बघता-बघता जून महिना सरायला आला, अद्याप म्हणावा तसा पाऊस लागलेला नाही. एका बाजूला शेतकरी पुन्हा आकाशाकडे नजर लावून बसला आहे, तर दुसरीकडे भारताच्या सर्व सीमांवर जवान गस्त घालत आहेत. कारण, एका बाजूला पाकिस्तान व दुसर्‍या बाजूला चीनच्या आगळिकी चालूच आहेत. हिमालयाच्या पांढर्‍या शुभ्र हिमशिखरांवर युद्धाचे काळे ढग जमू लागले आहेत, असं मी गेल्या आठवड्यातच लिहिले होते. ढग तसेच आहेत, पण त्यांच्यात आता धो-धो बरसण्याची ताकद उरलेली आहे की नाही, याचा संशय यावा, अशी स्थिती आहे.

भारत व चीन यांच्यातील युद्ध टळलेले नसले, तरी ते इतक्यातच भडकण्याची शक्यता मात्र दिवसेंदिवस धूसर होऊ लागली आहे. याचा अर्थ, चीनची युद्धाची खुमखुमी जिरली, असा मात्र होत नाही. चीनला व चीनच्या पदराआडून पाकिस्तानला भारताविरुद्ध लढायचे तर आहेच; पण भारतीय सेनादल व त्याबरोबरीने काम करणार्‍या संरक्षण व परराष्ट्र खात्यांच्या उच्चाधिकार्‍यांनी दाखवलेल्या कमालीच्या बुद्धीचातुर्याची दाद द्यावीच लागेल. कारण, पिसाळलेल्या मस्तवाल हत्तीवर स्वार होऊन त्याला जेरीस आणण्यासाठी जे बुद्धीसामर्थ्य माहुताला दाखवावे लागते, त्याचेच दर्शन भारतीयांनी दाखवले. त्यामुळेच दोन आठवड्यांपूर्वी गगनभेदी डरकाळ्या फोडणार्‍या चीनच्या राज्यकर्त्यांना मांजरासारखे म्यॉव म्यॉव करावे लागत आहे. हे दडपण भारतीय राज्यकर्त्यांनी असेच चालू ठेवले, तर लवकरच चीनचे राजकीय सर्वेसर्वा झी जिनपिंग यांना गुडघ्यांवर यावे लागेल.

हे कर्तृत्व गाजवणारे देशाच्या लष्कराचे प्रमुख जनरल नरवणे व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे देशवासियांतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करायलाच हवे. लडाखच्या दुर्गम भागात जिथे गलवान खोर्‍याजवळ नि:शस्त्र भारतीय जवानांची चिन्यांनी कत्तल केल्याच्या बातम्यांमुळे सारे भारतीय विश्‍व दु:खवेगाने शहारले होते, तिथे चिनी सैन्याने जाहीरपणे माघार घेतली, अशा आता बातम्या आहेत. भारतीयांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ही बाब खचितच उल्लेखनीय ठरेल. हा प्रश्‍न केवळ आजच्या चीन व भारत यांच्या लष्करी तयारीचा व सामर्थ्याचा नाही. याला 58 वर्षांपूर्वीच्या भारताच्या अपमानास्पद पराभवाची काळी पार्श्‍वभूमी आहे. 1962च्या ऑक्टोबरमध्ये याच चीनने भारतातला मैत्रीच्या भूलथापा देत गाफील ठेवले व अचानक कडाक्याच्या थंडीत भारतावर हल्ला चढवला. भारतीय सैन्य लढायला सिद्ध व्हायच्या आतच सारा खेळ संपला होता.

