सध्या राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील साथ आता उतरणीला लागली आहे, असे टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटल्याने प्रदीर्घ काळानंतर एक दिलासादायक बातमी आली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या तसेच अनेक मोठ्या झोपडपट्ट्यांतील दाटीवाटीची वस्ती यामुळे मुंबईतील कोरोनाचा प्रसार खूप झपाट्याने होत चालला होता. त्यामुळे कोरोनाच्या साथीत महाराष्ट्राचा क्रमांक 17 वा लागला होता. एकूणच, मुंबई, पुण्यातील साथ ही चिंतेचा विषय होता. परंतु, आता मात्र दिलासादायक वृत्त येत असल्याने प्रशासनाने सुसकारा सोडला आहे. मात्र, या बातमीमुळे भुरळून जाण्यात अर्थ नाही. कारण, पूर्णपणे कोरोनामुक्तीसाठी आपल्याला अजून बरीच मोठी वाटचाल करावयाची आहे. कोरोनाच्या साथीचा परमोच्च बिंदू 15 ते 31 मे या काळात झाला आहे. आता ही साथ उतरणीला लागली आहे. मुंबईपाठोपाठ राज्यातील साथ 15 जुलैनंतर उतरणीला लागेल, असा टास्क फोर्सचा अंदाज आहे. अर्थात, आपल्याकडे समूह संसर्ग सुदैवाने झालेला नव्हता. जर खरोखरीच समूह संसर्ग झाला असता, तर सध्यापेक्षा भयानक परिस्थिती ओढावली असती. आपल्याकडे स्थानिक पातळीवरील व संबंधित भागातील लोकांना झालेला संसर्ग तसेच समूह संसर्ग यात फरक आहे. मुंबईत समूह संसर्ग कधीच नव्हता. स्थानिक पातळीवरील संसर्ग असल्याने तो अशा प्रकारे आटोक्यात येऊ लागला आहे. गेले महिनाभर मुंबईत झपाट्याने रुग्ण वाढले होते, त्यामुळे अनेकदा चिंता व्यक्त झाली होती. त्याचबरोबर मुंबईतून बरे होणार्‍याची संख्या वाढत जात आहे, ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे. मुंबईत दादर, वरळी, माहिम यासारखे महत्त्वाचे विभाग हॉटस्पॉट होते. यातील वरळी व धारावीतील परिस्थिती चिंताजनक होती. परंतु, या दोन्ही ठिकाणी आता स्थिती समाधानकारक आहे. धारावीसारख्या घनदाट वस्ती असलेल्या भागात कोरोनावर सरकारी यंत्रणेने नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. त्यासाठी शासकीय पातळीवर चांगले प्रयत्न झाले. धारावीतील स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असून, कोरोनावर कसे नियंत्रण मिळवायचे यासाठी ही पद्धती आदर्श ठरु शकते. तसेच पुण्यात रेड लाईट एरिया असलेल्या बुधवारपेठेतही असेच झाले. येथील दाट वस्ती लक्षात घेता येथील कोरोना नियंत्रणात येणे कठीण होते. परंतु, ही वेश्यांची असलेली वस्ती सील करण्यात आली. या वस्ती ये-जा करण्यासाठी सर्व निर्बंध घालण्यात आले, तसेच येथील लोकांना घरी अन्नधान्य कसे मिळेल याची खात्री घेण्यात आली. अशा प्रकारे येथील कोरोना नियंत्रणात आला. त्यामुळे धारावी व पुण्यातील बुधवारपेठ हे कोरोनामुक्तीचे एक चांगले मॉडेल म्हणून पाहता येईल. मालेगाव हादेखील असाच हॉट स्पॉट होता. मात्र, तेथील साथही आता आटोक्यात आली आहे. अशा प्रकारे अनेक हॉटस्पॉट आता नियंत्रणात येऊ लागल्याने एक आशेच किरण दिसत आहे. त्यासाठी सरकारला बरेच प्रयत्न करावे लागले आहेत. प्रामुख्याने स्वच्छता व सुरक्षित अंतर हेच यावरचे दोन उपाय आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी हेच त्यामागचे उत्तर आहे. आपल्याकडे टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहे. दिल्लीत मात्र तसे झाले नाही. त्यामुळे दिल्लीतील कोरोना अजून नियंत्रणात येत नाही आहे. आपल्याकडे राज्यात रुग्णवाढीचा वेग मे महिन्यात 12 ते 13 दिवसांचा होता. आता तो 35 दिवसांपर्यंत वाढला आहे. हा वेग 45 दिवसांवर पोहोचेल त्यावेळी कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. अथार्र्त, त्यासाठी अजूनही महिन्याभराचा काळ लागेल असे दिसते. सध्या कोरोनाच्या वाढीचा परमोच्च बिंदू सरला असला तरी अजूनही पूर्णपणे नियंत्रण आलेले नाही. त्यामुळे अजूनही आपण पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या दृष्टीने दूर आहोत, मात्र नजीकही आलो आहोत. परंतु, खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे. अशा स्थितीत मुंबईतील जनजीवन बहुतांशी सुरु होत असल्यामुळे साथ फैलावण्याचा धोका सर्वाधिक आहे. सध्या सरकारकडे रुग्णांना ठेवण्यासाठी बेड नाहीत. त्यामुळे सरकारने ज्यांना शक्य आहे, त्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळ सरकारने हा निर्णय सुरुवातीपासूनच घेतला होता. अनेकदा रुग्ण घरी राहूनही चांगला होऊ शकतो, मात्र त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. जून व जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढण्याचा धोका असल्यामुळे हा घेतलेला निर्णय योग्यच आहे. आता लॉकडाऊनच्या अटी शिथील केल्यावर सरकारची खरी कसोटी सुरु झाली आहे. सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनचे नियम शिथील करणे, हा मोठा धोकाच आहे. परंतु, लोकांची वाढती अस्वस्थता व थांबलेले अर्थकारण यासाठी हे सुरु करावे लागले आहे. धोका पत्करुनही अनलॉक करणे सरकारला भाग पडले आहे. यात सरकारपेक्षा जनतेवर जबाबदारी मोठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जनतेकडून पूर्णपणे सहकार्य अपेक्षित आहे. कारण, जनतेचा सक्रीय सहभाग असल्याशिवाय कोरोनावर विजय मिळविणे शक्य नाही. आता निदान आपल्याला यश दृष्टीपथात दिसू लागले आहे. परंतु, सध्याच्या सुधारणेमुळे हुरळून न जाता पुन्हा एकदा झपाट्याने कामाला लागले पाहिजे.