उपमा, उत्प्रेक्षा, रुपक इ. अलंकार वस्तुतः ललित साहित्यात उचित असे आपणा सर्वांना वाटते. कालिदासादि कविकुलगुरु किंवा बाणभट्टादि गद्यसम्राट यांनी हे अलंकार मुक्तहस्ते वापरुन आपल्या रचना आकर्षक केल्या; परंतु असे अलंकार आध्यात्मिक साहित्यात वापरुन एक प्रकारे रुक्ष वाटणारे आत्मज्ञान चित्तवेधक करणारे ऋषि, भाष्यकार कसे रसिक होते, हे स्पष्ट करणारी वर्णने प्राचीन वाङ्मयात आढळतात. त्यामुळे मनोरंजनातून आत्मज्ञान होते; विचारी माणूस त्यामुळे अंतर्मुख होऊन देहादिकाचे नश्‍वरत्व, आत्म्याचे शाश्‍वत्व यांचा विवेक करु लागतो. महाभारत, रामायण, पुराणे या प्राचीन वाङ्मयात अलंकारांची उधळण मनाचा ठाव घेते, विवेकाला चालना देते.

मराठी साहित्यात ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, चोखामेळा, नरहरी सोनार इ. संतांनी आपल्या रचना अलंकारांनी सजवून मुमुक्षुजनांसमोर प्रस्तुत केल्या. खरे पाहता, हे संतजन साहित्यशास्त्रज्ञ नव्हते. अंतस्फूर्ती, इष्टदेवाबद्दल प्रगाढ भक्ती, पतनोन्मुख समाजाबद्दलची कळकळ यातून त्यांच्या रचना अलंकृत झाल्या.

ज्ञानेश्‍वर तर रुपकाचार्यच! माया नदीचे वर्णन मनोवेधक रुपकातून त्यांनी केले आहे. अशीच कितीतरी रुपके त्यांच्या रचनेत आढळतात.

श्रीभागवत पुराणात रुपकलाकाराने सजलेली बरीच स्थळे आहेत. पंचम स्कंधातील भवाटवी (प्रपंचरुपी अरण्य) हे रुपक उत्कृष्ट आहे.

रुपकाचे लक्ष्मण साहित्यशास्त्री सांगतात, त्यानुसार वर्ण्य विषय (शास्त्रीय भाषेत प्रस्तुत किंवा प्रकृत) आणि उपमेय विषय किंवा तुलना करायची तो विषय यांचे एकरुपत्व कल्पिलेले असते- भवाटवीत भव (प्रपंच) आणि अटवी (अरण्य) यांची समरुपता हृद्य भाषेत वर्णित आहे.

आणखी एक रुपक कथेचा साज चढवून दृग्गोचर होते. माझ्या मते, ती श्रेष्ठ रुपककथा आहे, त्यातून आत्मस्वरुप मुमूक्षूच्या चित्तावर स्थायी रुपेण ठसेल, यात संदेह नाही.

रुपकथेत घटना सत्य, पात्रे त्यांची नावे काल्पनिक असतात, अशी ही कथा पुरंजनाख्यान नावाने भागवत पुराणात आढळते. नारदाने ती प्राचीन बर्हिनामक ध्रुववंशज राजाला सांगितली आहे. या राजाने स्वर्गप्राप्तीसाठी अनेक यज्ञ केले. स्वर्गात आपले आसने निश्‍चित आहे, अशा भ्रमात तो होता. देवर्षी नारदाने त्याची कानउघाडणी करत विचारले- ङ्गराजा! या यज्ञयागातून तुझे कसले हित साधणार आहे, ते सांग तरी! दुःखाचा सर्वथा नाश आणि निर्भेळ सुखलाभ हे खरे श्रेय. ते या हिंसाप्रधान कर्मातून साध्य होईल काय?फ

इथे श्रेय हे तांत्रिक पद आहे; ते प्रेय याच्या विरोधात जाते. प्रेय म्हणजे प्रापंचिक सुख आणि इहलोकी समाधान अन् परलोकी उत्तम गती म्हणजे श्रेय. नारदकृत प्रश्‍नाचा रोख श्रेयविषयक आहे. पुनः त्यांनी यज्ञगत पशुहिंसेचे खरे स्वरुप उलगडून दाखवत म्हटले- राजन्! तू यज्ञनिमित्ते पशुहत्या केलीस, ते पशु यमलोकी तुझीच वाट पाहात आहेत. निधन झाल्यावर तू तिथे गेलास, की दिव्य देहधारी ते तुला चार बाजूंनी ठोसून तुला जर्जर करतील! कळलं.? हे ऐकून राजा फार घाबरला, त्याने विचारले- देवर्षे! वैदिक कर्मानी माझ्या मतीला घेरले आहे, त्यामुळे खरे कल्याण कशात आहे, हे मला मुळीच कळले नाही, तरी तुम्ही शुद्ध, हितकारी ज्ञानोपदेश करा. तसे नारदांनी, याला शुद्ध आत्मज्ञान कळावे, म्हणून एक कथा सांगितली.

