कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर असली तरीही सरकारने आता अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असून, त्याचा तिसरा टप्पा 1 ऑगस्टपासून सुरु होत आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन आता 31 ऑगस्टपर्यंत वाढविले असताना, दुसरीकडे निर्बंध शिथील केले आहेत. अर्थात, अशा प्रकारे लॉकडाऊन सुरु ठेवून काही बाबतीत शिथीलता देण्याची आवश्यकताच होती. कारण, अशा प्रकारे फार काळ लोकांना घरी बसविणे योग्यही ठरणारे नाही. परंतु, याची जाणीव दोन्ही सरकारना आली व त्यातून हळूहळू लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया सुरु झाली. 24 मार्चला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आता सव्वाचार महिने लोटले आहेत. कोरोनाने सर्वांना सक्तीने घरी बसविले असले तरीही पुढील काळात आता प्रत्येकाने स्वत:ची सुरक्षा सांभाळत कोरोनाची लढाई लढायची आहे. अपेक्षेनुसार जुलै महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. गुरुवारी 45 हजार रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे. मात्र, कोरोनाला घाबरुन फार काळ घरी बसता येणार नाही. सरकार व जनतेलाही हे वास्तव पटले आहे. आता तिसर्‍या लॉकडाऊननुसार, रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिकडे गर्दी होऊ शकते, अशा ठिकाणांना अजूनही टाळे लावले आहे. यात प्रामुख्याने मॉल्स, व्यापारी संकुले बंद ठेवण्यात आली आहेत. उपाहारगृहे व चित्रपटगृहे या टप्प्यात उघडतील अशी आशा होती; परंतु ती शक्यता मावळली आहे. मॉल्समधील काही निवडक दुकाने उघडण्यास परवानगी दिली गेली आहे. त्याशिवाय मॉल्समधील हॉटेल्स बंदच राहणार आहेत. मात्र, ही हॉटेल्स घरपोच पार्सल्स देऊ शकतात. मात्र, ही परवानगी असली तरीही हॉटेल सध्या कुणाच्याच खिशाला परवडत नाही. तसेच बरेच जण बाहेरचे खाण्यासही कचरत आहेत. त्यामुळे हॉटेलचा धंदा पार बसला आहे. काही अपवादात्मक परिस्थितीतच लोक हॉटेलचे खात आहेत. लोकांमध्ये पुन्हा बाहेरचे खाण्याचा विश्‍वास संपादन व्हायला अजून काही काळ लागेल असेच दिसते. ज्याप्रमाणे हॉटेल उद्योग उभा राहायला अजून काही काळ जाईल, तसेच हॉटेलमधील निवास सुरु केले असले तरी, जोपर्यंत पर्यटन व उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरु होत नाहीत, तोपर्यंत हा उद्योगही भरारी घेऊ शकणार नाही. शाळा व महाविद्यालयेही अजून सरकारने बंदच ठेवण्याचे ठरविले आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. यंदा मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार आहे, हे आपण गृहीत धरले तरीही सध्या कोरोना नियंत्रणात आलेला नसताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे योग्य ठरणारे नाही. मुलांचा अभ्यास पुढील वर्षीही घेतला जाऊ शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. गर्दीची ठिकाणे सध्याच्या घडीला सुरु करता येत नाहीत, हे खरे असले तरीही व्यायामशाळा कडक निर्बंध घालून सुरु करता येऊ शकतात. केंद्राने त्यासाठी हिरवा कंदील दिला असला तरी राज्य सरकार अजून अनुकूल नाही. बहुधा पुढील टप्प्यात याला परवानगी मिळू शकेल असे दिसते. मॉल्स मात्र सुरु करण्याचा धोका आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुंबईसारख्या महानगरात सुरु करणे अजून तरी धोकादायकच आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महानगरात प्रतिबंधित क्षेत्रात असलेले निर्बंध जारी केले आहेत. अर्थात, असे करण्याची गरजच आहे. कारण, महानगरांमध्ये कोरोना झपाट्याने वाढू शकतो. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, येथे असलेली घनदाट लोकसंख्या. मुंबईत आता कुठे कोरोनावर नियंत्रण येण्याची शक्यता दिसू लागली आहे. एका पाहणीनुसार, मुंबईतील समूह प्रतिकारशक्ती वाढत चालली आहे. ही प्रतिकारशक्ती 70 टक्क्यांवर पोहोचल्याने मुंबईत आता आशादायी चित्र दिसू लागले आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्याही घसरली आहे व बरे होणारे रुग्णही वाढले आहेत. मात्र, हे प्रमाण पुढील पंधरा दिवस टिकल्यास मुंबईतील साथ नियंत्रणात आली असे म्हणता येईल. असे असले तरीही मुंबई व परिसरातील कोरोनाची साथ त्याचबरोबरीने आटोक्यात येऊ शकेल. सरकार आता हळूहळू एक-एक विभाग खुला करीत आहे, ते चांगलेच आहे. कोरोनाची लस एवढ्या लगेचच काही उपलब्ध होणार नाही. म्हणजे, लसीच्या व्यापारी उत्पादनासाठी तीन महिन्यांचा कालवधी लागेल. परंतु, तोपर्यंत टप्प्याने एक-एक बाब सुरु करणे शहाणपणाचे ठरणार आहे. आपल्याला पुढील वर्षभर तरी कोरोनासह जगायचे आहे असे नक्की करुन धोरण आखले पाहिजे. गेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पार ठप्प झाली आहे. तसे पाहता, त्यापूर्वीच अर्थव्यवस्था डबघाईला यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आता अर्थव्यवस्थेला गती देणे याला प्राधान्य दिले पाहिजे. अनेक उद्योगांना आता पुनश्‍च हरिओम करण्यासाठी नव्याने भांडवल लागेल. त्यात लहान व मध्य आकारातील उद्योगांना त्याची नितांत गरज भासणार आहे. सरकारने वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली खरी; परंतु त्याचा कुणाला फारसा लाभ होईल असे दिसत नाही. केवळ घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करुन गरजवंताला लाभ पोहोचले पाहिजेत. सरकारने पुनश्‍च हरिओम करताना सावधपणे; परंतु निश्‍चयाने पावले टाकण्याचे ठरविले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत बिहार निवडणुकीचे वेध केंद्रातील सत्ताधार्‍यांना पडत आहेत. त्यांनी निवडणुकीचा मोह टाळावा, हेच उत्तम. सध्याच्या काळात राजकारण न करणे, हेच उत्तम. अशा स्थितीतही राजस्थानातील सरकार पाडण्याचा डाव खेळला गेला, हे निषेधार्हच आहे.

 

अवश्य वाचा