाल्याने गोंधळून जायचं काहीच कारण नाही. सुरक्षित गुंतवणुकीचे इतर पर्यायही खुले आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे लोकांना स्वत:च्या हक्काच्या घराची गरज वाटू लागली आहे. भाड्याने राहणार्‍यांनाही स्वत:च्या घराचं महत्त्व समजलं आहे. परदेशस्थ भारतीयांनाही भारतात सुरक्षित निवारा हवा आहे. यामुळे येत्या काळात मालमत्तेची आणि त्यातही निवासी सदनिकांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मध्यंतरी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार जवळपास 65 टक्के लोकांना घर खरेदीसाठी सध्याचा काळ योग्य वाटतो. गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्तेच्या किंमती स्थिर राहिल्यामुळे सध्याच्या काळात घर खरेदी करता येईल, असं अनेकजणांचं म्हणणं आहे. त्यातच सध्या गृहकर्जावरचे व्याजदरही कमी आहेत आणि विकासक ग्राहकांना बर्‍याच सवलतीही देत आहेत. घर वेळेत देण्याचा लौकिक असणार्‍या विकासकांना येत्या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात ङ्गवर्क फ्रॉम होमफ ही संकल्पना लोकप्रिय होणार आहे. त्या दृष्टीनेही घराचं महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे मालमत्ता क्षेत्रातही बरेच बदल घडतील. नवतंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्तेच्या जाहिराती करण्यात येत आहेत. या सगळ्याचा परिणाम विक्रीवर होणार आहे. कोरोनामुळे बरंच काही बदललं आहे. मात्र, या सगळ्याचा मालमत्ता क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे, अनेकांना कोरोनामुळे जीवन विम्याचं महत्त्व पटू लागलं आहे. या महामारीआधी सुशिक्षित लोकही जीवन विमा काढण्यास टाळाटाळ करत असत. विमा संरक्षण घेतलं तरी कमी रकमेचं असायचं. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. कोरोनाने जीवानाची क्षणभंगुरता लक्षात आणून दिली आहे.