अमरच्या निधनामुळे महाराष्ट्राला लाभलेली पवार घराण्याची एक असामान्य कबड्डी परंपरा संपुष्टात आली आहे. कबड्डीतील परिपूर्णतेच्या सीमेवर अमरचे वडील राजाराम पवार आणि काका शिवराम पवार उभे होते. या दोन महान कबड्डीपटूंच्या घराण्यात अमरसारखं रत्न जन्माला यावं, हादेखील दुर्मिळ योगायोग. वडील आणि काकाच्या कबड्डीतील पुण्याईचा अमरला कधी आधार घ्यावा लागला नाही. स्वकर्तृत्वानं त्यानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पवार घराण्याचा कबड्डीतील लौकिक टिकवला-वाढवलाही.

अमर पवारचा तुफानी खेळ  अमर पवारच्या झंझावाती खेळामुळे मध्य रेल्वे विजयी, अमर पुवारच्या एकाच चढाईत 5 गडी बाद, अमर पवारच्या यशस्वी पकडीमुळे मध्य रेल्वेला सुवर्णचषक, अमरचा चमकदार खेळ, अमरच्या चौफेर चढाया. वृत्तपत्रांच्या क्रीडापानांवरील 1980-90 च्या दशकातले हे नित्यनियमांचे मथळे.  कारण, अमर ज्या मैदानावर उतरायचा, तिथे चढाई-पकडींच्या करामती करायचा. कधी अमर चढाईत चमत्कार करायचा आणि प्रतिस्पर्धी संघानं घेतलेल्या निसटत्या आघाडीचा सारीपाट उधळून लावायचा. तर, कधी नाजूक क्षणी प्रतिस्पर्धी संघाच्या हुकुमी खेळाडूची अफलातून पकड करायचा आणि बेमालूमपणे विजेतेपदाचा चषक हस्तगत करायचा.

चढाईत अमरनं जसा वडिलांचा वारसा उचलला, तसा पकडीच्याबाबतीत काका शिवराम पवार याचा लौकिक जपला. राजाराम पवारांसारखी चौफेर आणि तुफानी चढाई अमर टाकायचा आणि कोपर्‍यातून शिवराम पवारांसारख्या नेत्रदीपक पकडी करायचा. शिवराम पवारांचा खेळाडूची पाठ पकडण्यात लौकिक होता. अमरही त्याच पद्धतीने बेसावध खेळाडूची पाठ  काढायचा.

अमरची चढाई वडिलांसारखी चौफेर असली तरी शैलीत फरक होता. दोन्ही कोपर्‍यात अमरही चढाई टाकायचा. पण, प्रामुख्यानं त्याची चढाई डाव्या कोपर्‍यात असायची. अमरच्या चढाईचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः तयार केलेली वेगळी शैली. दोन्ही पायात समांतर अंतर ठेवून अमर मैदानाच्या भागात गोल-गोल फेर्‍या मारायचा आणि झटकन त्याच वेगात कोपर्‍याला हाताने मारून निसटायचा. समोरून कव्हर फिरली तरी गोल फेर्‍या मारण्यामुळे त्याच्यात एवढा वेग आणि चपळपणा असायचा, की तो मध्यरेषेवर सहज यायचा. अमरच्या या गोल चढाईच्या मोहात बरेच क्षेत्ररक्षक गुरफटले गेले. अमर चढाईच्या वेळी निसटताना लॉबीचाही छान उपयोग करायचा.

क्षेत्ररक्षणाच्यावेळी अमर शिवराम पवार यांच्याइतकाच हुकमी एक्का होता. समोरुन नॉक टकणेही अमरला चांगलं जमायचं. चढाई-पकडीच्या प्रांतात अमरला मानाचं स्थान होतं. कारण, त्याची सुदृढता प्रमाणबद्ध होती, वर-खाली तेवढाच मजबूत. म्हणून चढाईच्यावेळी वेळेप्रसंगी ताकदीचा उपयोग करुनही त्याला निसटता यायचं. क्षेत्ररक्षणाच्यावेळी याच शरीरसंपदेनं अमरला बिकटप्रसंगी हात दिला.  

