रायगडचे सुपुत्र भारतरत्न आचार्य विनोबाजींच्या 125 व्या जयंतीचे वर्ष दि.11 सप्टेंबर 2020 रोजी पूर्ण झाले. विनोबांचा जन्म आपल्या रायगड जिल्ह्यात गागोदे (बुद्रुक), ता. पेण या खेडेगावात दि.11 सप्टेंबर 1895 रोजी झाला. विनोबांचे महानिर्वाण दि.15 नोंव्हेबर 1982 रोजी पवनार, जि. वर्धा येथे झाले. यालाही 38 वर्षे होत आहेत. माझ्या शालेय जीवनातच, म्हणजे वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षीच पाठ्यपुस्तकातून मला प्रथम विनोबाजींचा परिचय झाला. तेव्हापासून विनोबांना मी पत्र लिहीत असे. अनेक वेळा तर रोज रोज लिहीत असे. मी विनोबांना पत्रात लिहीत असे- मला आपल्याला भेटायचं आहे, आपल्यासोबत आश्रमात राहून देशसेवेचे खूप काम करायचे आहे. असंच काहीतरी लिहीत असे. विनोबाजींकडून आश्रमातून मला पत्रोत्तर येई. कधी पोस्टकार्ड, तर कधी अंतर्देशीय पत्राच्या वरील बाजूला कोपर्‍यात दोन ओळींचा आश्रमाचा छापील पत्ता असलेले आणि बाकी एका धावत्या वळणातील हस्ताक्षराचे हे पत्र मला आलेले असे. त्यातील पहिल्या पत्राचा आशय म्हणजे, ङ्गतुझे पत्र विनोबांनी वाचले, तू लहान आहेस. थोडा मोठा झाल्यावर अवश्य ये. गीताई वाच, अभ्यासकरफ हे विनोबांचे तुला सांगणे आहे. विनोबांचे आशीर्वाद, पुढे बालविजय अशी सही होती. पत्रांवर कधी बालविजय, तर कधी कुसूम अशा सहीचे पत्रे येत. मला यावेळी मोठं कोंड होतं, की विनोबाजी स्वतः पत्र का लिहीत नाहीत. विनोबांच्या वतीने इतरांकडून असे पत्रं का येत असतील. मी पुढे आश्रमात विनोबांकडे राहायला गेल्यावर मला हे आपोआपच कळले. पत्र संन्यास, क्षेत्र संन्यास विनोबांनी घेतलेले होते.

विनोबाजींकडून आश्रमातून मला आलेली ही पत्रं माझ्या हृदयातील देशभक्तीला जणू खतपाणी होते, असे आज वाटते. मला आलेले प्रत्येक पत्र मी आमच्या शाळेत शिक्षकांना दाखवत असे. संपूर्ण शाळेत या पत्राची चर्चा होत असे. लगेच दुसर्‍या दिवशी सकाळची राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना झाली, की शाळेच्या मैदानावरच उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर माझ्याकडून पत्राचे जाहीर वाचन करून घेतले जाई. पत्र वाचून झाले की, आचार्य, संत विनोबा म्हणून विनोबांचा मोठ्याने जय जयकाराचा घोष होई. विनोबा जयजयकाराच्या या घोषणांनी शाळेचे मैदान व संपूर्ण शाळेचा परिसर मंतरलेला होई. आमची ही शाळा नांदेड जिल्हा परिषदेची देगलूर तालुक्यातील खानापूर या खेडेगावातील होती.

विनोबा व माझ्यात हा पत्रांचा सिलसिला लागोपाठ तीन ते चार वर्षे चालला होता. मी विनोबांच्या भेटीचा ध्यासच घेतला होता. शेवटी अशा पत्रावर माझे काही समाधान तात्पुरते, तेवढ्यापुरते होई. परंतु, ओढ आतून निरंतर लागलेलीच असे. पोळा सण होता. अमावस्येची रात्र होती. शेवटच्या बसचे दिवे अंधारात लांबून बस येत असलेली दिसते. बसवर पोहचवायला माझे वडील व मामा आले होते. लांबून येत असलेल्या या शेवटच्या बसचे दिवे पाहून बसस्टॉपवर वेळेत पोहचण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारातून धावत होतो. यावेळी धावताना अंधारात पडलो. गुडघ्याला जखम झाली होती. पण, ती बस व आम्ही एकाचवेळी पोहचलो. धनज ते पवनार हा प्रवास एकट्याने करताना घर, गाव, शाळा, विनोबा या चार शब्दांच्या भोवतीच माझे मन विचार करीत होते. या प्रवासात तीन ठिकाणांहून बस बदलावी लागलेली.

