स्वामी अग्नीवेश ऊर्फ विपा शाम राव यांचे निधन झाल्याने तत्त्वज्ञानापासून ते अर्थशास्त्रपर्यंतचे अभ्यासक, विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले, सामाजिक सुधारणांचे आग्रही व कट्टर सेक्युलर विचारांचे पण पेहराव साधूंप्रमाणे करणारे एक महान व्यक्तिमत्त्व लोप पावले आहे. सध्याच्या काळात त्यांची देशाला नितांत आवश्यकता होती. देशातील अन्याय, अत्याचार, धार्मिक तिढा याविरुद्ध त्यांनी नेहमीच आपले योगदान दिले. दयानंद सरस्वती यांनी सुरु केलेल्या आर्य समाजाचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी त्याच विचारांवर आधारित राजकीय पक्षही स्थापन केला होता. आंध्र प्रदेशात एका सनातनी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अग्नीवेश यांचे वडील बालपणातच वारल्यामुळे ते छत्तीसगढ येथे आपल्या आजोबांकडे लहानाचे मोठे झाले. कोलकात्यात त्यांचे उच्च शिक्षण झाले. कायद्यातील पदवी संपादन केल्यावर त्यांनी व्यवस्थापनातील उच्च पदवी घेतली होती. काही काळ ते कोलकात्यात प्राध्यापक होते. सुरुवातीपासून ते आर्य समाजाच्या विचारांशी बांधील होते व शेवटपर्यंत त्यांनी आपला हा विचार काही सोडला नाही. आर्य समाजातील लोकांशी त्यांचे वैचारिक मतभेद झाल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. परंतु, त्यांनी त्यानंतरही आर्य समाजाच्या विचारांशी असलेली बांधिलकी काही सोडली नाही. 77 साली ते हरियाणात आमदार झाले व काही काळ शिक्षणमंत्रीदेखील होते. परंतु, त्यांची राजकीय कारकीर्द यापुढे फार काळ टिकली नाही. मात्र, त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रात काम केले. माओवाद्यांनी आपला हिंसेचा मार्ग सोडून द्यावा व मुख्य प्रवाहात सामील व्हावे यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यात त्यांना बर्‍यापैकी यशही आले होते. अनेक कट्टर नक्षलवाद्यांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी नक्षलवाद्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी अनेक जमीनदारी असलेल्या भागातील वेठबिगारी उघडकीस आणून त्यांना या गुलामगिरीतून मुक्त केले होते. त्यांच्या या संघर्षात त्यांच्यावर अनेकदा हल्लेही झाले; परंतु त्यांनी काही माघार घेतली नाही. त्याकाळी देशातील अनेक भागात जिकडे मोठ्या प्रमाणावर जमीनदारी होती, तेथे मजुरांना किरकोळ कर्जे वाटली जात व त्यांच्याकडून खोट्या सह्या घेऊन त्या मजुराची व त्याच्या पत्नीची आजन्म पिळवणूक केली जाई. अग्नीवेश यांनी याविरुद्ध लढा देण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांच्या प्रयत्नांतून हजारो मजूर गुलामगिरीतून मुक्त झाले. महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधातही त्यांनी मोठी मोहीम उघडली होती. त्यांच्या या कामाची दखल संयुक्त राष्ट्र पातळीवर घेण्यात आली व त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी एकदा जागतिक व्यासपीठावरुन बोलताना जग एक करण्यासाठी पासपोर्ट व इंमिग्रेशन कायदे रद्द करा, असे धाडसी विधान केले होते. परंतु, त्यांच्या या प्रस्तावाला फारशी कुणी दाद दिली नाही. 2002 साली गुजरात दंगलीनंतर अल्पसंख्याकांमध्ये विश्‍वास व्यक्त करण्यासाठी त्यांनी केलेला दंगलग्रस्त भागातील दौराही गाजला होता. त्यांच्यावर हिंदू धर्माचे विरोधक अशी अनेकदा टीकाही झाली. परंतु, माझा धर्म हा समानतेचा आहे व सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारा आहे, असे ठामपणाने सांगून ते आपल्या विरोधकांची तोंडे बंद करीत असत. 2008 साली त्यांनी काही हिंदू व मुस्लिम संघटनांना बरोबर घेऊन अतिरेकी कारवायांविरोधी परिषद दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेतली होती. त्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी इस्लाममध्ये अतिरेकी विचारांना स्थान नाही, असे ठाम प्रतिपादन केले होते. देशात त्यांनी सर्वधर्मसमभाव खर्‍या अर्थाने नांदावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अनेक आंदोलनांत ते अग्रभागी असायचे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांनी ङ्गचलो राजभवनफ अशी हाक देऊन मोर्चाही काढला होता. 2005 साली त्यांनी पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दरवाजे सर्व धर्मिसांसाठी खुले करावेत, असे आवाहन केले होते. त्यावर त्यांना अनेकांनी हिंदूविरोधी संबोधिले होते. परंतु, त्यातून त्यांनी हिंदूंचा खरा धर्म समजावून सांगण्याचा प्रयत्न कला. त्याचा फारसा उपयोग झाला नाही व ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले. अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांना ठार मारण्यासाठी बक्षीसही लावले होते. हिंदू विरोधी विधान व ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या बाजूने बोलल्याबद्दल 2018 साली त्यांच्यावर झारखंडमध्ये हल्लाही झाला होता; परंतु त्यातून ते बचावले होते. त्यांनी लिहिलेली वेदिक समाजवाद, मार्क्सवाद व धार्मिक क्रांती, गुजरातमधील दुहीची पेरणी, धर्म व मानवतावाद, हिंदुत्ववाद एक नवी दिशा ही पुस्तके गाजली होती. या सर्व पुस्तकांतून हिंदू धर्माच्या सहिष्णुततेचा खरा अर्थ समजावून सांगण्यात आला आहे. एकीकडे माणसांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासारखे मोठे काम त्यांनी केले, तर दुसरीकडे लोकांना खरा हिंदू धर्म समजावून सांगत लोकांची बौद्धिक पातळी उंचावण्याचाही प्रयत्न केला. आपल्या देशात सर्वधर्मसमभावाशिवाय काही पर्याय नाही, आपले विविधतेतून एकता हेच रुप आपल्या देशाला पुढे नेणार आहे, असे ते ठामपणाने सांगत. साधूच्या वेशातला हा तत्त्ववेधता आपल्या परिने लोकांच्या उद्धारासाठी जीवन जगला. लोकांना हिंदू धर्मातील विचार सांगत खरा हिंदू धर्म काय आहे, ते पटवून देण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. मात्र, त्यांचे हे विचार सनातनी हिंदू संघटनांना मान्य होणारे नव्हते. त्यांनी मध्यंतरी आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्ने लावून देण्याची मोहीम हाती घेतली होती. साधूच्या वेशातील हा सुधारक आपले अमूल्य काम मागे ठेवत काळाच्या ओघात लुप्त झाला आहे.

 

अवश्य वाचा