Saturday, December 05, 2020 | 10:20 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

बिहारी निकालाचा अर्थ
रायगड
10-Nov-2020 07:06 PM

रायगड

बिहारमधील निवडणुकीचे निकाल पाहता दोन्ही आघाड्यांत तुल्यबळ लढत दिली गेली. त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली आहे. सुरुवातीला मतमोजणी सुरु झाल्यावर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृतावखालील आघाडी पुढे असल्याचे चित्र होते. परंतु, काही काळातच हे चित्र पालटले व भाजपने आघाडी घेतली. मतमोजणी यावेळी रात्री उशिरापर्यंत सुरु राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सर्वसाधारण कल पाहता, भाजप व जेडीयू यांच्या आघाडीला पुन्हा जनतेने कौल दिल्याचे दिसते. भाजप आघाडीने सुरुवातीपासूनच आपण जिंकणार, असा विश्‍वास व्यक्त केला होता. भाजपने तर ही निवडणूक एकतर्फी होईल असे चित्र निर्माण केले होते. परंतु, शेवटी निकालांचा कल पाहता, विरोधी पक्षांच्या आघाडीने सत्ताधार्‍यांशी मोठी लढत दिली आहे. यावेळी लालूप्रसाद यादव निवडणुकीत नसले तरीही त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आपण वडिलांचे राजकीय वारसदार आहोत, हे दाखवून दिले आहे. बिहारमध्ये पुन्हा सत्ताधार्‍यांचा विजय झाला तरीही विरोधकांनी तुल्यबळ लढत दिली आहे. कम्युनिस्ट पक्षासह डाव्या पक्षांच्या आघाडीने आपले जोरदार अस्तित्व यावेळी दाखवून दिले आहे. बिहारमधील या निवडणुकांचे सर्व निकाल लागल्यावरच सविस्तर विश्‍लेषण करता येईल. मात्र, एक बाब स्पष्ट आहे की, बिहारमधील जनतेचे प्रश्‍न या निवडणुकीत मांडलेच गेले नाहीत, हे या निवडणुकीचे एक मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. बिहारसारखे बिमारु राज्य गेली सात दशके आहे. त्यातील विकास न होण्यामागे पूर्वापार सत्तेत असलेली काँग्रेस जशी जबाबदार आहे, तसेच नितीशकुमार यांची सलग तीन वेळा पार पडलेली कारकीर्दही तेवढीच जबाबदार आहे. स्वातंत्र्यानंतर बिहारमधील जातीव्यवस्थेची पाळेमुळे गेल्या सात दशकांत ढिली झाली नाहीत. उलट, गेल्या दोन दशकांत ती अधिकच घट्ट झाली आहेत.

त्यांच्या विकासाला खोडा येथूनच बसला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी या जातींनुसार आपली मतदारांची बँक कशी सुरक्षित राहील ते नेहमीच पाहिले आहे. विकासाचा अभाव व कट्टर जातीव्यवस्था यात बिहार हे राज्य बिमारुच राहिले आहे. भाजपने यावेळी आपल्याला ही निवडणूक जिंकायचीच आहे, अशी गणिते आखून सुरुवातीपासून बिहारी जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांना बगल देण्याचे ठरविले होते. यात ते बहुतांशी यशस्वी झाले आहेत. त्यानुसार सुरुवातीला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या नसून खून आहे असे रंगवून भरनिवडणुकीच्या तोंडावर लोकांचे लक्ष किमान तीन महिने त्या प्रश्‍नाकडे वेधून घेतले. यासाठी सी.बी.आय.ची सर्व यंत्रणा राबविली; परंतु त्यात त्यांना काही यश आले नाही. शेवटी सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या आहे, हे सिद्ध झाल्यावर त्यांना यातून माघार घ्यावी लागली. यावेळी बिहारी जनतेला लॉकडाऊनमध्ये भोगावे लागलेले हाल, त्यांची एक निर्वासित मजूर म्हणून झालेली कुतरओढ, राज्यातील बेकारी, हे महत्त्वाचे प्रश्‍न या निवडणुकीत कसे येणार नाहीत, याची दक्षता भाजपने जरुर घेतली. बिहारमध्ये बेकारी ही एक मोठी समस्या आहे. त्या समस्येचे उत्तर राज्यकर्त्यांकडे नाही. तेजस्वी यादव यांनी दहा लाख बिहारींना सरकारी नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, हा एक निवडणूक जुमला आहे, हे स्पष्टच होते. कारण, एवढ्या संख्येने जर बिहारींना सरकारी नोकर्‍या दिल्या, तर सरकारी तिजोरीवर किती भार पडेल व त्या नेमक्या कोणत्या नोकर्‍या असतील, याविषयी कसलाही प्लान त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे मते मिळविण्यासाठी तेजस्वी यांची ही एक चाल होती, हे उघड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकीत बिहारसाठी कोट्यवधींचे पॅकेज जाहीर केले होते. परंतु, त्यातील एकही प्रकल्प मार्गी लागलेला नाही. याविषयीचा मुद्दा बिहारच्या निवडणुकीत आला पाहिजे होता; परंतु त्यात विरोधक कमी पडले. भाजपने आता यंदाच्या प्रचार सभेत त्यांनी मागच्या वेळी दिलेल्या आश्‍वासनाबाबत न बोलता भारत-चीन संबंध व काँग्रेसने देशाची कशी वाट लावली, यावरच भर दिला. त्यामुळे यावेळी निवडणुकीत बिहारी जनतेचे खरे प्रश्‍न मांडलेच गेले नाहीत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर ही आपली शेवटची निवडणूक आहे असे जाहीर करुन आपली शस्त्रे म्यान केली व मतदारांना भावनिक आवाहन केले होते. यावेळी गेली पन्नास वर्षे बिहारच्या राजकारणात केंद्रभागी असलेल्या लालूप्रसाद यादव यांची अनुपस्थिती विशेष जाणवत होती. लालूंच्या सोबत आणीबाणीत एकत्र असलेले दलित नेते रामविलास पासवान यांचेदेखील निधन झाले होते.

त्यामुळे मागच्या पिढीतील व समाजवादी जातकुळीतून पुढे आलेल्यांपैकी नितीशकुमारच सध्या राजकारणात होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैयाकुमार हेदेखील प्रचारात आघाडीवर होते. त्यांच्यादेखील धुवाँधार सभा होत होत्या. डाव्यांसाठी ही तरुणाईची तोफ खरोखरीच उपयोगी पडली आहे. कॉँग्रेसमध्ये मात्र तरुण नेतृत्वाचा अभाव आहे, हे प्रकर्षाने जाणवले. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये प्रचार जरुर केला होता; परंतु त्यांनी यापूर्वीच्या गुजरात, कर्नाटक राज्यासारख्या निवडणुकीत जसा जीव ओतला होता, तसे काही केले नाही. काँग्रेसने या निवडणुकीत फारसे गांभीर्य दाखविलेच नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष बिहारमध्ये दुबळाच राहिला. नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसला आता नव्याने काही विचार न केल्यास अधोगतीच्या मार्गाने जावे लागणार आहे. काँग्रेसमधील मरगळ, नेतृत्वाचा अभाव भाजपच्या पथ्यावर पडत आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top