आज 25 जून 2020! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुलाबा जिल्ह्याचे माजी संघचालक व ज्येष्ठ स्वयंसेवक गोविंद गणू उर्फ गोविंदराव पाटील यांचा जन्मदिवस- आणि हा नुसता वाढदिवस नाही तर, 100 वा कृतार्थ जीवनाचा शंभरीचा दिवस! लौकिकार्थाने माणसाच्या जीवनात शंभरी गाठणे म्हणजे एक परमभाग्यच म्हणावे लागते आणि चिंचोटी, ता. अलिबाग या खेडेगावात जन्माला येऊन शंभर वर्षे नाबाद स्वकर्तृत्वाने, राष्ट्रीयबाण्याने आणि हिंदू जीवनपद्धतीचा जाज्वल्य अभिमान बाळगीत शतायुषी जीवन जगणार्‍या व मागील उत्साह कायम राखीत मार्गक्रमणा करणार्‍या मा. गोविंदरावांबद्दल आजच्या या शुभदिनी माझ्या मनात आठवणींचे काहूर उठले आहे.

श्री. गोविंद गणूंचा जन्म जरी चिंचोटी येथे झाला असला तरी त्यांचे बालपण व तारुण्याची काही वर्षे त्यांचे मामा कै. शंकर महादेव पाटील यांच्याकडेच गेली. कै.शंकर पाटील हे भांडूप-मुंबई येथे त्यावेळी काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते जसे होते, तसेच ते मुंबई महानगरपालिकेत पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. कै. शंंकर पाटील कार्यकर्ते असूनही कीर्तन-भजन आदी कलांबरोबरच उत्तम पोवाडे गायक (शाहीर) होते. त्यांचे भाचे गोविंद यांनाही शाहिरीच्या पोवाड्यांचाही नाद जडला होता. जोडीला खणखणीत आवाजाची साथ लाभली असल्याने गोविंदही उत्तम पोवाडे सादर करीत असे. याचा प्रत्यय एकदा मुंबई महानगरपालिकेचे तत्कालिन महापौर व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांंच्या सभेत आला. त्यावेळी गोविंदांनी आपल्या बुलंद आवाजाचा पोवाडा गायल्याने कै. बाळासाहेब खेर यांनी गोविंदाच्या पोवाड्यावर खुश होत ङ्गयुवकफ गोविंदाला शाळामास्तराची नोकरी तातडीने बहाल केली. दोन वर्षे कालावधीची ही नोकरी गोविंदाची पहिली आणि शेवटची ठरली. काँग्रेस पक्षाच्या कामाची आवड व शंकर मामांचे मार्गदर्शन असूनही गोविंदाचे मन गावाकडे-चिंचोटीकडे ओढ घेतच राहिले.

आपल्या गावात शेती सांभाळून धाकटा भाऊ कै.पांडुरंग (तात्या) याचे बैलगाडी शर्यतीचे वेड पुरवित गोविंद गणू हळूहळू गावकर्‍यांसमवेत समरस होऊ लागले. गावातील ग्रामपंंचायतीमार्फत नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच निरक्षरांना साक्षर करण्यासाठी गोविंदराव झटू लागले. आपल्या घराच्या समोरील पटांगणात भरणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखेतील खेळ, व्यायाम, प्रार्थना याबाबत गोविंदरावांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतेच; त्यात माझे वडील कै. विष्णुपंत तुळपुळे यांची साथ मिळाल्याने गोविंदराव एके दिवशी संघस्थानावर हजर झाले आणि नुसतेच हजर झाले नाहीत, तर ङ्गसंघमयफ झाले. कै. विष्णुपंतांबद्दल मनामध्ये प्रचंड आदर असल्यामुळे व संघाच्या मंडळींबद्दल होत असलेला दुष्टप्रचार खोटा असल्याचे जाणवल्यामुळेच काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले गोविंदराव मी संघवाला म्हणून आयुष्यभर संघमय झाले. भ्ाूतपूर्व पंतप्रधान पंडित नेहरुंच्या वेशभूषेचा पगडा गोविंदरावांवर असल्यामुळे अशा पेहरावातील गोविंदराव संघाच्या कामात एकदम फिट्ट बसले. कै. विष्णूपंतांच्या खांद्याला खांदा लावून अलिबाग तालुक्यातील शेकडो गावी संघाच्या शाखांची सुरूवात केली.

