गेल्या काही महिन्यांपासून जगभर धुमाकूळ घालणार्‍या कोरोना विषाणूचा धोका कमी होण्यासाठी अजून बराच काळ वाट बघावी लागणार आहे. आपल्या सर्वांनाच कोरोना विषाणूसह जगावं लागणार आहे. यापुढचं आयुष्य (किमान लस उपलब्ध होऊन सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंत तरी) मोकळंढाकळं, सरधोपट नसेल. आपल्याला स्वत:वरच काही बंधनं लादावी लागणार आहेत. गरजा ओळखून जीवनशैलीत काही बदल करावे लागणार आहेत. उत्तम आरोग्य, शिक्षण, आर्थिक सुरक्षा याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. मुळात आपल्याला आपले प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. विमा उतरवणं अत्यावश्यक असेल. पुढच्या काळात मनोरंजनाचे पर्याय बदलणार आहेत. चित्रपट, नाटकांची आवड काही काळ बाजूला ठेवावी लागणार आहे. चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटकांचा आस्वाद कधी घेता येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच आपण आपले छंद, आवडीनिवडी याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. घरी बसून आपण काय करू शकतो, याचा वेध घ्यायला हवा. माणसाला मोकळ्या वेळेत मनोरंजन हवं असतं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याआधी आपल्याकडे मनोरंजनाची असंख्य साधनं होती. पण, यापुढच्या काळात या साधनांमध्ये घट होणार आहे. माणसाच्या मोकळ्या वेळेतल्या आवडीनिवडी, छंद यामुळे त्याची संस्कृती कळते असं म्हणतात. म्हणूनच ही संस्कृती जोपासण्यासाठी काय करता येईल, हे आपण ठरवायला हवं. येत्या काळात काटकसरीने जगण्याला खूप महत्त्व येणार आहे.

कोरोनामुळे आपल्याला अनेक गोष्टी कळल्या. जगण्याच्या परिभाषा बदलल्या. अनेकांसाठी दारू किती महत्त्वाची आहे, हे कोरोनामुळेच कळलं. दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर लोकांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं. या रांगेत उभे असणारे बहुसंख्य लोक निम्न मध्यमवर्गीय स्तरातले म्हणचे दोन वेळचं अन्न कसंबसं मिळवणारे होते. या रांगा बघून अनेकांना नक्कीच धक्का बसला असावा. कोरोनाआधी दारूला किती महत्त्व होतं, त्यावर किती प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च केला जात होता याची आपल्याला जाणीव झाली. या रांगांमध्ये नसणारी माणसं आश्‍चर्यचकित झाली. काम नसल्यामुळे लोकांनी दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या की त्यांना दारूची खरंच गरज होती याचा विचार व्हायला हवा. दारू पिणं हा अनेकांसाठी स्टेटसचा भाग असतो. काहींना दारूची सवय असते. सरकारने अशा माणसांचा शोध घ्यायला हवा. याबाबत सजगता निर्माण व्हायला हवी. लोकशिक्षणाच्या माध्यमातून दारूचा हा अंमल कमी करायला हवा. कोरोना उद्भवला नसता तर ही स्थिती आपल्यासमोर आली नसती.

अजून एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधायला हवं. कोरोनाकाळात गर्दी न करणं, रांगा लावून वस्तू घेणं यावर भर देण्यात आला. गर्दी न करताही वस्तू विकत घेता येतात, हे आपल्याला समजलं. आपल्याकडे भाजी विक्रेत्यांसमोर लोक गराडा घालत असल्याचं, दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचं चित्र नेहमीच दिसायचं. लोक सार्वजनिक ठिकाणी आपला हक्क असल्याप्रमाणे थुंकायचे. कोरोनामुळे थुंकण्याचे धोके लोकांच्या लक्षात आले. कोरोनामुळे लादण्यात आलेली बंधनं शिथिल झाल्यानंतरही या शिस्तीचं पालन झालं, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, याचं भान आलं तर उत्तमच. कोरोनामुळे आपण मोजलेल्या किमतीच्या बदल्यात काही तरी सकारात्मक आपल्या पदरात पडेल. हा बदल निश्‍चितच स्वागतार्ह असेल. हे बदल खरंच होतील का, याबाबत माझं मन साशंक असलं तरी काही टक्के लोकांनी स्वत:मध्ये बदल घडवला तर बरंच काही साध्य होऊ शकेल. इंग्लंडमध्ये एक माणूसही रांगेत उभा असतो, असं पुलं विनोदाने म्हणायचे. त्याचप्रमाणे आपल्यालाही शिस्त लागेल, अशी आशा नक्कीच करता येईल. कोरोनामुळे लादण्यात आलेली बंधनं उठल्यावर नेमकं काय होईल, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मला यात दोन शक्यता दिसतात. एक म्हणजे काही लोक सैराट होतील. इकडे तिकडे सैरावैरा धावू लागतील. पारतंत्र्यातून, बंधनांमधून सुटल्याचा आनंद व्यक्त करतील. बंधनं उठल्यानंतर काही देशातल्या लोकांनी असा अतिउत्साह दाखवल्याचं आपण बघितलं. काही लोक कोरोनाला घाबरतील, दबून राहतील, गर्दीत जाणं टाळतील. अर्थातच येत्या काळात गर्दी टाळणं आवश्यक आहे. खरेदी करण्यासाठी कुटुंबकबिल्यासह बाहेर पडण्यासारख्या गोष्टींना फाटा द्यावा लागेल. प्रार्थनास्थळी दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसं असतं. धार्मिक स्थानी जातानाही लोकांना शिस्त पाळावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत सजग राहावं लागेल. आपणच काही बंधनं घालून घेतली पाहिजेत. प्रेमाने शिस्त लावता येत नाही, हे आपण पाहिलं. शिस्त लावण्यासाठी कठोर व्हावंच लागतं, कायद्याचा आधार घ्यावाच लागतो. तसा तो आपल्याकडे घेतला जात आहे. मात्र, शिस्तीसाठी लोकांकडून प्रयत्न होणंही तितकंच गरजेचं आहे.

