जागतिक म्हणता येणार नाही कदाचित !!... मित्रहो, हा दिवस जगभरात सगळीकडे साजरा केला जातो, हे अनेकांना माहीत असेल. आपण साजरे करत असलेले इतर बरेच दिवस जगात एकाच दिवशी, एकाच तारखेला साजरे होतात. परंतु, डॉक्टर्स डेचं मात्र तसं नसतं. वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा होतो आणि त्याला तशीच ठोस पार्श्‍वभूमी व कारणेही आहेत. अमेरिकेत 30 मार्च, ब्राझीलमध्ये 18 ऑक्टोबर, इराण 23 ऑगस्ट, व्हिएतनाम 28 फेब्रुवारी तर भारत 1 जुलै!

कोरोना पँडेमिकने संपूर्ण विश्‍व पुरतं हादरून गेलं आहे व कोविड 19 या आजारासमोर सर्वांनी अगदी गुडघे टेकले असताना कोविड वॉरिअर्स म्हणजेच डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस, पोलीस, महसूल कार्यालयातील अधिकारी व इतर सर्व कर्मचारी आपापल्या परीने कोरोनाशी झुंजताहेत व दोन हात करताहेतच. परंतु, त्यातही डॉक्टरची भूमिका ही सेंटरस्प्रेड व अवर्णनीय ठरतेय, हे वेगळं सांगायला नको. आज देशभरात बर्‍याच डॉक्टरांनी कोविड 19 शी सामना करताना आपले प्राण गमावलेत व कित्येक डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून त्याच्याशी दोन हात करताहेत, लढा देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्या डॉक्टर्स डेला आमच्या, आपणा सर्वांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मानवी आजार व विकारांचा डॉक्टर... ही पदवी प्राप्त केल्यानंतर डॉक्टर आपले जीवन रुग्णसेवेस समर्पित करतात. तो किंवा ती मानवजातीच्या वेदना व दुःख दूर करतात. ते त्यांना वेगवेगळ्या आजारांतून मुक्त करतात. इतरांचे जीवन सुखकर, चांगले व निरोगी करण्यासाठी ते झटतात व प्रयत्न करतात. इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डॉक्टरला मात्र वैयक्तिक जीवनात अनेक प्रकारच्या त्यागाला सामोरं जावं लागतं!

आपल्या जीवनात डॉक्टरांना महत्त्व आहे, हे समजून घेण्यासाठी व त्यांच्यापरी आदर दाखवण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. वर नमूद केल्याप्रमाणे भारतात हा दिवस 1 जुलैला साजरा केला जातो.

आपल्या देशात अनेक उत्तमोत्तम डॉक्टर आहेत व होऊन गेले आहेत. भारतरत्न डॉ. बिधान चंद्र रॉय हे आपल्या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचं योगदान केवळ अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारतात डॉक्टर्स डे  एक जुलैला साजरा केला जातो. 1 जुलै 1882 ला त्यांचा जन्म बिहार राज्यातील पाटणा येथे झाला, तर याच दिवशी 80 वर्षांनंतर त्यांचा मृत्यू. 1991 मध्ये तत्कालीन भारतीय सरकारने त्यांना सर्व भारतीयांतर्फे आदराची श्रद्धांजली म्हणून हा दिवस डॉक्टर्स डे असा साजरा करण्यास सुरुवात केली व त्यानंतर ती प्रथा चालू झाली. डॉ. बी.सी. रॉय यांनी 1911 मध्ये लंडन येथे एम.आर.सी.पी. व एफ.आर.सी.पी.ही डिग्री घेतल्यानंतर भारतात रुग्णसेवा चालू केली. ते एक उत्तम चिकित्सक होतेच, पण त्याचबरोबर नावाजलेले स्वातंत्र्य सेनानी होते. ते पश्‍चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. 1961 ला त्यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न बहाल केलं गेलं!!

कोरोना पँडेमिकच्या दुष्टचक्रामध्ये डॉक्टरांना अनेक दुषणांना सामोरं जावं लागत आहे. खासगी दवाखाना एखाद्या सोसायटीत असेल तर तिथल्या लोकांचं दडपण, दवाखान्यात येऊन गेलेल्या रुग्णास कोरोना झाला तर त्याचं दडपण, स्वतःस कोरोना झाल्यास त्याची नामुष्की, शास्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरने स्वतःची कोरोना टेस्ट करावी की नाही, याच्यावर उलट सुलट चर्चा, उपचारांची व्यावसायिक फी व इतर बिलांबाबतीत नाहक चर्चा, सरकारचं -मीडियाचं प्रेशर या सर्व बाबी ध्यानात घेऊन या वर्षी डॉक्टर्स-डेची थीम (संकल्पना) आत्मसन्मान दिवस ही असेल, असं इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने जाहीर केलंय. तसं पाहता, प्रत्येक वर्षी आरोग्यविषयक एक वेगळी संकल्पना असते; परंतु सध्या परिस्थिती वेगळी आहे. रुग्णसेवेस सर्वस्व अर्पण करुनदेखील आज डॉक्टरांना नैराश्याला सामोरं जावं लागत आहे, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल आणि म्हणूनच आत्मसन्मान दिवस ही थीम आहे, असं या असोसिएशनचा एक सदस्य म्हणून मला म्हणावेसे वाटतेय.

