1. देशात कोरोनाचा आलेख खाली का येत नाही?

डॉ. गुलेरिया - कोरोनाचा संसर्ग आता केवळ महानगरं आणि मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण देशात पसरला आहे. छोटी शहरंच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच कारणामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. सुरूवातीच्या काळात परदेशातून आलेल्या लोकांमार्फत महानगरांमध्ये पसरलेल्या कोरोना संसर्गाने संपूर्ण देशाला कवेत घेतलं आहे. आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या बघता आलेख खाली येण्याआधी काही महिने रुग्णसंख्येत वाढ होणं अपेक्षितच होतं. आपल्याकडे रुग्णसंख्या वाढणार आहे. मात्र, प्रति दहा लाख लोकांमागे कोरोना रुग्णांची संख्या पाहिल्यास हा आकडा फार मोठा नाही. असं असलं तरी रुग्णांची एकूण संख्या बरीच जास्त आहे, हे ही खरंच.

2. भारताच्या काही भागांमधला रुग्णांचा खूप मोठा आकडा बघता तिथे कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं म्हणता येईल का?

- कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. देशाच्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने दुसरी लाट येण्याला बर्‍याच गोष्टी कारणीभूत आहेत. यापैकी एक कारण म्हणजे, चाचण्यांचं प्रचंड प्रमाण. आपण चाचण्यांचा वेग वाढवला आहे. भारतात दररोज दहा लाखांहून अधिक कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र, लोकांचा निष्काळजीपणा हे कोरोना संसर्ग वाढण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण आहे, असं मला वाटतं. आपल्यापैकी बरेचजण कोविड बिहेवियर फटिगची स्थिती अनुभवत आहेत. सुरूवातीच्या काळात स्वत:च्या सुरक्षिततेबाबत अत्यंत जागरूक असणारे लोक आता या सगळ्याला वैतागले आहेत. झालं तेवढं पुरे झालं, खूप सोशल डिस्टन्सिंग पाळलं, मास्क घातला. आता बास... या भावनेमुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा घालणं अडचणीचं बनलं आहे. दिल्लीसारख्या शहरातले लोक मास्क घालत नाहीत, गर्दी करतात. कोरोनापूर्व काळासारखी गर्दी, वाहतूक कोंडी आता पुन्हा दिसू लागली आहे. या सगळ्याची परिणती म्हणून रुग्णसंख्या वाढत आहे. दिल्लीतल्या जवळपास 70 टक्के जनतेला कोरोनाचा धोका संभवत असल्याचं सिरो सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

3. सगळेजण कोरोना लसीकडे डोळे लावून बसले आहेत. कोरोनावरील लस नेमकी कधी उपलब्ध होईल?

- सध्या कोरोनाच्या विविध लसींवर काम सुरू असून, त्यात भारतातल्या तीन लसींचा समावेश आहे. या लसी परीक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, कोणतीही लस सुरक्षित असणं सर्वात महत्त्वाचं आहे. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेला रशियाच्या स्पुटनिक 5 या लसीचा अहवाल पाहिल्यास असं आढळून येतं, की त्यांनी अगदी मोजक्या लोकांवर या लसीचं परीक्षण केलं आहे. या लसीचे अगदी किरकोळ दुष्परिणाम असून, यामुळे मानवी शरीरात अँटीबॉडीज तयार होत असल्याचं रशियन शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, तिसर्‍या टप्प्यातल्या चाचण्या मोठ्या समुदायावर केल्यानंतरच कोरोनावर लस उपलब्ध झाल्याचं आपण ठामपणे म्हणू शकतो. कोरोनावरील लस विकसित होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा काळ जावा लागणार आहे. सर्व काही सुरळीत झालं तर या वर्षाच्या अखेरीपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अर्थात, जगाच्या लोकसंख्येचा विचार करता काही अब्ज डोस उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला बराच वेळ जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोस तयार करणं, हे ही एक आव्हान असेल. शिवाय, गरजूंना सर्वात आधी ही लस उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

4. आता मेट्रो तसंच सार्वजनिक वाहतूक सुरू होत आहे. सध्याच्या काळात मेट्रोतून प्रवास करण्यात किती जोखीम आहे?

