आज 1 जुलै हा डॉक्टर्स डे व त्याचबरोबरीने कृषी दिन म्हणूनही पाळला जातो. सध्याच्या कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर व शेतकरी या दोघांनीही कोरोनाशी झुंजताना मोठी लढत दिली आहे. त्यामुळे या दोन्ही योद्ध्यांना कृषीवलचा सलाम. डॉक्टरांनी दिवसाची रात्र करुन कोरोना रुग्णांसाठी आपले प्राण पणाला लावले आहेत, तर जनतेच्या पोटाची खळगी भरण्याचे काम लॉकडाऊनच्या काळातही शेतकर्‍यांनी केले आहे. या दोघांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका आजवर निभावली आहे व पुढील काळातही निभावणार आहेत. कोरोनासारख्या साथीची लक्षणे प्रथम चीनमध्ये दिसली व त्याची लागण संपूर्ण जगभर झाली. गेले सहा महिने संपूर्ण जग एका विचित्र अवस्थेत आहे. सर्वत्र वातावरण भीतीदायक आहे, भविष्य अंधारलेले आहे. अशा स्थितीत डॉक्टरांनी लॉकडाऊन असतानाही हजारो, लाखो लोकांचे जीव वाचविले आहेत. कोरोनाची साथ नेमकी काय आहे, हे समजून त्यावर उपाय करणे, हे अतिशय अवघड काम डॉक्टरांना गेल्या सहा महिन्यांत करावे लागले आहे. कोरोनावर अजूनही औषध उपलब्ध नाही. कोरोनाची प्राथमिक लक्षणे असणार्‍यांसाठी फारसे कष्ट नाहीत, मात्र त्यातून अनेक रोगांची साथ असलेल्या रुग्णांना यातून वाचविणे हे एक मोठे दिव्य काम होते. बरे, हे सर्व करीत असताना सुरुवातीच्या काळात पी.पी.ई. हे संरक्षणाचे कीट देशात उपलब्ध नसतानाही डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली. आता हे किट मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे, त्यामुळे रोग्यांचे जीव वाचविणारे डॉक्टर निर्धास्त झाले आहेत. असे असले तरीही अनेक डॉक्टरांना आपले जीव गमवावे लागले आहेत. सध्या आपण फक्त कोरोनावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, कोरोनाकडे पाहताना अन्य रोगाने त्रस्त असणार्‍या रुग्णांकडेही डॉक्टरांना पाहावे लागले आहे. अनेकदा गंभीर आजाराचे रुग्ण येतात, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे भाग पडते. सध्याच्या कोरोनासारख्या संसर्गाचा रोग फैलावलेला असताना अनेकदा तातडीच्या शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत. सध्याच्या काळात डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. आपल्याकडे एकतर लोकसंख्येचा विचार करता डॉक्टरांची कमतरता आहे, त्यातच साथीचे रोग आल्यावर असलेल्या डॉक्टरांवर अनेकदा जादा कामाचा बोजा पडतो. कोरोनाच्या काळात असेच झाले. परंतु, विनातक्रार हे सर्व करुन डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावले आहे व पुढील काळातही बजावणार आहेत. आपल्याकडे जसे डॉक्टरांची संख्या कमी आहे, तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. अशा स्थितीत डॉक्टरांची फार कुतरओढ होते. असे असले तरीही डॉक्टर आपल्या कर्तव्यापासून ढळलेले नाहीत, याचे कौतुक करावेसे वाटते. डॉक्टरांप्रमाणेच शेतकर्‍यांनी महत्त्वाची जबाबदारी कोरोनाच्या काळात बजावली; ती म्हणजे, शेतीच्या अनेक समस्या असतानाही लोकांना मुबलक कृषी उत्पादन पुरविले. आपल्याकडे शेतीच्या अनेक समस्या आहेत. शेतकरी अनेक जाचांना कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. दुष्काळी भागातील शेती ही नेहमीच धोक्यात असते. यंदाच्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीपासूनच शेती वगळण्यात आली होती. मात्र, त्याचा पुरेपूर फायदा घेत शेतकर्‍यांनी चांगले उत्पादन काढून देशातील जनतेला पुरेसे अन्नधान्य पुरविले. यातून शेतकरी व शेतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आता तरी सरकारने शेतीचे महत्त्व जाणून कृषी क्षेत्राच्या सुधारणा हाती घेण्याची गरज आहे. वर्षातला एक दिवस कृषी दिन पाळून भागणार नाही, तर कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची गरज आहे. शेतीच्या समस्यांंमुळे आता तरुण पिढी शेती करण्यास उत्साहाने पुढे येत नाही. परंतु, आपल्याला ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. शेतकर्‍यांच्या कर्जाची माफी सरकारने केली होती; परंतु कोरोनाचे संकट आले व सर्वच प्रश्‍न मागे पडले त्यात कर्जमाफीचा प्रश्‍नही लांबला. आता मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करणार असल्याचे सांगितले आहे. शेती ही स्वबळावर उभी राहिली पाहिजे. सध्या दिली जाणारी कर्जमाफी ही तात्पुरती सोय ठरली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला विदेशातून अन्नधान्य आयात करावे लागत होते. परंतु, हरित क्रांतीनंतर ही परिस्थिती बदलली व आपण कृषी माल निर्यात करण्याच्या स्थितीत पोहोचलो. आपली गेल्या सत्तार वर्षांची ही मोठी कमाई म्हटली पाहिजे. परंतु, आता शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालो पाहिजे. त्यासाठी कमी जमिनीवर जास्त पीक काढण्याचे तंत्र अवलंबिले पाहिजे. त्याचबरोबर शेतीसाठी पाणी, वीज सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. ज्या प्रकारे उद्योगांंना पायाभूत सवलती दिल्या जातात, तसेच शेतीलाही या बाबी उपलब्ध झाल्या पाहिजेत. शेती हा व्यवसाय म्हणून केला गेला पाहिजे. तसेच शेतीच्या विविध जोडधंद्यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. आजही आपल्याकडे शेती हा सर्वाधिक रोजगार देणारा ठरला आहे. जर त्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली, तर सर्वाधिक रोजगार पुरवित असताना त्याला नफ्याची जोडही लाभेल. यातून शेतकरी स्वयंपूर्ण होईल. शेतकर्‍याच्या उत्पादनाला हमी किंमत मिळाली पाहिजे. त्यामुळे शेती बळकट होईल. शेतकरी व ग्राहक यांच्यातील दलाल संपला पाहिजे. यातून शेतकर्‍याच्या खिशात जास्त पैसे पडतील, ग्राहकालाही कमी किमतीत कृषी उत्पादन उपलब्ध होईल. अशा प्रकारे शेतीला आता सुधारणांना आधुनिक टच देण्याची ही योग्य वेळ आहे. कोरोनानंतरची शेती ही बदलेली असली पाहिजे.