उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण शुक्ल तृतीयेला ङ्गतीजफचा उत्सव साजरा केला जातो. शिव आणि पार्वतीचं मिलन या दिवशी झालं, अशी आख्यायिका उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागामध्ये सांगितली जाते. देवी पार्वतीनं व्रत केलं आणि 108 व्या जन्मी तिचा भगवान शंकराशी विवाह झाला. देवी पार्वती तीज माता म्हणून ओळखली जाते. या भागामध्ये तीज या उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. राजस्थानात या तीजच्या पूर्वसंध्येला विवाहित लेकीला आणि तिच्या सासरच्यांना धीवर (राजस्थानी मिठाई) मेहेंदी, बांगड्या पाठवल्या जातात. याला सिंघाटा असं म्हणतात. राजस्थानात या तीजला छोटी तीज किंवा सिंघारा तीज ही म्हणतात. निसर्ग हिरवाईनं नटला असल्यामुळे या तीजला हरियाली तीज असंही म्हटलं जातं. निसर्गाच्या हिरवाईशी नातं सांगत इथल्या महिलाही हिरव्या रंगाचेच कपडे घालून हातावर मेहेंदी काढून हिरव्या बांगड्या घालत साजशृंगार करतात. लहान मुली, महिला तीज आणि पाऊस यांचा उल्लेख असणारी गाणी गात नाचतात. महिला एकत्र येऊन रंगीलो सावण आयो रं, सुरंगी सावण आयोरे, आयो आयो, आयो तीज त्योहार रंगशा आंगणमेफ अशा अनेक गाण्यांवर फेर धरतात. थट्टा मस्करी करतात. पुरुषांना मात्र या धमाल मस्तीमध्ये नो एन्ट्री  असते. या दिवशी राजस्थानात तीजमातेच्या मिरवणुका जागोजागी काढल्या जातात. भजन गाणी म्हणत, नाचत, लहान-थोर सगळेच या मिरवणुकीत सामील होतात. यात पुरुषही सहभागी होतात.

हरियाणा-पंजाब भागात तीज आणि पावसाच्या आगमनाची सांगड घालण्यात आलीय. तीजच्या दिवशी आपली भूमी सुजलाम् सुफलाम् होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते. इथं तीजला झोक्यांचा सणही म्हटलं जातं. तीज जवळ येऊ लागते, तसतसे झाडांना झोपाळे बांधले जातात. आणि लहान-मोठ्या सगळ्याजणी छान गाणी म्हणत उंचच उंच झोके घेऊ लागतात. पंजाब प्रांताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, महिलांचं गड्डानृत्य स्त्रियांच्या भांगड्याचाच हा प्रकार आहे. या लोकनृत्यात खूप वेगवान ठेक्यावर फेर धरत, हालचाली आणि टाळ्या देत नृत्य केलं जातं. स्त्रीसुलभ नाजूकता आणि जोरकसपणा यांचा मिलाफ साधत हे नृत्य करतात. गाणी आपल्या नेहमीच्याच रहाटगाडगं, सासू-सून, नणंद-भावजय संबंध कानपिचक्या, मजा मस्तीची. तुम्हाला जर का गिड्डा बघायची संधी मिळाली, तर या नृत्यात सहभागी होण्याचा मोह आवरणार नाही. पंजाब, हरियाणा राज्य सरकारांच्या वतीनं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाविद्यालय आणि शाळांमध्येही विशेष कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून सादर केले जातात. रॉक गार्डनमध्येही तीजच्या कार्यक्रमांकरिता विशेष सोय केली जाते.

