Wednesday, December 02, 2020 | 11:27 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

चुणूकदार जाहिराती वेधताहेत लक्ष
रायगड
13-Nov-2020 07:13 PM

रायगड

दूरचित्रवाणी तसंच डिजिटल माध्यमातून अनेकविध जाहिरातींचा मारा होत असतो. कंपन्या आपलं उत्पादन खपवण्यासाठी कल्पक जाहिराती तयार करत असतात. एखादी जाहिरात आपल्या मनाला भिडून जाते तर एखादी अर्थहीन वाटते. काही जाहिरातींना सामाजिक बदलांचे, वर्तमानकाळाचे संदर्भ असतात. काही जाहिराती सामाजिक बदलांना कारणीभूत ठरतात. एखाद्या उत्पादनाची जाहिरात पाहिल्यानंतर प्रेक्षक त्या परिस्थितीशी, प्रसंगाशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करतात. चित्रपट, क्रीडा तसंच अन्य क्षेत्रांमधल्या सेलिब्रिटी विविध उत्पादनांच्या जाहिराती करत असतात. या व्यक्तिमत्त्वांची जनमानसातली प्रतिमा उत्पादनांचा खप वाढवण्यास कारणीभूत ठरते. या व्यक्तिमत्त्वांच्या प्र्रसिद्धीचा, त्यांच्याभोवतीच्या वलयाचा वापर सामाजिक संदेश देणार्‍या जाहिरातींमध्येही केला जातो. काही जाहिराती साध्या, सरळ, सोप्या असल्या तरी सृजनाचं दर्शन घडवतात. काही जाहिरातींचा वास्तवाशी अजिबात ताळमेळ नसतो. अशा जाहिराती खूप त्रासदायक ठरतात तर काही वर्षानुवर्षे मनामध्ये घर करून राहतात. बर्‍याच वर्षांपूर्वी दाखवल्या जाणार्‍या कॅडबरीच्या जाहिरातीने रसिकांची मनं जिंकून घेतली होती. या जाहिरातीत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेली एक तरुणी फलंदाजाने षट्कार ठोकल्यानंतर आनंदाने बेभान होऊन मैदानात नाचत जाते. या तरुणीचं ते नृत्य आजही अनेकांच्या स्मरणात असेल. तुमचा आनंद कॅडबरीच्या गोडव्याने द्विगुणित करा, असाच संदेश यातून देण्यात आला. हीच कॅडबरी आता कुछ मीठा हो जाए  म्हणत सणांचा गोडवा वाढवते आहे. तसंच कॅडबरी देऊन एखाद्याचे आभारही मानता येतील, असा सरळ, साधा, सोपा संदेशही देते आहे. अगदी सर्वसामान्य चेहरे दाखवले जात असल्यामुळे अशा जाहिराती वास्तववादी वाटून जातात.  

टाळेबंदीच्या काळात लोकांचा बराच काळ घरात जात होता. या दिवसात कुठे जाणं, आप्तांना प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नव्हतं. तेव्हा लोकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. थेट भेट शक्य नसली तरी झूम, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून व्हर्च्युअल भेटी होत होत्या. अशा कठीण दिवसांमध्ये समाजमाध्यमं किती महत्त्वाची ठरू शकतात आणि या माध्यमांद्वारे तुम्ही लोकांना कशी मदत करू शकता किंवा त्यांच्या निरस, एकलकोंड्या आयुष्यात कशा पद्धतीने आनंद फुलवू शकता हे फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या जाहिरातींनी दाखवून दिलं. फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. या माध्यमांना नव्याने प्रसिद्धीची अजिबात आवश्यकता नाही. मात्र, समाजमाध्यमांवर टीका होत असली तरी त्यांचा वापर चांगल्या कामांसाठी होऊ शकतो, या माध्यमातून लोकांशी झटपट संपर्क साधून टाळेबंदीच्या झळा सोसणार्‍या रिकाम्या हातांना काम मिळवून देता येऊ शकतं, अशा आशयाच्या जाहिराती फेसबुकने दाखवल्या.

एका क्रीडास्पर्धेच्या निमित्ताने कपड्यांचा कारखाना चालवणार्‍या महिलेला मोठ्या ऑर्डर्स मिळतात. चला, आता कामगारांना बोलवा असं म्हणणार्‍या या महिलेच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णनीय होता. या वर्षी काही तरी चांगलं होणारच होतं, असं म्हणत तिने व्यक्त केलेला आशावाद हा तिचा नाही तर आपल्या प्रत्येकाचा आशावाद आहे असंच वाटून जातं. फेसबुकमुळे एका सुताराला भरपूर काम मिळतं आणि हाताला काम आहे म्हणून तो आनंदून जातो, अशा आशयाची जाहिरातही हृदयाला स्पर्शून जाते. व्हॉट्स अ‍ॅपने दोन व्यक्तींमधल्या संवादाला महत्त्व दिलं. एक मुलगी व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आईला केस कसे कापायचे ते सांगते. सुरूवातीला थोडी बावरलेली आई तिच्या सूचनांनुसार केस कापते आणि स्वत:च्याच बदललेल्या रुपावर भाळते. हे आपल्यालाही जमू शकतं, हा विश्‍वास आईला देण्यात मुलगी यशस्वी होते. हे सगळं तुमच्या दोघांमध्येच, त्यात तिसरं कोणीही मध्ये येणार नाही हेच व्हॉट्स अ‍ॅपला सांगायचं आहे. अनेकजण व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओ कॉल करतात. पण, हा साधासा व्हिडिओ कॉल एखाद्याला नवा आत्मविश्‍वास देऊ शकतो, हे या जाहिरातीमुळे आपल्याला जाणवतं.

आयपीएलदरम्यान दाखवल्या जाणार्‍या ड्रीम 11 च्या जाहिरातीही लक्षवेधक ठरत आहेत. ड्रीम 11 हा सर्वसामान्यांचा खेळ आहे. तुम्ही मोठे क्रिकेटपटू, सेलिब्रिटी असाल तर तुमच्या घरात, इथे आमचेच नियम चालणार, आम्ही सांगू तेच तुम्हाला करावं लागेल असं या जाहिरातींमधून दाखवलं जात आहे. यामुळे क्रिकेटवेडे सर्वसामान्य प्रेक्षक ड्रीम 11 कडे खेचले जात आहेत. रोहित शर्मा, एम. एस. धोनी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह  क्रिकेट खेळायला आले तरी त्यांना काही तरी कारण सांगून कटवलं जातं. त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसचा इथे काहीच उपयोग नसतो. क्रिकेटमधले हे महारथीही सर्वसामान्य होऊन गेल्याचं आपल्याला दिसतं. हीच ड्रीम 11ची खरी जादू असल्याचं प्रेक्षकांच्या मनावर ठसवलं जातं. क्रेडिट कार्डचा वापर करून भरपूर कॅशबॅक आणि सवलती मिळवायच्या असतील तर क्रेड अ‍ॅप डाउनलोड करा, हेसुद्धा वेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलं आहे. माधुरी दीक्षित, अनिल कपूर, गोविंदासारखे सेलेब्जही या सवलतींमुळे हुरळून जात असल्याचं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात क्रेड  यशस्वी ठरत आहे. या जाहिरातींमुळे क्रेडबद्दलची उत्सुकता वाढली.

मध्यंतरी तनिष्कच्या एकत्त्वमची जाहिरात बरीच वादग्रस्त ठरली. मात्र, दागिन्यांच्या अशाच एका जाहिरातीने लक्ष वेधून घेतलं. ही पु.ना. गाडगीळ यांची जाहिरात होती. यात घरात नवा पाहुणा येणार असल्याचं मुलाला खूपच कल्पकतेने सांगण्यात आलं. जेवणाच्या टेबलावर बर्फी आणि पेढे ठेवण्यात आले. मुलाने बर्फी उचचली. मग सगळ्यांनी आम्हालाही बर्फी हवी असं म्हणत बर्फीच घेतली. सगळ्यांना बर्फी हवी, पेढ्याला डिमांडच नाही,  असं म्हणणार्‍या मुलासमोर आई चांदीचे वाळे धरते. तेव्हा त्याला नेमकी उकल होते. हा आपल्याच घरातला प्रसंग आहे, असं नकळत वाटून जातं. मुलांनी घरकामात मदत करणं किती महत्त्वाचं आहे, त्यांनी घरकाम शिकायला हवं, दोघांनी कमावलं तर आर्थिक सुबत्ता येईल, घरची कामं झटपट उरकली तर गृहिणीच्या अंगच्या गुणवत्तेला वाव मिळेल, असा काहीसा सामाजिक आशय असणार्‍या जाहिरातीही दाखवल्या जात आहेत.

भारतातल्या जाहिरातविश्‍वाचा आवाका प्रचंड आहे. इथली प्रचंड बाजारपेठ लक्षात घेऊन कंपन्या नवनवी उत्पादनं सादर करत आहेत. ही उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींचा आधार घेतला जातो. या जाहिराती विविध माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचतात. 2018 ते 2019 या  वर्षभराच्या काळात देशातला जाहिरात उद्योग 9.4 टक्क्यांनी वाढून 68,475 कोटी रुपयांवर पोहोचला. 2020 च्या अखेरीपर्यंत हा आकडा वाढून 75,952 कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 2025 पर्यंत जाहिरात क्षेत्राची भरभराट होऊन हा उद्योग 1,33,921 कोटी रुपयांचा होईल, असं काही अहवालांमधून समोर येत आहे.

टीव्हीवरच्या जाहिरातींवर जवळपास 39 टक्के म्हणजे 26,869 कोटी रुपये खर्च होतो. वृत्तपत्रं तसंच इतर छापील माध्यमांमध्ये 29 टक्के जाहिराती दिल्या जातात तर डिजिटल माध्यमांचा वाटा 20 टक्के आहे. 2020 च्या अखेरीपर्यंत मोबाईल फोनवर जास्तीत जास्त जाहिराती दाखवल्या जातील, असं दिसतं. डिजिटल  माध्यमांमध्ये मोबाईलवर दाखवल्या जाणार्‍या जाहिरातींचा वाटा 41 टक्क्यांनी वाढून 52 टक्क्यांवर पोहोचणार आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर याला कारणीभूत ठरणार आहे. कल्पकतेने साकारलेल्या जाहिराती प्रेक्षकांच्या अधिक काळ स्मरणात राहतात. मात्र, जाहिरात किती कल्पक असावी, हे उत्पादनाच्या प्रकारावरून ठरतं. लोकांना सर्वसाधारणपणे कोला किंवा चहा, कॉफीसारख्या पेयांच्या जाहिराती कल्पक लागतात. दुसरीकडे, शँपू आणि सौंदर्यवर्धक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये कल्पनाशक्तीपेक्षा वास्तवादाचा अधिक अंगिकार करणं आवश्यक असतं. शँपू तसंच इतर सौंदर्यप्रसाधनांची उपयुक्तता आणि परिणामकारकता लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. म्हणूनच कल्पकता कुठे दाखवायची आणि कुठे नाही, हेही लक्षात यायला हवं. बाजारपेठेतली प्रचंड स्पर्धा पाहता आपली उत्पादनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्यांना येत्या काळात सर्जनशीलतेचा अधिक प्रभावी वापर करावा लागणार आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top