मी विनोबांना आश्रमात रोज नियमित भेटून दर्शन घेत असे. विनोबा कुटीत मी जयदेवभाईंना विनोबांच्या सेवेत कधी कधी आवश्यक तेव्हा मदतही करीत असे. मी आश्रम वातारवणाशी एकरूप झालो होतो. आश्रमाप्रतीची आत्मीयता माझ्या जीवनाचा पायाच आहे असे झाले. मला पवनार आश्रमात कोणीही वर्ग घेऊन शिकवले नाही, ते तेथील वातावरणातून प्रत्यक्ष मिळत गेले. यासाठी कसली तजवीज नव्हती. मी धाम नदीत आश्रमीय सहकार्‍यांसोबत स्नानाला जात असे. पाहून-पाहून पोहायला शिकलो. सायकलही येथेच चालवायला शिकलो. तिथे परधाम प्रकाशनात विनोबांच्या मराठी वाङ्मयाच्या प्रकाशनाचे काम चालते. तेथील काम पाहात-पाहात कंपोझिंग, पुस्तक शिलाई, फोल्डींग शिकायला मिळाले. जेवायला लागते तेव्हा रसोड्यात चपाती भाकरी, भाजी भात, वरण, नाश्ता-गोड सोजी, फिकी सोजी येथेच बनवायला शिकलो. शेती, गोशाळा, वृक्षवल्लीची जोपासना, संडास सफाई, पाण्याच्या टाकीची सफाई येथेच करायला मिळले. अशा कामात माझा वेळ जात असे. हीच कामे आपल्या घरी करणे व आश्रमात करणे यात खूप फरक आहे. आश्रमात ही कामे करताना वैज्ञानिक व आध्यात्मिक तसेच आरोग्यादायी दृष्टी येते. ही दृष्टी सर्वसामान्य समाजात न पोहचल्यामुळे परिश्रमाकडे पाहण्याची परिस्थिती वेगळी दिसते.  

तसेच गीताई, उपनिषद, वेद सर्वधर्माची व त्या त्या धर्मग्रंथांची धर्मपुरूषांची ओळखही येथेच झाली. शांतीमंत्र, जय जगत् या विश्‍वकल्याण मंत्राचा ध्वनी येथील वातावरणातून ऐकायला मिळाला. येथे आपपर भेद जाणवलाच नाही. सर्व समाजच माझा व मी समाजाचा आहे, समाजाच्या सेवेसाठी मी, ही भावना येथेच निर्माण झाली. विचार हे व्यक्तिगत जीवनात आचरणासाठी असतात. या सर्व गोष्टीची अनुभूती विनोबांकडून आश्रमात मला शिकायला मिळाली. यासाठी माझा कोणी वर्ग घेतला नाही. या शिक्षणामुळे मला कोणी याबाबत प्रमाणपत्र दिले नाही. त्या शिक्षणामुळे मला कोणी याबाबत प्रमाणपत्र दिले नाही. त्या शिक्षणामुळे मला ही कधी कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यकता पडली नाही. पुढे काम करताना बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या मुलांना दहा वर्षे शिकवले. दहावीला मी मराठी विषय शिकवायचो. मराठीचा शंभर टक्के रिझल्ट लागला. हे सर्व गांधीजींच्या नई तालिम व विनोबा शिक्षण विचार धर्तीवर स्वतःशाळा काढून केले. दोन ग्रंथालयाची स्थापना केली. ज्यावेळी दिव्यांगात शिक्षणाच्या सोयी व अधिकार नव्हते, त्यावेळी मूकबधीर, दिव्यांग मुलांसाठी विनोबा निवासी कर्णबधीर विद्यालयाची सुरूवात करून या दिव्यांग मुलांना पस्तीस वर्षांपूर्वी शिक्षणाचा मार्ग खुला करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आजपर्यंत सुमारे हजारच्यावर दिव्यांग विद्यार्थी शिकून आज समाजात स्वकर्तृत्वाने सर्वसामान्य समाजाच्या बरोबरीने राहून कुठेही कमी पडत नाहीत. कर्णबधीर मित्र पत्रिका चालवली. कुष्ठरोग्यांची सेवा करून आठशे कुष्ठरोगी रोगमुक्त झाले. झोपडपट्टीतील वंचित मुलांना शिक्षणाची आवड निर्माण केली. गांधी, विनोबा विचारांची पदयात्रा काढली. हे सारे केले, त्यासाठी प्रमाणपत्राची गरज लागली नाही.