पूरज्जन हा एक राजा, निवासासाठी सर्व सुविधायुक्त राजवाडा शोधत निघाला. हिमालयाच्या दक्षिण पायथ्याशी त्याला हवा होता तसा वाडा दिसला. त्या वाड्यातून एक लावण्यवती युवती बाहेर येताना दिसली. राजाने तिला विचारले- हा वाडा कुणी निर्माण केला? याचा स्वामी कोण? तू कोण? तुझ्यामागे हे अकरा पुरुष दिसताहेत, ते कोण? त्यांच्याही मागे शतावधी स्त्रिया दिसताहेत, त्या कोण? तुझा विवाह झालाय का? नसेल तर कुणाशी विवाह करणार?अरे राजा! असे किती प्रश्‍न विचारतोस? हा कुणी बांधला, हे माहीत नाही. सध्या मी इथे राहते, मीच स्वामिनी असे समज. हा एक मुख्य सेवक, शेष दहात्याचे दास, या स्त्रिया मला हवे तसे काम करतात; असंख्य कामे, म्हणून शतावधी दासी, माझा विवाह व्हायचा आहे. मी तुझ्याशी विवाह करीन. आपण इथे सुखाने नांदू!फ हे ऐकून राजा प्रसन्न झाला. तिच्या इच्छेनुसार विवाह करुन वाड्यात राहायला आला. तिने वाड्याची गुंतागुंतीचा रचना सांगत म्हटले- त्याचा आशय... या वाड्याला नऊ द्वारे होती, पैकी सात वरच्या बाजूला, दोन खाली होती. यातली पाच पूर्वेकडे, एक दक्षिणेला, एक उत्तरेला, दोन पश्‍चिमेकडे होती. पूर्वद्वाराची खद्योता आविर्मुखी अशी नावे होती. तेथे द्युमान नामक सेवक बसून होता; त्यासोबत पुरंजन विभ्राजित देशालाच जाऊ शकत होता. ही द्वारे परस्पराच्या शेजारी होती. तसेच अजून नलिनी व नलिनी नावाची दोन द्वारे एकत्रच होती. अवधूतनामक मित्रासोबत सौरभच्या देशात जाता येत असे. पूर्वेला मुख्य हे द्वार होते, त्यातून बहुदन आणि (आपण) प्रदेशांना जाणे शक्य असे; तेथेही रसज्ञ आणि विपण या मित्रांसोबत जाता येई. पितृहू हे दक्षिण द्वार, तेथील श्रुतधर मित्राच्या मार्गदर्शनाने राजा पुरंजन दक्षिण पांचाल देशात जात असे. उत्तरेला देवहू हे द्वार, त्यातून बाहेर पडला की श्रुतधर त्याला उत्तरपांचाल राष्ट्रात घेऊन जात असे. पश्‍चिमेला आसुरी हे फाटक दुर्मदनामे मित्राचा हात धरुन राजा ग्रामक प्रदेशात फेरफटका मारायचा. त्याला लागूनच निऋतिनावाचे द्वार होते. लुब्धक हा मार्ग दाखवणारा, तो त्याला वैशस या प्रांतात घेऊन जाई. दोन अंध नागरिक होते. हा राजा डोळस असल्याने त्यांना सोबत घेऊन इतस्ततः भटकायचा. अशा प्रकारे राजा स्वतंत्र नव्हता. स्वेच्छेने त्याला काही करता येत नसे. विषूचीन हा सेवकांचा म्होरका; तो राजाला अंतःपुरात नेत असे. त्याला कधी सुख वा हर्ष किंवा मोह आणि दुःख, पत्नीच्या लहरीप्रमाणे भोगणे भाग पडे. राजा एवढा बाईलवेडा, कामांध झाला की, ती हसली, रडली, गायिली किंवा काहीही करी. राजा तिच्यासारखेच वागून तिला प्रसन्न करण्याची धडपड करत राहायचा. पाळीव माकडच तो होऊन पुरता तिचा दास होऊन राहिला.

