पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्यावर केंद्र व राज्य सरकारने आता कोरोनाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. सर्व पातळ्यांवर कोरोनाचा मुकाबला करुन कोणत्याही स्थितीत दुसर्‍या टप्प्यातून तिसर्‍या टप्प्यात प्रवेश करीत असताना, कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सर्व महानगर तसेच ग्रामीण भागातील रेल्वे, बस या सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. सरकारच्या या पावलांचे स्वागत केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे लोकांना या रोगाचे गांभीर्य पटले व आपल्या रक्षणासाठी पंतप्रधानांचे आवाहन किती महत्त्वाचे आहे त्याची प्रचिती आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जनतेला धीर देत जी कठोर पावले उचलीत आहेत, याची कल्पना दिली. तसेच ही पावले उचलणे का आवश्यक ठरली आहेत, हे पटवून दिले. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा जनतेवर मोठा परिणाम झाला आहे. कारण, आजपासून अत्यंत गरजेच्या असलेल्या जीवनावश्यक बाबी वगळता संपूर्ण देशात चिडीचूप शांतता आहे. नेहमी गजबजणारे रस्ते ओस पडले आहेत. आजवर जगाने तब्बल 70 वर्षांपूर्वी जागतिक युद्ध पाहिले. अर्थात, हे युद्ध युरोपाच्या भूमीवर खेळले गेले; परंतु त्याचे पडसाद हे जागतिक पातळीवर होते. आपल्याकडे त्यावेळी ब्रिटिशांचे सरकार होते, त्यामुळे आपण त्या युद्धातही ओढले गेलो होतो. आता मात्र हे जगासाठी तिसरे महायुद्धच म्हटले पाहिजे. असे नेहमीच बोलले गेले की, तिसरे महायुद्ध हे कोणत्याही भूमीवर लढले जाणार नाही, तर ते पाण्यासाठी किंवा अन्य कोणत्यातरी कारणासाठी असेल. मात्र, तिसरे महायुद्ध हे समारोसमोर लढले जाणार नाही, तर मागच्या दाराने लढले जाईल, हा अंदाज खरा ठरला आहे. आज हे महायुद्ध विषाणूंविरोधात लढले जात आहे. दुसर्‍या जागतिक युद्धापेक्षा सध्याच्या या युद्धाची स्थिती गंभीर आहे. आत्ताच या विषाणूने 150हून जास्त देशांतील सुमारे दोन कोटी जनतेला ग्रासले आहे. तर, दहा हजारांहून जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चीनमधून सुरु झालेल्या या विषाणूने त्याच देशात सुमारे 3700 लोकांचे जीव घेतले आहेत. तर, त्याहून जास्त प्राण इटलीतील नागरिकांचे, म्हणजे 4000 च्यावर गेले आहेत. इटली या आरोग्य व्यवस्था उत्कृष्ट असणार्‍या देशात असे का बरे व्हावे, असा कुणालाही प्रश्‍न पडेल. परंतु, तेथील नागरिकांनी सुरुवातीलाच या विषाणूंचा धोका फारसा गांभीर्याने घेतला नाही. तसेच इटली हा पर्यटकांचा स्वर्ग समजला जातो. त्यामुळे येथून संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त होता. इटलीमध्ये दुसर्‍या टप्प्यानंतर कोरोनाग्रस्त एवढ्या झपाट्याने वाढले, की त्यांना नंतर आटोक्यात आणणे हे एक मोठे आव्हान ठरले. तसेच संपूर्ण युरोपासह इटलीत ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे येथे मृत्यू होण्याचे प्रमाण चीनपेक्षाही जास्त झाले. आज फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांतही परिस्थिती फार गंभीर झाली आहे. आपल्याकडे ही स्थिती येऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात आली. आपल्याकडे तुलनात्मकदृष्ट्या तशी ही साथ उशिरा आली. आपणही परदेशी पर्यटकांच्या चाचणीला विलंब केल्याने ही साथ वाढण्यास हातभार लागला. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. काही चुका झाल्या असल्या तरी त्यातून आपल्याला पुढे जायचे आहे. आता मात्र या महायुद्धाच्या विरोधात आपण दंड थोपटले आहेत. सरकारने कितीही उपाय केले, तरी जनतेच्या हातात बरेच आहे. त्यांनी सध्या पुढील किमान 22 दिवस आपल्याला घरात कोंडून घेतल्यास ही साथ आटोक्यात यायला वेळ लागणार नाही. यासंबंधी केरळाचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. तसे पाहता, केरळात ही साथ अगदी सुरुवातीला सुरु झाली होती. केरळातील लोकांचे जागतिक कनेक्शन आहे. त्यामुळे या साथीची सर्वात प्रथम लागण केरळात झाली. परंतु, येथील सरकारने मात्र याला फार शिताफीने अटकाव केला. जनतेत जनजागृती केली व जे बाधित किंवा संशयित आहेत, त्यापैकी बहुतांशी लोकांना घरीच विलगीकरणात ठेवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केरळात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्याचाही फायदा लोकांना समजाविण्यात झाला. केरळ सरकारने आपले एक अधिकृत अ‍ॅप केले व त्यातून सर्वांना माहिती पुरविली. कोणत्याही अफवा अथवा खोटी बातमी आल्यास त्याचे स्पष्टीकरण या अ‍ॅपवरुन लगेचच केरळवासियांना पोहोचविले जाते. देशात सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था केरळात आहे, मात्र त्याचा त्यांना जसा उपयोग झाला, तसाच त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला. जी.पी.आर.एस. तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रत्येक रुग्णाचा माग ठेवला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज केरळात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे. त्यांनी मिळविलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. आज इतर राज्यांनी केरळचा अभ्यास करुन आपल्याकडील व्यवस्थेत बदल केले पाहिजेत. कोरोनाविरुद्ध आता महायुद्ध सुरु झाले आहे, त्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवावे.

 

अवश्य वाचा

पायलट-गेहलोत संघर्ष टिपेला.

सुधागडातून तरुणी बेपत्ता.

रेशनकार्डवर धान्य मिळत नाही