आजवर आपल्यासमोर अनेक आव्हानं उभी ठाकली, समस्या उभ्या राहिल्या. कोरोना हा आजारही अशाच असंख्य समस्यांपैकी एक... आपण जागतिक आर्थिक मंदीला सामोरे गेलो. जगातले शक्तीशाली देश एकमेकांसमोर उभे ठाकले. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आर्थिक मंदीतून सावरण्याची प्र्रक्रिया सुरू असतानाच कोविड नामक संकट जगावर घोंघावू लागलं. आपण एका संकटातून बाहेर पडत नाही तोच दुसरं संकट येतं. अशी ही संकटांची मालिका निरंतर सुरूच आहे. मात्र, कोरोनाचं संकट खरंच भयानक आहे. आपण त्यापासून लांब पळू शकत नाही. कोरोना जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचल्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला दूरच्या बेटावर जाता येणार नाही की एखाद्या गावाकडे मोर्चा वळवता येणार नाही. कोरोनाने पळण्याचे सगळे मार्ग बंद केले आहेत. कोरोना संपूर्ण जगात पसरला आहे, हे सत्य स्वीकारण्यावाचून आपल्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. कोरोना विषाणूच्या तीव्रतेबद्दल आपल्याला नीट माहीत नाही. कोरोना सगळीकडे आहे आणि तो गरीब, श्रीमंत असा भेद करत नाही. त्याला जाती-धर्माच्या भिंती अडवू शकत नाहीत, एवढंच काय ते आपण सांगू शकतो. या विषाणूने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला आहे. आपलं राहणीमान, जीवनशैली सगळं काही बदलून गेलं आहे. हे सगळं खूपच अनपेक्षित आहे. एके काळी प्लेगने संपूर्ण मानवजातीला वेठीला धरलं होतं. समाजात नेमकं काय सुरू आहे याचा तेव्हा थांगच लागत नव्हता. कोरोनाच्या बाबतीतही असंच म्हणता येईल.

ही परिस्थिती आपण याआधी कधी अनुभवली नव्हती. हे सगळं वातावरण अगदी नवीन आहे. माणूस अशा प्रसंगांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. आजवर अशा अनेक प्रसंगांमध्ये आपण तोडगा काढला आहे. विपरित परिस्थितींवर उत्तरं शोधली आहेत. गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण झाले की आपण त्याची उत्तरं शोधू लागतो. अशा प्रसंगांमध्ये माणूस अधिक कल्पकतेने काम करतो. समस्यांवर उपाय शोधण्याचे अथक प्रयत्न करू लागतो. आपल्या सुदैवाने कोरोनाला कमी लेखणार्‍यांची संख्या कमी आहे. कोरोना वगैरे काही नाही, मी समुद्रकिनार्‍यांवर मनसोक्त भटकणार, फिरायला जाणार असं म्हणणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. एकीकडे कोरोनाची समस्या आहे, तर दुसरीकडे लसनिर्मितीची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. एवढ्या कमी वेळात आजपर्यंत लसनिर्मिती झालेली नाही. त्यामुळे आपण सध्या आशा आणि निराशेच्या हिंदोळ्यावर आहोत. अशा विपरित प्रसंगांमध्येच क्रांतिकारी, अनोखं असं काही तरी घडतं. जगावेगळे तोडगे शोधून काढले जातात. त्यामुळे निराश होण्याचं काहीच कारण नाही. आशा सोडू नका, सकारात्मक राहा.

उद्योग, व्यवसाय करताना अनेक अडवणी येतात, प्रश्‍न निर्माण होतात. निराश करणारे प्रसंग येतात. नियमावलीत होणारे बदल, पर्यावरणविषयक समस्या तसंच इतर काही कारणांमुळे आपल्याला निर्णय बदलावे लागतात. माझ्या बाबतीतही असं घडलं आहे. जॅग्वार लँडरोव्हर ताब्यात घेण्याच्या काळातला हा प्रसंग आहे. जॅग्वार ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केल्यानंतर युरोपमध्ये आर्थिक मंदी आली. तिथली अर्थव्यवस्था कोसळली. जॅग्वार ताब्यात घेण्याच्या आमच्या निर्णयाबद्दल बोलताना तुम्ही असा मूर्खपणा का केला, ही डोकेदुखी मागे का लावून घेतली, असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले. तब्बल आठ वर्षे प्रयत्न करूनही फोर्ड मोटर्सला जॅग्वार ताब्यात घेता आली नाही तर तुमची भारतीय वाहन उत्पादक कंपनी काय करणार, असे खोचक टोमणे ऐकावे लागले. जॅग्वारचा प्लांट आम्ही बंद करणार असल्याच्या, त्या जागी तंदुरी चिकन रेस्टॉरंट सुरू करणार असल्याच्या अफवा परसल्या होत्या. स्पष्टच सांगायचं तर नेमकं काय होणार हे मलाही उमगत नव्हतं. मग आम्ही कामगारांसोबत बैठक घ्यायचं ठरवलं. सर्व कामगारांना टाऊन हॉलमध्ये बोलावलं. त्यांच्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं देण्याची आमची तयारी होती. तुम्ही ही फॅक्टरी बंद करणार का, हजारो कामगारांना देशोधडीला लावणार का, अशा स्वरुपाचे प्रश्‍न आम्हाला विचारण्यात आले.

