भारताने आतापर्यंत दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे भारंभार पुरावे दिले. त्याच्या कराचीतल्या निवासस्थानाचे पत्ते दिले. दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली; परंतु पाकिस्तानने कायम दाऊद पाकिस्तानमध्ये नाहीच, असं पालुपद लावलं होतं. नदीतून जाणारी माकडीण आपल्या पिलाला जशी तोपर्यंत वर उचलून धरते, जोपर्यंत तिच्या नाका-तोंडात पाणी घुसत नाही; परंतु एकदा का नाका-तोंडात पाणी जायला लागले, की तीच माकडीण आपल्या पिलाला पायाखाली घेते. पाकिस्तानचं आता तसंच झालं. पाकिस्तान सरकारने देशातल्या 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर निर्बंध लादले. या यादीत दाऊदचा समावेश केला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे का होईना, दाऊद आपल्याच देशात असल्याचं मान्य केलं आहे. पाकिस्तान सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीमध्ये डॉन दाऊदचा समावेश आहे. आता पाकिस्तान ही बाब नाकारत असला तरी त्याचा कराचीचा पत्ता या यादीत नमूद करण्यात आला आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांपासून दाऊद भारतासाठी मोस्ट वाँटेड डॉनफ आहे.

दाऊदसोबतच जमात-उद्-दावा संघटना आणि हाफिज सईद, जैश- ए-  मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर, तालिबान, दाएश, हक्कानी ग्रुप, अल कैदा आणि इतरांचा या यादीमध्ये समावेश आहे. या संघटना आणि नेत्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असून त्यांची बँक खातीही गोठवण्यात येणार आहेत. पॅरिसमधल्या फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)ने जून 2018 मध्ये पाकिस्तानचा समावेश ङ्गग्रे लिस्टफमध्ये केला होता. पॅरिसमध्ये कार्यरत असलेला हा गट जगभरातल्या देशांमधली पैशांची अफरातफर-मनी लाँडरिंग, दहशतवादी गटांना होणारा वित्तपुरवठा यावर लक्ष ठेवतो. फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या या ग्रे लिस्ट मध्ये पाकिस्तानसोबतच अल्बेनिया, बहामाज, बार्बाडोस, बोट्स्वाना, कंबोडिया, घाना, आईसलंड, सीरिया, युगांडा, येमेन, झिम्बाब्वे हे देशदेखील आहेत. जी-7 शिखर परिषदेत या गटाची स्थापना करण्यात आली होती. ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट होणार्‍या देशांवर हा गट अधिक लक्ष ठेवतो. परिणामी, अशा देशांना काही उपाययोजना कराव्या लागतात. एखादा देश ग्रे लिस्टमध्ये आल्यास जागतिक नाणेनिधी, जागतिक बँकेकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीवर आणि इतर देशांसोबतच्या व्यापार संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 2019 च्या अखेरपर्यंत पाकिस्तानने यासंदर्भातल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असं फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने सांगितलं होतं; पण त्यानंतर कोरोनाच्या साथीमुळे पाकिस्तानला मुदतवाढ देण्यात आली. या यादीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणून पाकिस्तानने या 88 गटांवर आणि त्यांच्या नेत्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत.

दाऊद  पाकिस्तानमध्ये असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा करण्यात आला होता; पण पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले होते. आता पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचं पाकिस्तान सरकारने मान्य केलं. पाकिस्तान सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या यादीत दाऊदचा कराचीतला पत्ता व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टनफ असा देण्यात आला आहे. दाऊदकडे 14 पासपोर्ट आहेत. कराचीमध्ये त्याची तीन घरे आहेत. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद दुबईला पळून गेला आणि नंतर पाकिस्तानला गेला. मुंबईतल्या स्फोटांमध्ये 257 लोक ठार झाले तर 1400 हून अधिक लोक जखमी झाले. यानंतर दाऊद पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरात असल्याच्या बातम्या आल्या; पण पाकिस्तानने ते नाकारलं. 27 वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानने दाऊदची माहिती जगासमोर उघड केली. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई न केल्याने 2018 पासून पाकिस्तान  ङ्गफायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सफच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. या यादीत समावेश झाल्याने तर पाकिस्तानला जागतिक समुदायाकडून आर्थिक मदत मिळणं बंद झालं. शिवाय, जागतिक गुंतवणूकदारांनीही या देशाकडे पाठ फिरवली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या कसोटीच्या काळातून जात आहे. या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्यांची नावं उघड करून तसंच त्यांच्यावर कारवाई केल्याचं दाखवून पाकिस्तानला ङ्गग्रे लिस्टफ मधून बाहेर पडता येईल. फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला 27 कलमी मागणीपत्र दिलं. त्यातल्या सर्व अटी सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावयाच्या आहेत. पाकिस्तानने मान्य केल्यानुसार कारवाई न केल्यास पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत होऊ शकेल. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. सौदी अरेबियाने त्याला कर्ज आणि तेल देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. इतकंच नव्हे, तर सौदी अरेबियाचं एक अब्ज डॉलर्सचं कर्ज पाकिस्तानने चीनकडून एक अब्ज डॉलरचं वाढीव कर्ज घेऊन फेडलं असलं तरी या वर्षअखेरीस सौदी अरेबियाचं आणखी 2.2 अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडणं आवश्यक आहे. चीन पाकिस्तानला करत असलेली मदत उदात्त हेतूने नाही तर पाकिस्तानची बंदरं, भूमी त्याला गिळंकृत करायची असल्यामुळे आहे. या पार्श्‍वभूमीवर फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सफच्या निकषांनुसार आपण दहशतवाद्यांवर ठोस कारवाई करत आहोत, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने आठ दहशतवादी संघटना आणि 88 दहशतवाद्यांवर कारवाई करत असल्याचं किमान दाखवलं आहे.

आता एकदम गळ्याशी आल्यानंतर पाकिस्तानला आपण काही तरी करत आहोत, हे दाखवणं भाग होतं. त्यामुळे दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची संपत्ती जप्त करण्याचे तसंच बँक खातं सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दाऊद सध्या कराचीमध्ये राहात असल्याची माहिती पाकिस्तान सरकारच्या कागदपत्रातून उघड झाली आहे. त्यामुळे भारताच्या दाव्यावर पाकिस्तानने स्वत:हूनच शिक्कामोर्तब केलं आहे. दाऊदचा एकेकाळचा विश्‍वासू साथीदार एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांच्या चौकशीत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातच दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. दाऊदच्या दोन घरांचे पत्ते लकडावालाने पोलिसांना दिले होते. हा तपशील आणि भारताची माहिती रास्त असल्याने पाकिस्तानला पुन्हा एकद जगापुढे तोंड वर करायलाही जाग राहिलेली नाही, हे खरंच.

 

अवश्य वाचा