हाडाचा शेतकरी पण सामाजिक जाणिवा असलेला कार्यकर्ता या नात्याने गोविंदरावांनी ग्रामपंचायतीचे राजकारण संघ स्वयंसेवक असूनही त्याज्य मानले नाही. अनेक वर्षे ग्रामपंचायत सदस्य व 1960 साली पंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले. संघाचे संस्कार, तरुण वय, समाजासाठी कार्य करण्याची धडपड आणि जिद्द यामुळे गोविंदराव पंचक्रोशीत परिचित झाले होते. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1962 साली जिल्ह्या-जिल्ह्यांत लोकल बार्डाच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी अलिबाग तालुक्यातील मतदारसंघात जनसंघाची पणती निशाणी घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कै. नारायण नागू पाटील या अध्वर्युच्या पाठिंब्याने निवडणूक लढविली आणि मोठ्या मताधिक्क्याने जिंकली. या विजयाने अलिबाग तालुक्यात जनसंघाची पणती तर पेटलीच पण जनसंघ हा भटाबामणांचा पक्ष असल्याचा प्रचार करणारे तोंडघशी पडले आणि गोविंदराव जनतेच्या हितासाठी कार्यमग्न होऊ लागले. परंतु, त्यांची लोकप्रियता आणि जनतेची स्वीकारार्हता तत्कालीन विरोधकांना (काँग्रेसवाल्यांना) रुचली नाही. गोविंदरावांना विरोध करत असतानाच त्यांच्यावर खोटेनाटे आळ घेत त्यांच्या कार्याला अपशकुन करणे सुरूच होते. सत्शील चारित्र्य आणि जनमानसात स्वच्छ प्रतिमा असलेल्या गोविंदरावांना संघाचे काम बंद कर असे वारंवार सांगूनही हा आळ विरोधकांनी गोविंदरावांवर केल्यामुळे काही महिने कारागृहाच्या आड त्यांना जावे लागले; परंतु त्यावेळचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फौजदारी वकील व रा.स्व. संघाचे महाराष्ट्र प्रांताचे संघचालक कै. बाबाराव भिडे यांनी अलिबागच्या कोर्टात एकाच दिवशी आपले वकिलीकसब दाखवून गोविंदरावांना दोषमुक्त करुन घेतले होते. नित्यनैमित्तीक धमक्या, विरोधकांच्या अस्त्राला न जुमानता मी आजन्म संघाचे काम करीन अशी भीष्मप्रतिज्ञा गोविंदरावांनी त्यावेळी घेतली, तिचे पालन आजपर्यंत सुरू आहे.

राजकारणी गोविंदरावांचे मन मात्र राजकारणाकडून पुन्हा एकदा समाजकारण-संघकामाकडेच वळले. 1948ला गांधीहत्येनंतर झालेली अटक, विरोधकांमुळे नाहक घडलेल्या जेलवारीमुळे गोविंदरावांचे मन अधिक दृढ होत गेले. त्यांच्या मनामध्ये असलेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे स्फुलिंग अधिकच चेतवू लागले. संघकामाची अधिक वाढती जबाबदारी पार पाडत असतानाच संघाच्या विविध कार्यक्रमांना, शिबिरांना तसेच बौद्धिकवर्गांना गोविंदरावांचे जाणे-येणे सुरूच राहिले. अशाच एका कार्यक्रमाच्या वेळी संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजींशी भेट झाली. गोविंदरावांचे परममित्र कै. विष्णुपंतांच्या घरी झालेल्या या गुरूजी दर्शनाने प्रभावित झालेल्या गोविंदरावांचे कार्य अधिक जोमाने होत राहिले. सहाजिकच गोविंदरावांकडे संघाच्या तालुका कार्यवाह, तालुका संघचालक व जिल्हा संघचालक अशा क्रमाने जबाबदार्‍या आल्या.