तेव्हा असे घडले याचे कारण एका बाजूला तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची स्वप्नवत सैद्धांतिक निष्ठेची आग्रही भूमिका व दुसर्‍या बाजूला भारतात राहून भारताची बाजू लंगडी करू पाहणार्‍या तथाकथित डाव्या विचारसरणीच्या व बुद्धीवादी मंडळींची पॉवरफूल लॉबी यांची अभद्र युती, हे होते. सुरक्षा दलांवर खर्च करण्याऐवजी तोच निधी देशाच्या विकासकामांसाठी वापरायला हवा, अशी सामान्यांना पटणारी भूमिका पंडितजींनी घेतली होती. व्ही.के. कृष्ण मेनन यांच्यासारखा कम्युनिस्ट विचारसरणीचा संरक्षणमंत्री डोक्यावर बसल्याने हीच भूमिका आपली ‘राष्ट्रीय भूमिका’ बनली होती. देशांतर्गत व ‘अलिप्त राष्ट्र’ समूहात लोकप्रियता मिळवण्याच्या खटपटीत असलेल्या नेहरुंना व नेहरुवाद्यांना ‘हिंदी-चिनी भाई भाई’चीच स्वप्ने पडत असल्याने चिनी रणगाडे बर्फाच्या कपारी चिरत आपल्या छावण्या उद्ध्वस्त करेपर्यंत आपल्या जवानांना हल्ला करण्याचे आदेशच मिळत नव्हते. त्यामुळेच बंदुकीची एकही गोळी न झाडताच आपले शेकडो सैनिक हकनाक शहीद झाले. तरीही या देशातील स्वत:ला डावी म्हणवणारी बुद्धीमंतांची लॉबी याला आक्रमण म्हणायला तयार नव्हती. या नीच चिनी कृत्याला त्यांनी निर्लज्जपणे चीनचे ‘मुक्ती आंदोलन’ म्हटले.

त्यांचीच उरली-सुरली पुढली पिढी आजही भारतात तोच मंत्र आळवत आहे. दुर्दैवाने आज चीनची बाजू घेणार्‍यांमध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे शीर्ष नेते आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र व तेव्हाचे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनला भेट देऊन तिथल्या प्रमुख नेत्यांसमवेत केवळ बोलणी नव्हेत, तर पक्ष पातळीवर करारही केले. त्यातल्या अटी-शर्तींना हे माय-लेक व काँग्रेसचे अनेक दुय्यम, तिय्यम नेते आजही चिकटून बसले आहेत. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना केवळ राजकीय पक्ष नसून, तेच सरकार आहेत. त्यामुळे या पक्षाने केलेले करार हा तिथला सरकारी अजेंडा मानला जातो. भारतात तेव्हा काँग्रेस हा सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष असला, तरी ते म्हणजे सरकार नव्हेत; तेव्हाही नव्हते. मनमोहन सिंह पंतप्रधानपदी होते. पण, त्यांना पूर्णपणे अडगळीला टाकून या माय-लेकांनी ‘सामंजस्य करार’ कसे केले, हा प्रश्‍न आहेच. या सामंजस्य करारामुळेच चीन अरुणाचल प्रदेशावर आपला हक्क सांगू शकला, असे मानले जात आहे, त्यात तथ्य आहे. सोनिया गांधी-राहुल यांनी असे का केले, याचे स्पष्टीकरण त्यांनी भारतीयांना द्यायला हवे. पण, ते तसे उत्तर देणार नाहीत. त्यांचे पोवाडे गाण्यातच धन्यता मानणारे, तसे होऊ देणार नाहीत व फालतू विषयांवर अतिफालतू बडबड करून जमावाच्या टाळ्या मिळवणारे भाजपचे उथळ नेते तशी मागणीही करणार नाहीत. त्यामुळेच मोदी काहीच का बोलत नाहीत, असे आरोप करत राहुल व त्यांचे साजिंदे धुरळा उडवत राहतील.

अशी वक्तव्ये करणारे 2004 ते 2014 या दहा वर्षांत मोक्याच्या वेळीसुद्धा तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह काय व किती बोलले, हे मात्र सांगायचे आपसूक विसरतात. असो.  ही वेळ आपसातील उणी-दुणी काढण्याची नाही. आता इतक्यात तरी भारत-चीन युद्धाला तोंड लागण्याची शक्यता नाही. पण, याचा अर्थ चीनची खुमखुमी भागली वा जीनपिंग सुधारले असा मात्र नाही. ड्रॅगन महिनोंमहिने डोंगरात शांत असतो, पण संधी मिळताच उफाळून वर येतो व आपल्या विषारी नांगीने सर्वांना डसू लागतो. तसे होण्यापूर्वीच ही नांगी नेस्तनाबूत करायला हवी.