त्यावेळी गॉर्डन ब्राऊन हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांची आम्हाला मदत करण्याची खूप इच्छा होती. मात्र, त्यांच्या सरकारमधल्या इतर मंत्र्यांना या सगळ्याशी काही देणं घेणं नव्हतं. आमची कंपनी भारतीय असल्यामुळे आम्ही मदतीसाठी भारतीय बँकांकडे जायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात या नोकर्‍या ब्रिटिशांनाच मिळणार होत्या. आम्हाला विरोध करण्याची भूमिका घेतल्यामुळे आपल्याच देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होणार असल्याची जाणीव त्यांना नव्हती. मी त्या मोठ्या जनसमुदायासमोर उभा होतो. आमच्या पुढच्या योजनांबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. पण, ही फॅक्टरी बंद होणार नसल्याचं आश्‍वासन मी त्यांना दिलं. आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं तर या दोन ब्रँड्सना जुना लौकिक, जुनी झळाळी प्राप्त करून देता येईल, असंही सांगितलं. यानंतर सर्व कर्मचार्‍यांनी जोमाने काम सुरू केलं आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी कंपनी पुन्हा उभी राहिली. आता या सगळ्यात माझी भूमिका काय तर मी फक्त या लोकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. यानंतही बर्‍याच अडचणी आल्या. मात्र, या सगळ्याला आम्ही सगळे एकत्र सामोरं गेलो.

एखादी कंपनी किंवा उद्योग सांभाळताना आपणच राजे असल्यासारखं वागून चालत नाही. कंपनीचे भागधारक, कर्मचारी यांची बाजू समजून घ्यावी लागते. त्यांच्या नाराजीचीही काही कारणं जाणून घेऊन नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी लागतात. यासंदर्भात मला एक प्रसंग आवर्जुन नमूद करावासा वाटतो. तेव्हा मी नुकतंच ङ्गटाटा ग्रुपफचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. त्यानंतर काही दिवसात टाटा मोटर्समध्ये मोठा संप झाला. या संपाला हिंसक वळण लागलं. 300 ते 400 कामागारांना मारहाण करण्यात आली. 60 अधिकार्‍यांना बरंच लागलं होतं. हा अत्यंत भयावह प्रसंग होता. आम्ही ही सगळी परिस्थिती काळजीपूर्वक हाताळायला सुरूवात केली. मी तीन ते चार दिवस फॅक्टरीत राहिलो, सर्वांना एकत्र आणलं. अखेर संप मागे घेण्यात आला आणि पुन्हा काम सुरू झालं. यानंतर आम्ही कामगार संघटनेसोबत नवा करार केला. कामगारांना बोनस देण्यावरून कामगार आणि व्यवस्थापनात बेबनाव झाला होता. संप झाल्यामुळे व्यवस्थापन बोनस देण्याच्या विरोधात होतं. मग मीच व्यवस्थापनाशी वार्तालाप केला. कामगारांचा आणि संपाचा काहीच संबंध नाही. आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे हेच लोक आहेत. त्यामुळे त्यांना बोनस द्यायलाच हवा, असं स्पष्टपणे सांगितलं. यामुळे फॅक्टरीतलं वातावरण पूर्णपणे बदललं.

सध्या उद्योगजगतात नैतिकता पाळण्यापेक्षा जास्तीत जास्त नफा मिळवण्याला महत्त्व आलं आहे. मात्र, आज प्रत्येकालाच प्रकाशझोतात रहायचं आहे. कोणी कितीही नाकारलं तरी आपल्यावर प्रकाशझोत असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. हे यश मोजायचं साधन म्हणजे नफा. आपल्या यशाची कथा लोकांपर्यंत पोहोचावी, असं न वाटणारी व्यक्ती विरळाच. भरपूर नफा मिळवला, पैसा कमावला म्हणजे आपण यशस्वी झालो, अशी सध्याची मानसिकता आहे. अर्थात, नफा मिळवायलाच हवा. त्यात काही वावगं नाही. मात्र, हा नफा मिळवण्यासाठी अवलंबला जाणारा मार्ग, व्यवसाय सुरू करण्यामागचा उद्देश अधिक महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त नफा मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करत नाही. तुम्ही तुमच्या ग्राहकांना, समभागधारकांना चांगली सेवा देण्यासाठी व्यवसाय सुरू करता. कठीण प्रसंग सगळ्यांवर येतात, काही निर्णय चुकतात. कठीण काळात उत्पादनाच्या दर्जाबाबतही तडजोड केली जाते. अशा प्रसंगांमध्ये तुम्ही तुमच्या समभागधारकांसाठी काय करता, तुम्ही पगारवाढ करता का, कामगारांकडे दुर्लक्ष करून फक्त व्यवस्थापकांचं किंवा उच्चपदस्थांचं उत्पन्न वाढवता का, ग्राहकांना कमी दर्जाचा माल पुरवता का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत तरुणांची संख्या अधिक आहे. कल्पकनेते काम करणारी तरुण मंडळी या देशाला पुढे नेत असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. तरुणांनी कल्पकता आणि नैतिकतेच्या बळावर भारताला आर्थिक महासत्ता बनवावं, असं मला मनापासून वाटतं. हा काळही लवकरच सरेल आणि पुन्हा अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही, अशी आशा आपण करू या. कोरोनाची समस्या दूर करण्यासाठी आपल्या प्रत्येकालाच थोडाफार त्याग करावा लागणार आहे. काही गोष्टी सोडाव्या लागणार आहेत. मात्र, या त्यागाचं फळ चांगलंच असेल यात शंका नाही. 

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन