चीनमध्ये अनेक वर्षांपासून असा मतप्रवाह आहे की, भारत हा एक कमकुवत देश आहे. इथे निर्णय प्रक्रियेत वेळ वाया जातो. या कालावधीत चीन स्वतःच्या फायद्याच्या स्थितीत पोहोचतो. याच कारणामुळे वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करून चीनने स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र 1962 चा भारत आणि आताचा भारत यात प्रचंड फरक आहे. भारत फक्त बचावात्मक धोरण अवलंबत राहील, हा चीनचा गैरसमज ठरला आहे. आणखी धाडसी प्रयोग केल्यास चीन-भारत संघर्ष वेगळ्या स्थितीत पोहोचू शकतो. भारत आक्रमक होऊ शकतो, अशी शक्यता जागतिक युद्धस्थितीचे अभ्यासक गॉर्डन जी चँग यांनी अलिकडेच व्यक्त केली. त्यांनी परिस्थितीचं भान राखण्याचा सल्ला चीनला दिला आहे. चीनच्या दांडगाईचं गुपित त्याच्या भौगोलिक स्थानामध्ये आहे. चीनच्या सीमेवर 18 देश आहेत; परंतु त्याचं भांडण आहे 23 देशांशी. यावरून त्याच्या युद्धखोर मानसिकतेची कल्पना येऊ शकेल. ही मानसिकता एका मोठ्या युध्दाच्या दिशेने जाईल का, प्रसंगी तिसर्‍या महायुध्दाचे पडघम वाजू लागतील का, असा प्रश्‍न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्‍लेषक तपासून पाहू लागले आहेत.

या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्यापुर्वी चीनी मुत्सद्देगिरीचं मूळ शोधावं लागेल. त्याची सुरुवात तिबेटकडून होते. लष्करीदृष्ट्या उंचावरले तिबेट हाती असल्यामुळे चीन बलाढ्य झाला. कारण खालच्या खोर्‍यामधल्या प्रदेशावर उंचावरून तोफा डागायला शत्रू येऊ शकत नाही. तिबेट हातात नसता तर मध्य आशिया आणि तिथून पुढे जमिनीच्या मार्गाने युरोपपर्यंत पोहचायचं स्वप्नही चीन बघू शकला नसता. खरं तर, तिबेट आणि भारताचं नातं अतूट आहे. कारण, भारतामध्ये जन्मलेल्या गौतम बुद्धांचा धर्मच तिबेटमध्ये पाळला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या तिबेटची नाळ भारताशी जोडलेली आहे; पण आजच्या घडीला राजकीयदृष्ट्या तिबेटवर चीनचं अधिपत्य आहे. तिबेटी जनतेच्या स्वातंत्र्याच्या आशा आकांक्षा धुडकावून आणि गरज पडेल तसं त्यांना जबरी जुलमी टाचेखाली भरडून आपली सत्ता राबवण्यास चीननं कमी केलं नाही. जमिनीवर दादागिरी करणारा चीन आपल्या दक्षिणेकडील समुद्रावर अनिर्बंध हक्क गाजवू पाहात आहे. आपल्या किनार्‍यापासून जगापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला दक्षिण चीन समुद्र मुठीत हवा आहे. तसं झालं तर तो एका बाजूला पॅसिफिक महासागरापर्यंत आणि दुसरीकडे हिंदी महासागरापर्यंत पोहोचू शकतो. या समुद्रावर स्वामित्व गाजवण्यासाठी चीननं तिथल्या बेटांवर हक्क सांगितला आहेच; शिवाय कृत्रिम बेटंही बांधली आहेत.

स्वतःच ठरवलेल्या रेषांच्या पलीकडे कोणतंही जहाज येता कामा नये आणि कोणतंही विमान उडता कामा नये, असा नियम चीनने जारी केला आहे. तसं करताना आंतरराष्ट्रीय संकेत, नियम, कायदे पायदळी तुडवले आहेत. चीनच्या या खेळीमुळे जपान, व्हिएतनाम, फिलिपिन्ससारखी राष्ट्रं चीनच्या विरोधात गेली आहेत. जपानने चीनमधली गुंतवणूक काढून घेऊन दुसर्‍या देशांकडे वळवली आहे. आता दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या विमानवाहू नौका गस्त घालत आहेत. त्यामुळे चीनचं पित्त आणखी खवळलं. अमेरिकेनं युरोपमध्ये सैन्यकपात करून आखाती राष्ट्रांमध्ये आणि दक्षिण चीन समुद्र परिसरातल्या देशांकडे लक्ष वळवलं आहे.