यापुढील काळात आधीप्रमाणे बिनधास्त फिरता, प्रवास करता येणार नाही. देशांतर्गत आणि परदेश प्रवासावर बंधनं येतील. मनाला तजेला देण्यासाठी आपण पर्यटनाला जातो. विरंगुळा म्हणून बर्‍याच गोष्टी करतो. एकत्र गप्पा मारतो. ते आता होऊ शकणार नाही. नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडताना मन नेहमीच जुन्या काळात जातं. आपल्याला भूतकाळाची धास्ती आणि भविष्याची चिंता असते. मात्र, या सगळ्या चिंता दूर सारून जीवनाचं उद्दिष्ट ठरवून सामर्थ्याच्या जोरावर पुढे जायला हवं. आपल्या आयुष्यात काही प्रमाणात रितेपण जाणवेल. येत्या काळातले बदल स्वीकारायला मन तयार होणार नाही. आपण मात्र होकारात्मकता आणि सकारात्मकता टिकवून ठेवायला हवी. आता आपण आपल्यापुरता विचार न करता समाजाचा आणि राष्ट्राचा विचार करायला हवा. सामाजिक जीवन बदलांसह जगायला हवं. सार्वजनिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं.

कोरोना बराच काळ आपल्यासोबत राहणार असला किंवा आपल्याला कोरोनाच्या छायेखाली जगावं लागणार असलं, तरी पुढच्या काळात कोरोनाविरोधात आपली रोगप्रतिकारकशक्ती विकसित होऊ लागेल. परदेशातल्या लोकांना भारतात शुद्ध पाणी लागतं. साधं पाणी प्यायल्यावर त्यांचं पोट बिघडतं, इतर त्रास होतात. मात्र, आपण हे पाणी सहज पचवू शकतो. कारण, आपली रोगप्रतिकारकशक्ती विकसित झालेली असते. येत्या काळात कोरोनाविरोधी औषध किंवा लस उपलब्ध होईल. या लसीमुळे ही प्रतिकारक शक्ती अधिक सक्षम होऊ शकेल. अर्थात, कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तो खूप वेगाने पसरत आहे.

 कोरोनाचा विषाणू विविध पृष्ठभागांवर बराच काळ टिकून राहतो. हाच कोरोनाचा मोठा धोका आहे. ऑफिसमध्ये किंवा अगदी घरातही लाईटच्या बटणावर तो असू शकतो. मोबाइलच्या स्क्रीनवरही कोरोना टिकू शकतो. त्यातच लागण झाल्यानंतरही अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. असे लोक कोरोनाचे वाहक असू शकतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुढील काळात खूप सजग असायला हवं. त्यामुळे येऊ घातलेल्या परिस्थितीला धीराने तोंड देणं गरजेचं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सरकारतर्फे चांगले प्रयत्न करण्यात आले. मात्र, लोकांनी नियमांचं, बंधनांचं पालन केलं नाही. असं होता कामा नये. आपण आता होकारात्मक पद्धतीने नव्या गोष्टी शिकायला हव्यात. कोणतंही राजकारण न करता फक्त समाजकारणाचा विचार करणारे लोक यातून बाहेर पडून पुढे जातील. म्हणूनच परिस्थिती कितीही बिकट असली, तरी आपल्यातली सकारात्मकता कधीही दूर लोटू नये.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!