बिहार आणि झारखंडमध्ये श्रावण महिन्याला शंकराचा महिनाफ म्हणून ओळखल जातं. श्रावणात या भागात शिवाच्या आराधनेला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला कानाकोपर्‍यातून लोक पायी चालत येत विठू माऊलीचं दर्शन घेतात, साधारण असाच काहीसा प्रकार बिहार झारखंड, उत्तर प्रदेशमध्येही पाहायला मिळतो. आपल्या खांद्यावर कावडीमध्ये गंगेचं पाणी वाहून मैलोनमैल चालत येऊन, हे पाणी शिवलिंगावर वाहिलं जातं. काशी विश्‍वनाथ, देवघरचं वैद्यनाथ या उत्तरेकडील प्रसिद्ध शिवदेवस्थानांमध्ये कावडीतून पाणी आणून वाहिलं जातं. काही जण आपल्या भागातील शिवदेवस्थानांमध्येही पाणी वाहतात. मात्र, गंगेचं पाणी एकदा का कावडीत भरलं की त्या कावडीला जमिनीवर ठेवायचं नाही. कावडीतून असं पाणी वाहणार्‍या भाविकांना कावरियाँ तर या यात्रेला कावरयात्रा म्हणतात.

ओडिशामध्ये श्रावण पौर्णिमा आपल्या गायी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. कृष्णाचा भाऊ बलराम याचा जन्मही याच दिवशी झाला, असं ओडिशामध्ये मानतात. गाम्हपौर्णिमा म्हणून हा दिवस ओळखतात. गोधनाला छान आंघोळ घालून त्यांना सजवतात. महत्त्वाचं म्हणजे, गायी, बैलांच्या शिंगाला राखी बांधतात. त्यांना पक्वान्न खाऊ घालतात. ओडिशाच्या सीमेवर असणार्‍या आंध्र प्रदेशामधील गावांमध्येही हल्ली हा सण साजरा केला जातो.

आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात नागरचतुर्थी आणि नागर पंचमीचे व्रत करतात. माहेरवाशिणी माहेरी येतात. चतुर्थीला उपवास केला जातो. आणि पंचमीला देवळात किंवा वारुळाच्या येथे नागपूजा करण्यात येते. तीळ गुळाचे लाडू, लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. या दोन्ही प्रांतांमध्ये श्रावणात शिवपूजेसोबतच गौरी आणि लक्ष्मीपूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. नवविवाहिता पहिली पाच वर्ष श्रावणातल्या मंगळवारी मंगळा गौरीचं व्रत करतात. शुक्रवारी महिला वर्ग लक्ष्मीपूजनात दंग असतो. तिसर्‍या शुक्रवारी लक्ष्मीची पूजा असते. कर्नाटकाच्या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये या दिवशी खूप उत्साहाचं वातावरण असतं. दुसर्‍या दिवशी व्रताच उद्यापन करतात. आंध्र भागात कांही घरांमध्ये अष्टमीच्या दिवशी स्वर्ण गौरीपूजन केलं जातं. या वेळी 108 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. यात एक पदार्थ पाच प्रकारे करुन म्हणजे पाच प्रकारच्या चटण्या, पाच प्रकारच्या भजी, भाताचे पाच प्रकार खिरीचे पाच प्रकार अस करत करत 108 पदार्थ बनवतात. कृष्ण जन्माष्टमी वैष्णव पंथीयांकडे घरगुती स्वयंपाक आणि देवळांमध्ये साजरी केली जाते. कर्नाटकात ज्या कुटुंबांचं कुलदैवत व्यंकटेश, निम्मप्पा आहे. त्या कुटुंबांतील मुलं व्यंकटरमणा गोविंदा म्हणत, शनिवारी पाच घरी भिक्षा मागतात. या भिक्षेत तांदूळच दिला जातो. घरी आल्यावर या तांदळाला देवासमोर ठेवून मग भात बनवून खातात, तर अमावस्येला  भीमानावास्या म्हणतात. भीमासारखा शक्ती असणारा पती मिळावा म्हणून कुमारिका, तर पतीला भीमासारखी शक्ती मिळावी याकरिता विवाहिता या दिवशी उपवास करुन भीमाची पूजा करतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून, कामाच्या रहाटगाड्यातून महिलांना विरंगुळा मिळावा, एकत्र येऊन मजामस्ती करावी, हाच या उत्सवांचा हेतू.

 

अवश्य वाचा