भारतरत्न डॉ. बी.सी. रॉय यांचा काळ वेगळा होता. डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रुप असं म्हटलं जायचं तेव्हा! आज सगळीकडे व्यावसायिकता आली असली, तरी आपण उपचार करत असलेल्या रुग्णाचं वाईट व्हावं असं कोणत्याच डॉक्टरला वाटणार नाही. प्रत्येक व्यवसायात काही  ब्लॅक शिप्स असतातच; परंतु वैद्यकीय व्यवसायातील या मोजक्याच  काळ्या मेंढरांमुळे आज डॉक्टरी पेशाला काळिमा लागलेली आहे. खरं सांगायचं झालं तर माणुसकी, प्रामाणिकता, कळकळ, संवेदना आजही या पेशात शिल्लक आहे. स्वतःचं पूर्ण कौशल्य, बुद्धी, वापरून कधी-कधी वेळेचं, खाण्या-पिण्याचंही भान न ठेवता जवळ-जवळ सर्वच डॉक्टर्स अनेक दुर्धर आजाराने पीडित रुग्णांना बरे करतात. आपले सर्वस्व पणाला लावून काम करतात; परंतु सर्व काही चांगलं करण्याच्या हेतूने उपचार होऊनदेखील एखादा आजार जेव्हा रुग्णाच्या जीवावर बेततो, तेव्हा जी डॉक्टरची कुचंबणा होते, ती थांबावी... किमान एवढे तरी या योग्य व महत्त्वाच्या दिवशी वाटते. अशा प्रकारच्या काही वाईट प्रसंगी जेव्हा एखाद्या डॉक्टरला मारहाण होते अथवा रुग्णालयाची तोडफोड, नासधूस होते, तेव्हा त्या डॉक्टरने बरे केलेल्या सर्व रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्या अडचणीत असलेल्या डॉक्टरच्या पाठीशी ठाम उभं राहावं, असं आवाहन या दिवशी करावंसं वाटतंय!

या दिवशी आम्ही डॉक्टर्स व आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या वतीने आरोग्यविषयक बरेचसे सामाजिक उपक्रम राबवतो. मग तो एखादा मेडिकल चेकअप कॅम्प असेल, अथवा मुला-मुलींसाठी शाळा कॉलेजेसमध्ये आरोग्यविषयी चर्चा सत्रे असतील किंवा स्त्रियांना आरोग्यविषयी मार्गदर्शन असेल. नमूद करण्यासारखी आणखीन एक गोष्ट... आम्ही या दिवशी न चुकता रक्तदान करतो. दुसर्‍यांना सांगण्यापूर्वी स्वतः हे श्रेष्ठ दान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मागील वर्षी वृक्षारोपणही केले होते. या दिवशी संध्याकाळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन असते आणि ते म्हणजे ज्या डॉक्टरांनी या शहरातील लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून अहोरात्र रुग्णसेवा दिली, अशा वरिष्ठ डॉक्टरांचा सन्मान! कोरोनाच्या कोपामुळे यंदा कदाचित काही गोष्टी शक्य होणार नाहीत; परंतु पुरेसा न्याय या दिवसाला देण्याचा मात्र आमचा नक्कीच प्रयत्न राहील.कोरोना महामारीच्या अविस्मरणीय दुष्ट काळात कोरोनाबाधित रुग्णांचे उपचार करणे जितके गरजेचे होते किंबहुना त्याहून अधिक गरज होती नॉन कोविड रुग्णांचे उपचार करणे व त्यांची योग्य ती काळजी घेणे. आणि, नेमका हाच समतोल साधलाय सर्व सरकारी व खासगीतील डॉक्टरांनी. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आज खर्‍या अर्थाने पूर्णत्वास आल्यासारखी वाटतेय. असोसिएशनच्या वतीने कोविड 19 रुग्णांची सेवा व उपचार करणार्‍या डॉक्टर व परिचारिकांचा यथोचित गौरव तर आम्ही करूच, पण कोविडेतर आजारांच्या रुग्णांसाठी अविरत रुग्णसेवा देणार्‍या सर्व डॉक्टर व परिचारिकांचाही या निमित्ताने योग्य तो सन्मान केला जाईल.

खरं तर, अशा प्रकारचा वरिष्ठ डॉक्टरांचा, कोविड वॉरियर्स, नॉन कोविड वॉरियर्सचा सन्मान जनतेने करावयास हवा! या दिवशी अनेक शुभेच्छा याव्यात, असेही राहून-राहून वाटत असतं! येतातही. पण, तुरळक. वीस वर्षांच्या कालावधीत एक सद्गृहस्थ या दिवशी संध्याकाळी न चुकता शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ घेऊन येतात व सर्वांतर्फे आभार मानून जातात, ही मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट. त्यानंतर मात्र कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं!

आज माझ्याकडून माझ्या सर्व डॉक्टर बंधू व भगिनींना डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी डॉक्टर्स डे  मित्रहो, डॉ. बी.सी. रॉय यांच्या जवळपासही आपल्याला जाता येणार नाही कदाचित. परंतु, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून व त्यांचे पुण्यस्मरण करुन रुग्णसेवेचा हा वसा असाच चालू ठेवुयात  आज डॉक्टर्स डेच्या दिवशी सर्व रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि सर्वांना एकच विनंती करावीशी वाटते आणि ती म्हणजे, जरा समजून घ्या, आम्हाला... डॉक्टरांनाही!! धन्यवाद...

लेखक : एम डी, बालरोगतज्ज्ञ.

डायरेक्टर,

आनंदी मॅटर्निटी अँड चाईल्ड हॉस्पिटल.

अध्यक्ष, आयएमए, अलिबाग

माजी अध्यक्ष, आयएपी, रायगड

9970666317