कोरोनाचे संकट सध्यातरी लगेचच काही दूर होईल असे दिसत नाही. केंद्र सरकारने विविध प्रकारची आर्थिक मदत तसेच रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना काही सवलती जाहीर केल्या आहेत. राज्य सरकारनेही आपल्यापरीने मदतीचा ओघ सुरु ठेवला आहे. परंतु, ही मदत काही पुरणारी नाही. कारण, सध्याचे कोरोनाचे संकटच एवढे मोठे आहे, की केंद्र व राज्य सरकारने कितीही मदत केली तरी ती पुरी पडणारी नाही. केंद्राने अजून भरीव मदत जाहीर केली पाहिजे; परंतु केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीनुसार टप्प्या-टप्प्याने ते कदाचित आणखी मदत देतील, असा अंदाज आहे. परंतु, मदतीसाठी अनेक हात पुढे येण्याची गरज आहे. यातील पहिला भार टाटा समूहाने 500 कोटी रुपये देऊन उचलला आहे. टाटा उद्योगसमूह हा नेहमीच दानशूर म्हणून ओळखला जातो. हा समूह असा प्रकारे मदत देणे ही आपली जबाबदारी आहे असे मानून नेहमीच काम करीत आलेला आहे. आता टाटांच्या पायावर पाय ठेवून अन्य उद्योगसमूहांनी मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. टाटा समूहाने पंतप्रधान किंवा कोणीही मदत करण्याची हाक दिलेली नसताना, ही मदत केली आहे. टाटांचा नेहमीच याकामी पुढाकार राहिला आहे. आता टाटांनी मदत जाहीर केल्यावर तरी अंबानी, अदानी या सरकारी धोरणांचा फायदा उकळणार्‍या भांडवलदारंनी यापेक्षा जास्त मदतीचा हात देण्याची गरज आहे. धनिकांनी, उद्योगसमूहांनी अशा वेळी न मागता भरघोस मदत देणे, हे आपले कर्त्यव्य आहे असे समजून तातडीने मदत दिली पाहिजे. सध्या सरकारने तळागाळातील घटकांना मदत जाहीर केली आहे. परंतु, कोरोना आटोक्यात आल्यावर हेच भांडवलदार सरकारकडे अनेक सवलती देण्यासाठी हात पसरणार आहेत. शेअर बाजारही याची सरकार कधी घोषणा करते, त्या प्रतीक्षेत आहे. कोरोनाचे हे संकट आपल्यावर दीर्घकालीन राहाणार आहे. कोरोनाची लागण जरी संपुष्टात आली, तरी अर्थव्यवस्थेवर होणार्‍या परिणामातून सावरण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. आजवर आपल्याला पहिले व दुसरे महायुद्ध, पानशेतचा पूर, 72 चा दुष्काळ, गुजरातमधील तसेच मराठवाड्यातील भूकंप ही संकटे मोठी वाटत होती. परंतु, आता ती आलेली संकटे किरकोळ वाटावी, असे सर्वात मोठे जागतिक संकट कोरोनाने आपल्यापुढे उभे केले आहे. आज जगातील प्रत्येक नागरिकाच्या दारात मृत्यू उभा असल्याची भीती आहे. इटलीत, चीन, स्पेन, इराकमध्ये जे मृत्यूने थैमान घातले, ते भयावह होते. कोरोनामुळे आज संपूर्ण मानवजातच धोक्याच्या एका उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. हे संकट जागतिक असल्याने जग आता मंदीत लोटले गेले आहे, असे जागतिक बँकेलाही जाहीर करावे लागले आहे. जगाची उलाढालच पूर्णपणे ठप्प झाल्यासारखी झाली आहे. सध्याचे लॉकडाऊनही बहुधा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आवश्यकता वाटल्यास सरकार हे लॉकडाऊन अजूनही वाढविण्याची शक्यता आहे. या संकटावर मात करण्यासाठी दुहेरी अस्त्र सरकारला भविष्यात वापरावे लागणार आहे. एक तर, सध्या जनतेला सर्व सुविधा पुरविणे, कोरोनाची लागण झालेल्यांवर चांगला उपचार करुन त्यांना त्यातून बाहेर काढणे व हा रोग आटोक्यात आल्यावर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पुन्हा कंबर कसणे, अशी दुहेरी लढाई लढावी लागणार आहे. अर्थात, हे एकटे सरकार करु शकणार नाही, हेदेखील तेवढेच सत्य आहे. सर्व जगच संकटात असल्यामुळे आपल्याला जागतिक पातळीवर मदत मिळणेही तेवढे सोपे जाणार नाही. त्यामुळे आपल्याकडे आपणच आपला निधी यासाठी उभारण्याची गरज आहे. याकामी मोठ्या उद्योगसमूहांची मदत निश्‍चितच लागणार आहे. त्याचबरोबर अनेत श्रीमंत देवस्थाने आपल्या निधीतील काही रक्कम मदत म्हणून जाहीर करुन  त्यासाठी सरकारने काही कडक पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी मोठ्या कंपन्यांच्या सी.एस.आर. फंडातील काही रक्कम केंद्र सरकारच्या निधीत जमा करणे, तसेच त्यांचे प्रकल्प ज्या भागात आहेत, तेथे त्यांनी काही ठराविक रक्कम सध्याच्या कठीण काळात समाजहितासाठी खर्च करण्याची सक्ती केली गेली पाहिजे. सध्या देशातील असंघटित व स्थलांतरीत मजूर सर्वात मोठ्या संख्येने आपल्या कामाच्या ठिकाणी अडकला आहे. या मजुरांना एक तर गावी जाणे शक्य नाही, त्यामुळे त्यांना इकडेच राहावे लागले आहे. यातील बहुतांशी मजूर हे एकाच जागी काम करीत नसल्याने त्यांच्याकडे रेशन कार्डही नाही. या मजुरांच्या जोडीने कंत्राटावर काम करणारे सफाई कामगार, काच-पत्रा-कागद वेचणारे कामगार, हमाल, मोलकरणी, छोट्या हॉटेलात काम करणारे कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, वीटभट्टी कामगार यांच्यापैकी अनेकांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना सध्या सरकारने जाहीर केलेल्या सवलती मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. दिल्लीत हजारो मजुरांचे तांडे आपल्या गावी जाण्यासाठी बस स्टँडवर उभे आहेत. त्यांचे काय करायचे? असा मोठा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. अशा मजुरांचे जथ्थे शोधून त्यांच्या जेवणाची सोय करण्याची गरज आहे. यासाठी व्यक्तिगत पातळीवर तसेच विविध कंपन्यांच्या मार्फत मदत तातडीने करता येऊ शकेल. तसेच हे काम धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात करु शकतात. सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात देण्याची गरज आहे, तरच भविष्यात आपला देश या संकटातून सावरु शकतो.

अवश्य वाचा