- सामाजिक दुरावा, योग्य पद्धतीने मास्क घालणं तसंच दांडे, आसनं किंवा मेट्रोतल्या कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुणं किंवा सॅनिटाईज करणं अशा नियमांचं पालन केल्यास प्रवासादरम्यान धोका नाही. पण, खचाखच भरलेली मेट्रो, सॅनिटायझेशन सुविधांची वानवा अशी परिस्थिती उद्भवल्यास खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मेट्रो सुरू झाल्यामुळे काही बिघडणार नाही. मात्र, आपल्या चुकीच्या वागण्यामुळे बरंच काही बिघडू शकतं. लोकांकडून मास्क घालण्याच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही यासाठी एक व्यवस्था निर्माण करायला हवी. ही व्यवस्था संबंधित अधिकार्‍यांनी विकसित करायला हवी. मात्र, मास्क न घातलेल्या लोकांकडून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी कारवाई होणं आवश्यक आहे.

5. बाहेर प्रवास करताना हातमोजे किंवा ग्लोव्हज घालणं गरजेचं आहे का?

- तुम्ही वारंवार योग्य पद्धतीने हात सॅनिटाईज करत असाल तर ग्लोव्हज घालणं गरजेचं नाही. ग्लोव्हज घालणं ठीक आहे. मात्र, त्यांचंही निर्जंतुकीकरण व्हायला हवं. ग्लोव्हजवरही कोरोनाचा अधिवास असू शकतो. त्यामुळे ग्लोव्हज घालून  नाक किंवा डोळ्यांना स्पर्श करू नका. याशिवाय हॉटेल्स, बार, पबसारख्या ठिकाणी खूप काळजीपूर्वक प्रवेश करायला हवा. रेस्टॉरंट्स, बार, पब्जनी सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं. सांगायचा मुद्दा हा की तुम्ही कुठेही गेलात तरी कोरोनाकाळातले नियम पाळा. याबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नका. नियम पाळण्यात झालेल्या छोटाशा चुकीमुळे तुम्ही कोरोनाबाधित होऊ शकता, हे लक्षात ठेवा. मित्र, आप्तेष्टांसोबत भेटीगाठी, भोजन समारंभ यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अनेकपटींनी वाढतो. इथे लक्षणं नसणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे इतरांना लागण होऊ शकते. लोकांनी आयोजित केलेल्या छोट्या समारंभांनंतर उपस्थितांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशा समारंभांना जाणं टाळलेलंच बरं.

6. प्राथमिक शाळा खरोखरच सुरू करता येतील का?

- कोरोनाचा आलेख झपाट्याने  खाली आल्याशिवाय एखाद्या विभागातल्या शाळा सुरू करणं खूप धोक्याचं ठरू शकतं. कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणं योग्य ठरणार नाही. सामाजिक दुरावा, सतत मास्क घालून राहणं, वारंवार हात धुण्यासारख्या नियमांच्या पालनाची अपेक्षा लहान मुलांकडून करता येणार नाही. शाळेत मुलांना कोरोनाची लागण होऊन घरात तसंच परिसरात प्रसार होऊ शकतो. शाळा सुरू करण्याची ही योग्य वेळ नाही. आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे.

7. कोरोनाची कोणतीही लक्षणं नसणार्‍या रुग्णांचं फुफ्फुस खराब होऊ शकतं का?

- मधल्या काळात याबाबत संशोधन करण्यात आलं. तसंच काही घटनाही घडल्या. लक्षणं नसणार्‍या रुग्णांच्या फुफ्फुसाचं सीटी स्कॅन केल्यानंतर 20 ते 30 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर चट्टे आढळले होते. अर्थात, यापैकी बहुसंंख्य जणांच्या फुफ्फुसावरील चट्टे  कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आपोआप निघूनही गेले. काही रुग्णांच्या फुफ्फुसाचं मात्र थोड्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे कोणतीही लक्षणं नसणार्‍या रुग्ग्णांनीही काळजी घ्यायला हवी.

8. कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचा धोका किती जास्त आहे?

जगात एकदा कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याची प्रकरणं आढळून आली आहेत. मात्र, कोरोनाचा पुन्हा संसर्ग होणं ही आजघडीला तितकी काळजी करण्यासारखी बाब नाही. कोरोना रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज तीन ते सहा महिन्यांपर्यंत संरक्षण देत असल्याची बाब काही संशोधनांमधून समोर आली आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात म्हणजे नऊ ते बारा महिन्यांमध्ये नेमकं काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. 2021 मध्ये कोरोनाचा धोका संपलेला असेल किंवा कसं, याबाबत निश्‍चितपणे काहीच सांगता येणार नाही. मात्र, पुढील वर्षात कोरोनाचा आलेख उतरणीला लागून जवळपास सपाट झालेला असेल, एवढं निश्‍चितपणे सांगता येईल. पुढील वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढणार नाहीत. कोरोना महामारी संपायला आणखी काही महिने जावे लागणार आहेत. हा कालावधी 2021 च्या पूर्वार्धापर्यंत असेल, असा आमचा कयास आहे.

 

अवश्य वाचा