एकदा तो पत्नीला न कळवता शिकारीला गेला, थकून घरी आला, स्नान करुन तो प्रियेकडे निघाला. दासींना विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या, स्वामी, स्वामिनी रुसली आहे का ते आम्हास ठाऊक नाही. राजाने मोठ्या प्रयासाने, पाय धरुन विचारले- होय मी मृगयेला, तुला न सांगता गेलो. हा अपराधच होय. पुनः नाही असे वागणार!तेव्हा प्रसन्न झाली ती! तो अगदी परवश होता. तिचा भोग घेताना बराच काळ निघून गेला. त्या वाड्यावर, तीनशे साठ पुरुष सैनिक, तितके स्त्रीसैनिक इतक्यानिशी चंडवेग नामक गंधर्व राजाने आक्रमण केले. स्त्रीने पाळलेला पाच फडांचा नाग ते परतवून लावत होता. तरी त्याला ते अनावर होते. कालकन्या आणि प्रकार हे चंडवेगाचे सेनापति, त्यांच्या स्त्रीपुरुष सैनिकांनी सकल द्वारातून प्रवेश करुन पुरुजन्नाचे सत्व बळ शून्यावर आणले. तरी तो पत्नीला पाहातच राहिला. तिचे पूर्वीसारखे प्रेम राहिले नव्हते तरी त्याला ध्यास सोडत नव्हता. तिला पाहात-पाहात तो मरण पावला. तिच्या ध्यासामुळे पुरंजन राजकन्या म्हणून जन्माला, तिचे लग्न झाले. मलयध्वज हा राजा तिचा पती उतरत्या वयात तो पत्नीसह तप करण्यासाठी वनात गेला, त्याला मृत्यूने गाठले. त्याची ही राणी सती जाणार तोच पूर्वजन्मातला तिचा मित्र इथे प्रकटला आणि चौकशी केली. विचारले- मला ओळखतेस काय? छे! कोण? तुला मी मुळीच ओळखत नाही! तो म्हणाला- ओळखणार कशी? मी बिननावी तुझा मित्र, तू पूर्वजन्मात पुरंजन राजा होतीस, तेव्हाही मी सदैव तुझ्याबरोबर होतो, तू विचारले नाहीस, मी सांगितले नाही. तरी मी तुझी संगत सोडली नाही. आता तरी ओळख पूर्वजन्मात तू स्त्रीमध्ये गुरफटला होतास, मला विसरलास.फ असे म्हणून आपण दोघे वस्तुतः एकरुपच असे तिचे आपले खरे स्वरुप विशद केले. ज्ञानी पुरुष आपणा दोघात भेद न करता एकच एक असा अनुभव घेतात, तुला हे उमगले नव्हते, म्हणून तुझी दुर्दशा झाली. आपण परस्परात मिळून एकरुप होऊ या.फ या उपदेशामुळे राजकन्येला स्वरुप समजले, ती त्याच्यात विलीन झाली.

चंडवेग हा मृत्यू. तो देहावर आक्रमण करतोच. कालकन्या म्हणजे वार्धक्य ते सर्व इंद्रियांना दुबळे करते. प्रज्वार म्हणजे विविध रोग, ते स्वतःच येतात. देहाला जर्जर करतात. देहगत जीवात्मा या सर्वांनी गुरफटून परम हितैषी ईश्‍वराला विसरतो. त्यामुळे पुनर्जन्म- कधी स्त्री कधी पुरुष असा घेणे भाग पडते. हे स्पष्टीकरण ऐकून प्राचीन बर्हिराजा भानावर आला; वैदिक कर्माचा त्याग करुन आत्मचिंतनात गढून गेला; उद्धरुन गेला. अशी ही सांग- परिपूर्ण रुपक कथा, ती केवळ प्राचीन बर्हीचेच नव्हे तर कुणाही जीवाचा उद्धार करणारी. मात्र तसा विवेक सुचायला हवा; तसेच सदैव आत्मचिंतन केले पाहिजे. परमात्मस्वरुप विशद करुन जीवात्म्याला परमहिताचा मार्ग दाखविणारी ही कथा परमार्थ क्षेत्रातली सर्वश्रेष्ठ आहे. आपण प्राचीनबर्हि व्हावे, मग मार्गदर्शन करणारा हितैषी नारद भेटेलच.

 

अवश्य वाचा