देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सहा लाखांवर व राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पावणेदोन लाखांच्या घरात पोहोचली असताना रायगड जिल्ह्यात आता रुग्णसंख्या चार हजारांवर गेली आहे. गेल्या काही दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढलेली दिसते. रायगड जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी 266 रुग्ण सापडणे ही सर्वात धोकादायक बाब म्हटली पाहिजे. रायगड जिल्हा हा मुंबईला जोडून असल्याने कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. कारण, नवी मुंबई, ठाणे व मुंबई या शहरात कोरोनाची लागण सध्या वेगाने होत आहे. येथून जिल्ह्यात येणार्‍यांची व जाणार्‍यांची संख्या मोठी असते. प्रामुख्याने 8 जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यापासून रायगडात नोकरीनिमित्त व विविध कामांसाठी येणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यातून ही साथ फैलावण्याचा धोका जास्त होता. नेमके तसेच झाले. गेल्या महिन्याभरात रायगडातील रुग्ण झपाट्याने वाढल्याचे आकडेवारी सांगते. पनवेलचा धोका त्यापूर्वीच वाढलेला होता. कारण, पनवेल हे शहर आता मुंबईचे उपनगर झाले आहे. त्यामुळे येथे मुंबईतून येणार्‍यांची रहदारी पनवेलसाठी धोकादायक ठरत होती. त्याखालोखाल उरणला लागण झाली, त्याचेही कारण तसेच आहे. जेएनपीटीसारखे मोठे बंदर असल्याने तेथील रहदारी रोखता येत नाही. त्याचबरोबर येथे अंत्ययात्रेत एकदा गर्दी झाली व त्याचे पडसाद लगेचच दिसले. त्यामुळे गेले तीन महिने संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये अडकला असताना अजूनही साथ फैलावण्याच्या कारणापासून जनता दूर राहायला तयार नाही, हे मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. सध्या रायगडातील कोरोनाग्रस्तांची संख्या धोक्याच्या पातळीवर असून, आत्ताच प्रशासनाने निर्बंध घालण्याची योग्य वेळ आहे. ठाणे, डोंबिवली या शहरांत साथ वाढू लागल्यावर पुढील दहा दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा प्रशासनाने योग्य निर्णय घेतला आहे. सध्या तेथे कोरोनाची साथ वाढत चालली आहे, त्याला अटकाव करण्यासाठी हे उपाय योग्यच आहेत. मुंबईतही गेल्या पंधरा दिवसांत लोकांची अनावश्यक रहदारी वाढली असून, त्याविरोधात पोलिसांनी कारवाई करुन लोकांना दणका द्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन सुरु ठेवून अनलॉक प्रक्रिया सरकारने सुरु केली आहे, याचा अर्थ सर्वांना मुक्तद्वार दिले आहे, असे नव्हे. अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर जायचे आहे व तेदेखील सर्व प्रकारची सावधानगिरी बाळगूनच. सरकार याविषयी वारंवार सांगत असूनही गेले तीन महिने घरात कोंडून बसलेले नागरिक आता बेभान झाल्यासारखे वावरत आहेत. त्याला आळा घालण्याची गरज आहे. नोकरी, धंदा, पोटापाण्यासाठी बाहेर पडणे आपण समजू शकतो. परंतु, विनाकारण बाहेर पडणे म्हणजे साथ पसरविण्यासाठी हातभार लावण्याचा प्रकार आहे. मुंबईत मंगळवारी एकाच दिवशी पोलिसांनी 17 हजार दुचाकी व चारचाकी वाहने जप्त केली. वाहनचालकांवर दंड तर ठोठावलाच, शिवाय त्यांचे वाहन जप्त करुन लॉकडाऊन उठवल्यावर परत दिले जाणार आहे. पोलिसांची ही कारवाई थोडी क्रूर वाटली, तरी नाईलाज आहे. दुचाकी वाहनावर एकालाच परवानगी दिली आहे. असे असले तरी हा नियम मोडत अनेक जण दोन व तीन जण दुचाकीवरुन जातात. त्यांना प्रशासनाने शिस्तीचा बडगा दाखविणेच योग्य ठरते. प्रशासनाला सहकार्य करण्याची जनतेने तयारी ठेवली पाहिजे, अन्यथा ही साथ किती धोकादायक ठरु शकते, हे आपण जगात पाहिले आहे. इटलीतील भयानक स्थिती आपल्यालाही आणावयाची आहे का, असा सवाल आहे. रायगड जिल्हा जसा औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे, तशीच तेथे शेतीही अजून मोठ्या प्रमाणात चालते. मुंबईशी येथील प्रत्येक गाव जोडलेला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत रायगडातील मुंबईकर आपल्या गावी येऊन स्थिरावले. त्यांना नकारही देता येत नाही. परंतु, त्यांना आल्यावर अनेक गावांतून 15 दिवस क्वारंटाईन करण्यात आले. अनेक गावांत त्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. असे असले तरीही मुंबईकर येताना साथ घेऊन आलेच. त्यामुळे पनवेल वगळता अन्य ग्रामीण भागात जी साथ फैलावली नव्हती, तिला हातभार त्या गावात आलेल्या मुंबईकरांनी लावला. जिल्ह्यातील औद्योगिकीकरणामुळे ही साथ फैलावण्यास हातभार लागला, कारण गेल्या महिन्याभरात जवळ-जवळ सर्वच कारखाने सुरु झाले आहेत. जेएसडब्ल्यूसारखा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचे सांगत चालूच ठेवला. याचा परिणाम म्हणून आता जवळपास प्रत्येक तालुक्यात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. प्रामुख्याने पेण, रोहा, उरण, माणगाव, अलिबाग, महाड, म्हसळा, पोलादपूर येथे अजूनही स्थिती हाताबाहेर गेली नसली, तरीही धोका वाढत चालला आहे. अलिबागसारख्या जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून लोक खरेदीसाठी बाहेर पडून गर्दी करतात. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत नियमांचे कडक पालन होते किंवा नाही ते पाहून पुढील पाऊल, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात जिकडे धोका जास्त आहे, तेथे लॉकडाऊन पाळण्याची गरज आहे. प्रशासनाने जबरदस्ती करुन नियमांची अंमलबजावणी करण्यापेक्षा जनतेनेच पुढे येऊन नियम पाळले पाहिजेत. तसे केल्याने प्रशासनावरील भार कमी होईल व जनतेतील जागृतीचे दर्शन होईल. प्रशासनाने त्यासंबंधी कडक इशारा देऊनही नियम न पाळल्यास जिल्ह्यातील काही भागांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीने पुढील पाच दिवस लॉकडाऊन पाळण्याच्या उपक्रमाचे स्वागत झाले पाहिजे व त्यांचे अनुकरण अन्य गावांनी केले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोना वाढत गेल्यावर उपाययोजना करण्याऐवजी वेळीच उपाय योजावेत.

 

अवश्य वाचा