एक-एकट्याने केलेल्या साधना मार्गाने आदर्श भारतात, तसेच जगभरात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. साधनेचा हाच पायंडा माहीत होता. परंतु, विनोबांनी साधनेत एकटे, व्यक्तिगत मर्यादा न ठेवता सामूहिक साधनेचे दर्शन करुन दिले. ही सामूहिक साधनेची जगाला विनोबांनी दिलेली सर्वोच्च अद्वितीय देणगी होय. या सामूहिक साधना आश्रमाचे नाव ब्रलविद्या मंदिर आहे. किती समर्पक नाव, किती भव्यता-दिव्यता आहे या नावात. येथे देशकार्यासाठी सर्वस्व समर्पित करणारे साधकब्रह्मचारी भगिनी या विद्येची आराधना साधना करतात. ही विद्या आत्मविकासाइतकीच राष्ट्रविकासाला मदत करते. सर्व ब्रह्मचारी भगिनी आपली श्रमिक कामे स्वतःच करतात. या सार्‍या भगिनींचा ताफा सार्‍या मानव कल्याणासाठी निःस्वार्थ भावनेने सामूहिक साधना आणि सेवेसाठी निघालेला आहे. विरक्ती आणि रसिकता, प्रीती आणि निष्कामता, भक्ती आणि ज्ञानघनता, शांती आणि तेजस्विता, प्रसन्नता आणि प्रेरकता, व्रतस्थ आणि मुक्त यांच्या उभ्या नि आडव्या धाग्यांनी विणलेले महावस्त्र म्हणजे त्यांची जीवनगाथा. सर्व जगाला देदीप्यमान अशी सामूहिक साधना या भगिनींची येथे चाललेली आहे. विनोबा हे जगाला गांधीजींमुळे मिळाले आणि आश्रम भगिनीमुळे विनोबा हे जगाला अधिकधिक कळले. या भगिनींचे हे महान ॠण कधीच न फिटणारे असे मोठे आहे. सारे विश्‍व कोरोना महामारीने व्याकुळ, भयावह परिस्थितीत सापडले असताना, विनोबा विचारप्रवाह या वेबिनारद्वारे लोकांना सेवेची प्रेरणा ऊर्जा देत आहेत. आश्रमात दरवर्षी दि. 15 ते 17 नोव्हेंबरला विनोबा महानिर्वाणदिनी मित्रमिलनाचा कार्यक्रम असतो. संबंध देशदुनियेतून अनेक सामाजिक कार्यकर्ते, सर्वोदयी कार्यकर्ते या भगिनींच्या सान्निध्यात विनोबा समाधीस्थळी पवनार आश्रमात एकत्र जमतात. चर्चा, विचारविनिमय करतात, जीवनकार्याची दिशा व प्रेरणाशक्ती घेतात. या भगिनींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात मला विनोबा पुण्यतिथीच्या कार्यक्रमात तयारीपासून सेवेची संधी मिळते. हे माझे परमभाग्य आहे. येथील वातावरण ही आश्रमभूमी विनोबांच्या वास्तव्यांनी मंत्रीत झालेली आहे. विनोबांच्या समग्र जीवनशास्त्राचे प्रत्यक्ष वास्तव दर्शन म्हणजे ब्रह्मविद्या मंदिर आश्रम आहे.

विनोबांनी समाजाला नैतिकतेत स्वतःबरोबर पुढं आणलं. त्यांनी हे अवघड काम लिलया केले. याचे सारे श्रेय पूर्वाश्रमीच्या थोर संत महापुरुषांना दिले. ते म्हणायचे, विनोबा हा संत महापुरूषांच्या खांद्यावर बसून आहे, त्यामुळे हे घडते. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मातृपितृवत प्रेम व विश्‍वास दिला. नुसतेच प्रेम दिले असे नाही, तर विचारांनीही पुष्ट केले. विनोबांचे समस्त जीवनच करुणेचे महासागर होते. सामाजिक, सांस्कृतिक जीवनातल्या जागा भरून येण्यासाठी, म्हणजे विनोबांचा वारसा पुढे चालविण्यासाठी अगणित ज्ञात असून, कार्यकर्ते आजही विनोबा विचार प्रवाहात कार्य करीत आहेत. विनोबांनी जीवनात आत्मबलाला महत्व दिले होते. विनोबांचे समस्त जीवन सत्य, प्रेम, करुणामय सेवा व ज्ञानपरायण अंहिसेच्या मार्गाचे होते. विनोबांच्या सत्संगतीचा लाभ मला पवनारला आश्रमात झाला आहे. युगानुयुगे चालणारे विनोबा पर्व, जय जगत् मंत्र विश्‍वऐक्याची प्रेरणा मानवाला देत राहणार आहे. हमारा मंत्र-जय जगत्! हमारा तंत्र-ग्रामस्वरज्य, हमारा लक्ष्य-विश्‍वशांती.

 

अवश्य वाचा