राजाराम परवारांचा, 5 फूट 4 इंच उंचीचा 132 पौड वजनाचा हा कुलदीपक प्रथम कबड्डी मैदानावर उतरला त्यावेळी त्याच्या भावी कर्तृत्वाची कुणालाच कल्पना नव्हती. 1968 साली षोडषवर्षीय अमरने स्वतःला प्रौढ गटातील कबड्डीच्या जबरदस्त स्पर्धेत झोकून दिलं. वर्षभरातच कबड्डीरसिकांना जाणीव झाली की, वडील आणि काकांच्या कीर्तीचे रांजण अमर रिते करणार नाहीच. उलट, तो त्यात स्वतःच्या कर्तृत्वाची आणखी भर टाकील आणि झालंही तसंच. 1969 साली जन्मभूमी क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत अमर प्रकर्षानं चमकला. दोन वर्षात अमरच्या कर्तृत्वाला परिपक्वतेचा साजही चढला.

मुंबईतल्या सप्तर्षी क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत अमरच्या तुफानी चढायांमुळे अमर भारतला सिंहगडसारख्या बलाढ्य संघाच्या हातून विजेतेपदाचा चषक हिसकावून घेता आला. सिंहगड संघ क्षेत्ररक्षणात अव्वल मानला जातो. त्यांच्या क्षेत्रव्यूहामधून गुण घेऊन यायचं म्हणजे कल्पकता आणि जिद्द हवी. अमरने या दोन्ही गोष्टी आपल्याकडे मुबलक आहेत, हे त्यादिवशी सिद्ध केलं. सामना संपायला काही क्षण उरले असताना सामना समान गुणांवर होता. विजयाचं पारडं अल्लडपणे वाढले होते. अशावेळी त्याचे चुलते शिवराम पवार बाद झाले. आशावादी प्रेक्षकांच्या नजरा आता पुतण्याकडे वळल्या. अमरने त्यावेळी एका चढाईत पाच गडी टिपले आणि दृष्टीआड झालेल्या विजयश्रीला अमर भारतच्या पायाशी लोटांगण घालायला लावलं. झोके घेतं होतं. प्रेक्षकांच्याही हृदयाचे ठोके पुढे थकल्या भागल्या राजाराम व शिवराम या जोडगोळीनं अमर भारतच्या नेतृत्वाची वस्त्रंही अमरला चढवली. अमरनं तिथंही आपल्यावरील विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही. शिवाज उदय मंडळ, सातारा येथील अ.भा. स्पर्धेत अमरच्या नेतृत्वाखाली अमर भारत संघ उतरला. खेळाडू आणि कर्णधारपद अशा दुहेरी जबाबदार्‍या यशस्वीपणं पार पाडतं अमरनं आपल्या संघाचा रथ बलाढ्य संघांच्या गर्दीतून वाट काढीत अंतिम फेरीपर्यंत नेऊन उभा केला. मुंबई जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अमरच्या नेतृत्वाखाली अमर भारतनं विजेतेपदाची हॅट्ट्रिकही पूर्ण केली. अमरनं अमर भारतला अ.भा. पातळीवरील स्पर्धाही जिंकून दिल्या.

अमरच्या अष्टपैलुत्वाची दखल रेत्वे संघानं तातडीनं घेतली. रेल्वेचे क्रीडाधिकारी मुरलीधर पांडे यांनी या ताज्या दमाच्या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिलं. अमरनं तेव्हापासून (1971) आजतागायत मध्य रेल्वे संघातर्फे मैदानं गाजवली. अखिल भारतीय रेल्वे संघाची गाडी 1972- 73 च्या राष्ट्रीय स्पर्धेपासून (असनसोल) 1985 पर्यंत रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. सोलापूर महानगरपालिकेतर्फे आयोजित सुवर्णकप कबड्डी स्पर्धेत पुण्याच्या महाराष्ट्र बँकेच्या अशोक कोढरेची अमरने सामना संपणाच्या क्षणी पकड केली, त्यामुळे जादा डावापर्यंत लांबलेली लढत रेल्वेने एका गुणाने जिंकली. वडील आणि काकांच्या पावलावर पाऊल ठेवून अमरही एक दिवशी निवृत्त झाला. शिवछत्रपती पुरस्कार मिळाला नाही, ही खंत मात्र त्याला त्यावेळी निश्‍चितच वाटली. राजाराम पवार खेळत होते. त्यावेळी हा पुरस्कार नव्हता. शिवराम पवार आणि अमर पवारला केवळ रेल्वेतर्फे खेळतात म्हणून डावलण्यात आलं. त्यामुळे देशाला तीन महान कबड्डीपटू देणार्‍या या पवार घराण्याला लायकी असतानाही पुरस्कारापासून वंचित राहावे लागले. कबड्डीचा देदीप्यमान इतिहासाला लागलेला हा कलंक आहे.

(विनायक दळवी यांच्या कबड्डीतील किमयागार या पुस्तकावरुन साभार.)

 

अवश्य वाचा