Wednesday, December 02, 2020 | 01:52 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

सत्ताधार्‍यांची कसोटी
रायगड
05-Oct-2020 11:38 PM

रायगड

केवळ बिहारमध्येच नाही तर, देशातील 11 राज्यांतील 56 जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीत केंद्रात व विविध राज्यांत सत्ताधारी भाजपची कसोटी लागणार आहे. बिहारमध्ये सत्ताधारी असलेल्या जनता दल युनायटेड व भाजप यांच्या युतीपुढे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्यावेळी लालू व नितीशकुमार एकत्र लढले होते व त्यांनी सत्ता शिखर गाठले होते. मात्र, नंतर नितीशकुमार यांनी लालूंची साथ सोडली व भाजपची धरली. त्यामुळे सत्तांतर झाले. आता नितीशकुमार भाजपसोबत आहेत. तर, लालूंचे चिरंजीव तेजस्वी यांनी काँग्रेस व डाव्या आघाडीसोबत महागठबंधन आघाडी केली असून, तेजस्वी यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले आहे. बिहारच्या 243 जागांपैकी 144 जागा राष्ट्रीय जनता दल लढविणार आहे, तर 70 जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. तर, महागठबंधनचे सहकारी पक्ष असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा-ले) यांना एकूण मिळून 29 जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, नितीशकुमार यांची भाजपशी युती होणार असली तरी पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने एकट्याने निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने नितीश यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द फारशी काही लक्षणीय झालेली नाही. बिहारने त्यांच्या काळात फारसा विकास केलेला नाही. त्यामुळे बिहारींना कष्ट करुन पोट भरण्यासाठी अन्य राज्यात जावे लागते. त्यातून यावेळी त्यांची लॉकडाऊनच्या काळात झालेली फरपट पाहता, राज्य सरकारला जड जाईल असे वाटते. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी बिहारला मोठी स्वप्ने दाखविली होती. भलेमोठे पॅकेजही जाहीर केले होते. परंतु, त्यातील एकही प्रकल्प मार्गी लागलेला नाही. त्यामुळे मोदींच्या आश्‍वासनांवर विश्‍वास कसा ठेवायचा, याचाही प्रश्‍न बिहारींना पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे यावेळी भाजपने काही प्रचार केला तरी त्यांना ही निवडणूक काही सोपी जाणार नाही, अशी चर्चा आहे. त्याउलट, तेजस्वी यांची प्रतिमा मते खेचून त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करते का, ते पाहावे लागेल. एक तर, त्यांना लालूंचा वारसा आहे, तसेच तरुण असल्याने त्यांच्याविषयी बिहारींना बरेच आकर्षण आहे. बिहारमध्ये तरुण मोठ्या संख्येने आहे. आपले सरकार सत्तेत आल्यास दहा लाख लोकांना सरकारी नोकर्‍या देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. अर्थात, या आश्‍वासनाची पूर्तता कशी करणार, हे त्यांनाच ठाऊक. परंतु, या आश्‍वासनाला जनता भूलण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहारमधील राजकीय वातावरण भर कोरोनामध्ये तापत चालले आहे. खरे तर, ही निवडणूक घ्यावी की नाही, यावर बरीच मतमतांतरे होती. परंतु, सरकारने अखेर निवडणूक घेण्याचेच ठरविले. अर्थात, त्यासाठी बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे, हेदेखील खरेच आहे. बिहारमध्ये आता सध्या पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात जाण्याची एक अहमहमिकाच लागली आहे. यात त्यांची वैचारिक मतभिन्नतेपेक्षा वैयक्तिक गणितेच जास्त आहेत. बिहारचे बहुजन समाज पक्षाचे प्रमुख भारत भिंड हे राष्ट्रीय जनता दलात दाखल झाले आहेत, तर विकसनशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी यांनी महागठबंधनमधून आपण बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. बिहारमधील निवडणूक वातावरण आता तापू लागले आहे. एकूणच, उत्तर भारतातील हे गरीब राज्य सध्या निवडणुकीमुळे पूर्णपणे ढवळून निघणार आहे. बिहारप्रमाणे 11 राज्यांतील पोटनिवडणुकांसाठी 56 मतदारसंघात निवडणुका होतील. भाजपसाठी ही मोठी कसोटी असेल. कारण, ही एक देशातील मिनी निवडणूकच ठरावी. त्यातून सत्ताधार्‍यांविषयी जनतेची मते जाणून घेता येतील. मध्य प्रदेशात काँग्रेसमधून भाजपात ज्योर्तिरादित्य सिंधीया यांच्यासोबत ज्या 25 आमदारांना घेऊन आले, त्यांची कसोटी लागणार आहे. मध्य प्रदेशात एकूण 28 ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. यात सत्ताधारी भाजपची सरकार टिकविण्यासाठी कसोटी लागेल. मध्य प्रदेशात 230 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपकडे सध्या 107 सदस्य आहेत. त्यांना सत्तेतील बहुमत गाठण्यासाठी 11 जागा जिंकाव्या लागणार आहेत. काहींच्या मते, या जागा ते सहज जिंकतील, तर काहींच्या मते त्यांना वाटते तेवढे सोपे नाही. त्यामुळे येथे काँग्रेसला आपली पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. भाजपातील मध्य प्रदेशात पक्षातील जुने निष्ठावंत व काँग्रेसकडून आलेले नवीन सदस्य यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. पक्षात संघर्ष आहे, असे भाजप मानायलाच तयार नाही. आमचा पक्ष एकसंघ आहे व पक्षात नव्याने आलेल्यांना पुन्हा निवडून येण्यात कसलीही अडचण नाही, हा भाजपचा दावा कितपत खरा ठरतो, हेदेखील निकालानंतर दिसेल. मध्य प्रदेशात सध्या असलेले भाजपचे सरकार मजबूत होणार की खिळखिळे होणार, हे ठरविणारा हा निकाल असेल. त्यावरुनच काँग्रेसमधून भाजपात आलेले व राहुल गांधी यांचे निष्ठावान म्हणून ओळखले गेलेले ज्योर्तिरादित्य सिंदीया यांचेही राजकीय भविष्य हा निकाल ठरवेल. काँग्रेससाठीही हा निकाल महत्त्वपूर्ण असेल. त्याचबरोबर गुजरात व उत्तर प्रदेशात जिकडे भाजप सत्तेत आहे, तिकडे आठ व सात जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे तेथील सरकारवर फारसे काही परिणाम होणार नसले तरीही भाजपला जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरेल. त्यामुळे ही निवडणूक बिहारमधील सत्ताधारी व पोटनिवडणुकीत मध्य प्रदेशातील सत्तधारी भाजप यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यातून केंद्रातील भाजप सरकारविषयी खरोखरीच नाराजी आहे, की सरकारवर जनता खूष आहे, ते समजणार आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top