25 जून 1975ला देशावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. त्यांच्या विरोधी असणार्‍या हजारो कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात धाडण्यात आले. लोकशाहीचा गळाघोटण्याच्या इंदिरा गांधींच्या या कृत्याला संघाने विरोध केल्याने संघावरही बंदी घालण्यात आली. सरसंघचालकांपासून सामान्य संघ स्वयंसेवकापर्यंत देशभर अटकसत्र सुरू झाले. या दडपशाहीविरुद्ध गोविंदरावांसारख्या राष्ट्रभक्ताने गप्प राहणे पसंत करणे शक्यच नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर 1975 मध्ये अलिबाग शहराच्या मध्यवर्ती मारुती नाक्यावर हिराजी पाटील यांच्यासमवेत आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केला. सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणात इंदिरा गांधींविरुद्ध खरमरीत टीका केली आणि भारतीय घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची गळचेपी केली आहे, त्याला इंदिरा गांधींची स्वकेंद्रित आणि सत्तापिसासू वृत्तीच कारणीभूत असल्याचे घणाघाती भाषण केले. श्री. गोविंदराव व त्यांचे सहकारी हिराजी पाटील यांना अटक करून त्यांची लवकरच मिसा खाली रवानगी करण्यात आली. काही दिवस नाशिक येथे, तर मार्च 1977 पर्यंत ठाणे येथील कारागृहात श्री. गोविंदरावचे वास्तव्य राहिले.

शैशवास्थेत असल्यापासून गोविंदरावांचा माझा संबंध होता. त्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो-बागडलो-वाढलो असल्याने व कै. विष्णूपंतांकडे त्यांचे कौटुंबिक संबंध राहिले असल्याने माझ्या मनातील आदरभाव कायमच वृद्धिंगत होत राहिला. ज्येष्ठ स्वयंसेवक, जिल्हा संघचालक या भूमिकेतील गोविंदराव आणि शाहिरी भूमिका बजावणारे गोविंदराव यामुळे मी आणि माझे सहकारी नंदकुमार चाळके, महेश देशमुख, सतीशचंद्र पाटील, माझी पत्नी सौ. सुलभा, अलका जाधव आदी कार्यकर्ते गोविंदारावांशी अधिकच जवळीक साधून होतो. त्यातच मला व नंदू चाळके याला आणीबाणीच्या कालखंडात ठाणे कारागृहात 14 महिन्यांहून अधिक काळ बंदिवास लाभल्याने गोविंदारावांशी अधिक जवळीक निर्माण झाली. ठाणे जेलमधील वास्तव्यात गोविंरावांच्या बुलंद आवाजातील पोवाडे आणि संघगीते ऐकण्याचा योग अनेकदा आला. त्यातील आज जरी आम्ही ठरलो वेडे, गातील आमचे उद्या पोवाडे या गीतार्थाचा प्रत्यय आजमितीस जसा येतोय, तसाच आणखी एका पोवाड्याची ओळ कायमच कानात घुमते आहे. ते बोल होते- ऐका हो तुटले परदास्याचे बंध। धूम धडाड धूम हो रायगडावरी नाद॥  बुलंद व प्रेरणादायी आवाजाचा हा शाहीर या वयातही उत्तम प्रकृती, ठाम विचारसरणी आणि सतत कार्यमग्न असून, आपल्या कुटुंबासह समर्थ जीवन व्यतीत करीत आहेत. आम्हालाही या गोष्टीचा हेवा वाटतो. असाच हेवा वर्षानुवर्षे वाटावा, अशी परमेश्‍वरचरणी प्रार्थना!

तीन मुलगे, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे आणि पतवंडे अशा भरलेल्या कुटुंबासमवेत आणि गावकरी व पंचक्रोशीतील हितचिंतकांसमवेत संघविचारांचा हा वेळू गगनावरी जातच राहिला आहे. संघाच्या भगव्या ध्वजाला आदर्श मानून संघ स्वयंसेवकत्वाची प्रतिज्ञा आजन्म पाळीत हा शतायुषी स्वयंसेवक  आजही दृढ संकल्पनेने तसेच जिद्दीने स्वाभाविकच असलेल्या शारीरिक व्याधींना समर्थपणे तोंड देत कृतार्थ जीवन जगत आहे. माझे या शतकवीराला कोटी कोटी प्रणाम!

पहिल्या जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, अनेक ग्रामपंचायतींचे पंच आणि रा.स्व. संघाचे कुलाबा जिल्ह्याचे माजी संघचालक गोविंद गणू पाटील हे आज वयाची 100 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या करारी, जिद्दीच्या आणि निष्ठेच्या कृतार्थ आयुष्याला वंदन.

गिरीश तुळपुळे