इतिहासात मागे जाऊन पाहिलं असता असं लक्षात येतं, की अमेरिकेच्या बोटचेप्या भूमिकेचा पूर्ण फायदा उठवत चीननं स्वतःला आर्थिक महासत्तापदापर्यंत खेचत नेलं. आज चीन भारत, मंगोलिया, जपान, तैवान अशा देशांना आपल्या कब्जात ठेवू इच्छित आहे; मात्र चीन जसा बदलला तसेच हे देशही बदलले. चीनची दादागिरी आता ना भारत सहन करू शकत, ना लहानसा तैवान. यावरून चीनला आपल्या शेजारील देशांवर दादागिरी करता येणार नाही, हे उघड आहे. भारतीय लष्करामधील आणि इतर सुरक्षा दलांच्या जवानांची एकूण संख्या 34 लाख 62 हजार 500 इतकी आहे तर चिनी लष्करामधील जवानांची संख्या 26 लाख 93 हजार इतकी आहे. देशाच्या संरक्षणासाठी चीन भारताच्या संरक्षण निधीच्या पाचपट निधी खर्च करतो. भारताचं संरक्षण बजेट हे 55.2 अब्ज डॉलरचं असून, चीनचं हेच बजेट 224 अब्ज डॉलर इतकं आहे.

जगात एकट्या पडलेल्या चीनविरोधात अमेरिका कधीही युद्धाचा शंखनाद करू शकतो, याचीही जाणीव जिनपिंग यांना आहे. म्हणूनच चीन स्वतःच्या ताकदीमध्येसुद्धा दिवसेंदिवस भर घालत आहे. आपल्या जीडीपीचा मोठा पैसा चीन सरकारनं शस्त्र विकसित करण्यासाठी खुला केला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे, चीनने पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता विकसित केली आहे. याचा अर्थ चीनची लढाऊ विमानं आता जमिनीवर न उतरता दिवसरात्र इतर देशांच्या वायूसेनेविरोधात लढू शकतात. इथे लक्षात घ्यायला हवं, की गेल्या पाच मेपासून चीन गलवान खोर्‍यात ठाण मांडून बसला आहे. 15 जूनची चकमक आणि 29-30 ऑगस्टला झालेला गोळीबार पाहता या घटनांना दुय्यम लेखून चालणार नाही. गेल्या 45 वर्षांमध्ये दोन्ही देशांदरम्यान कधीही गोळीबार किंवा सैन्यांमध्ये चकमक झाली नव्हती. चीनमध्ये सध्या अंतर्गत प्रश्‍नांनी डोकं वर काढलं आहे. तिबेट, हाँगकाँगच्या प्रश्‍नावरून चीन अडचणीत आला आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांना पक्षांतर्गत विरोधकांनी हैराण केलं आहे. त्यातच चीनने कोरोनाच्या विषाणूची प्रयोगशाळेत निर्मिती केल्याचा पुरावा आता चीनचेच साथरोगतज्ज्ञ ली यांनी देण्याचं जाहीर केलं आहे.

याच सुमारास जागतिक कोंडी आणि भारतानं घेतलेली विरोधी भूमिका यामुळे चीन खवळला आहे. जागतिक महासत्ता होण्यात भारताचाच मोठा अडथळा आहे, असं चीनला वाटतं. त्यामुळे तर चीनने भारताला वेढा घातला आहे. नेपाळ, पाकिस्तानसह सर्व सीमांवर सैन्य तैनात केलं आहे. चीनची आगळीक लक्षात घेऊन भारतानेही सीमेवर युद्ध साहित्य आणि सैनिक तैनात ठेवले आहेत. एकट्या गलवान खोर्‍यात एक लाख सैन्य तैनात करण्यात आलं आहे. चीनने तिथे ऑप्टिकल फायबर यंत्रणा टाकली आहे. भारत आणि चीनने सीमाभागात पायाभूत सुविधा वाढवण्याची स्पर्धा चालवली आहे. सैन्याच्या हालचाली वेगाने व्हाव्यात, यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे लष्करी अधिकारी पातळीवर चर्चा, दुसरीकडे राजनयिक पातळीवर भेटीगाठी आणि तिसरीकडे मुत्सद्दी चर्चा असे सर्व मार्ग अवलंबले जात असले तरी अजून सीमेवरचा तणाव निवळायला तयार नाही. चीनची जागतिक पातळीवर अधिक कोंडी होत गेली, तर तिसरं महायुद्ध होण्याची भीती काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

अमेरिका आणि चीनदरम्यान सुरु असलेलं व्यापारयुध्द पाहता पाहता शस्त्रसज्ज होऊन आपली ताकद एकमेकांना दाखवण्याच्या दिशेने वळलं आहे. भारताचा प्रत्येक शत्रू किंवा भारतावर खप्पामर्जी झालेला प्रत्येक देश आपल्या बाजूला ओढण्याकडे चीनच कल वाढला आहे. आफ्रिकी राष्ट्रं किंवा इतर गरीब राष्ट्रांना विकासकामांचं किंवा भरपूर कर्जाचं आमीष दाखवून आपल्या बाजूने ओढण्याकडे चीनचा कल वाढतो आहे. चीनने एखादी मोठी आगळीक करण्याचा अवकाश, दोन्ही बाजुंमध्ये जणू ठिणगीच पडेल आणि संघर्ष झडू शकेल. या वळणावर जागतिक हीत जपायचं की विस्तारवादाचं, विकासाच्या महत्त्वाकांक्षेचं स्वप्न पूर्ण करायचं, हे ज्या त्या देशाला ठरवावं लागणार आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त