दुसर्‍या दिवशी रात्री आठ-नऊच्या सुमारास पवनारला बसस्टॉपवर उतरलो. धाम नदीचा पूल अंधारात एकटाच ओलांडत होतो. नदीच्या पाण्याचा धोधो आवाज होता. आश्रमाचे गेट बंद होण्याच्या आत पोहचलो. त्यावेळी आश्रमातील सर्व दिवे मालवण्यात आलेले होते. आश्रमात फक्त एक आश्रमभगिनी अंधारात दिसल्या. त्यांनीच मला पंरधाम आश्रम विभागाचा रस्ता दाखवला. तिकडेही अंधारातून एकटाच गेलो. तेथील आश्रमवासी झोपेच्या तयारीत होते. हातपाय धुवून झाले. लगेच जेवणासाठी जेवायच्या आश्रमातील भोजनगृहात मला एकाने नेले. मी सोबतची भाकरी व हिरवी मिरची जेवत होतो. हे पाहून गुळाचा डब्बा काढून मला भाकरीसोबत गुळ खाण्यास दिले. एका हॉलमध्ये चार जण आश्रमवासी कार्यकर्ते झोपत असत. त्याच ठिकाणी मलाही एक कॉट झोपण्यास दिली. आश्रमातील कार्यकर्ते हिंदी भाषेतून म्हणायचे, इतनी उम्रके इस लडकेको आश्रममें बाबा नही रख लेंगे शायद अशी चर्चा करत होते. रात्र कधी संपेल असे मला झाले होते. सकाळी विनोबांना भेटल्यावर विनोबा मला ठेवून घेतील काय, आश्रमात राहण्याची परवानगी विनोबा देतील काय, अशा विचारातच प्रवासातील थकवा होता तरीही झोपलोच नाही.

सकाळी आंघोळ केली. विनोबांना भेटायला विनोबा कुटीत गेलो. विनोबा कुटीच्या पूर्वेला असलेल्या दारातून सूर्याची प्रसन्न ऊबदार किरणं विनोबांवर होती. विनोबा ही प्रसन्नपणे गोमुखासनात बसले होते. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. विनोबांना ऐकू येत नव्हते. विनोबांचे सेक्रेटरी बाळभाईंनी माझ्याबद्दलची माहिती एका कागदावर लिहून दिली. विनोबांनी चिठ्ठी वाचली. विनोबांनी मला पाहिले. मी पुन्हा त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. विनोबांनी मला प्रसन्नपणे हसून आशीर्वाद दिला व आश्रमात राहण्याची अनुमती दिली. हा क्षण दि. 4 सप्टेंबर 1978 रोजीचा होता. हा क्षण माझ्यासाठी न भूतो न भविष्यती असा होता. मी आश्रमात राहू लागलो. मी आश्रमात सहा ते आठ तास काम करीत असे. सफाई, छापखान्यात कंपोझिंग, पुस्तक शिलाई, शेती, गोशाळा रसोड्यात, तसेच रामभाऊ म्हसकर यांच्याकडे पत्रव्यवहाराचे इत्यादी कामांच्या नियोजनाप्रमाणे माझी कामे मी करीत असे. त्यावेळी महाराष्ट्रात गाडे गुरूजींची पदयात्रा देशात-परदेशातही लहान-मोठ्या गांधी विनोबा विचारांच्या गो गीताई पदयात्रा निघत असत. यासंबंधित व इतरही पत्रव्यवहार आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ म्हसकर यांच्या मार्गदर्शनात काम करत असे. हे रामभाऊ म्हसकर म्हणजे विनोबांचे साक्षात हनुमान होत. विनोबांच्या ज्या कार्यकर्त्यांकडून राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावर व्यापकपणे भरीव असे गांधी-विनोबा विचारांच्या प्रचाराचे काम झाले, अशा समर्पित कार्यकर्त्यांपैकी रामभाऊ म्हसकर होत. आज त्यांचे वय 95 वर्षे आहे. हेच रामभाऊ म्हसकर माझ्याबद्दल हेमभाईंना बोलताना, ये लडका हिरा है। असे संबोधले होते, असे कळले. यावर हे आश्रमातील असमचे हेमभाई मला विनोदाने व प्रेमाने म्हणत, रामभाऊजी तो तुझे हिरा कहते है। तू तो हिरा नहीं कोयला है। कहा हिरा कहां कोयला।  असे म्हणून असा आमचा आनंदी संवाद चाले. 

 

अवश्य वाचा