Wednesday, December 02, 2020 | 12:41 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

एक वर्षानंतर...
रायगड
20-Nov-2020 08:05 PM

रायगड

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये सापडल्याला आता बरोबर एक वर्ष झाले आहे. कदाचित त्याअगोदरही सापडला असेलही परंतु चीनने 19 नोव्हेंबर रोजी जगाला याची माहिती दिली. गेल्या वर्षात कोरोनाने संपूर्ण जगाला व्यापले आहे. संपूर्ण जगाची पूर्णपणे दमछाक या व्हायरसने केली. चीनमधून उत्पन्न झालेला हा व्हायरस तेथेच रोखता आला असता का? चीनने मुद्दाम याची निर्मीती करुन जगात पसरवला का? या प्रश्‍नांसह अनेक प्रश्‍नांची उत्तरे काळाच्या ओघात मिळणार आहेत. मात्र एक बाब आहे की कोरोनाने जगातील सुमारे दहा कोटी लोकसंख्या व्यापली आहे व दहा लाखाच्या वर बळी घेतले आहेत. कोरोना संपुष्टात येतो आहे असे दृष्टीक्षेपात येत असताना दुसरी लाट युरोपात येऊन धडकली आहे. यासंदर्भात शंभर वर्षापूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूची आठवण देताना असे सांगितले जात की, स्पॅनिश फ्लूच्या दुसर्‍या लाटेत दीड करोड लोक मरण पावले होते. शंभर वर्षाने याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कितीही प्रार्थना केली तरी भविष्यात काय होईल हे आत्ताच काही सांगता येत नाही. एकूणच पाहता संपूर्ण जगाला कोरोनाने पूर्णपणे ढवळून काढले आहे. जगाने कोरोनाच्या संकटाचा धोका सांगितल्यावरही आपण बराच काळ निर्धास्त होतो. मार्च महिन्यांपर्यंत आपल्याकडे आन्तरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍यांची तपासणी होत नव्हती. त्याच महिन्यात अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या प्रचारार्थ मोदींनी मेळावा भरविला. त्याला 50 हजार लोकांची उपस्थिती होती. त्यानंतर मध्यप्रदेशातील सरकार पाडल्यावर आपल्याकडे सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत आपल्याकडे बहुतांशी महानगरात कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले होते. 22 मार्च रोजी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळल्यावर 24 मार्चपासून तीन आठवड्याचा लॉकडाऊन सुरु झाला. सरकारने लोकांची अशी समजूत करुन दिली की, या तीन आठवड्यानंतर कोरोना पळून जाईल. परंतु दिवसेंदिवस लॉकडाऊन मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच गेले. त्यानंतर लॉकडाऊन हा देखील एक इव्हेंन्ट करण्याचा प्रयत्न झाला. यातूनच लोकांना टाळ्या पिटणे, थाळ्या वाजविणे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. यामुळे कोरोनाचे गांभीर्य कोणाला पटले नाही. चार महिने कडक लॉकडाऊन पाळल्यावर सरकारने हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. कारण तसे करण्याची गरजही निर्माण झाली होती. कारण कोरोना आता एवढ्या लवकर संपत नाही हे सर्वांनाच पटले होते. बहुतांशी देशांनी लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या आपापल्या अर्थव्यवस्था आता उघडण्यास सुरुवात केली होती. जिथून कोरोना सुरु झाला त्या चीनने तब्बल 90 दिवसांनंतर हुनोई प्रांतातून कोरोना हद्दपार केला होता. परंतु अन्य शहरात कोरोना पसरल्याच्या बातम्या होत्या. मात्र चीनमध्ये नेमके काय चालले आहे हे समजणे कठीण असल्याने चीनच्या खर्‍या बातम्या मिळत नाहीत. आपल्याकडे लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेकांचे पगार कमी झाले. सरकारने केवळ कंपन्यांना असे करु नकात असे आवाहन केले, मात्र त्यांच्यावर सक्ती काही केली नाही. त्यामुळे कामगार, कर्मचारी यांचे खूपच हाल झाले. सर्वात हाल झाले ते स्थलांतरीत मजुरांचे. बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, आसाम या मागास राज्यातून महानगरात पोटापाण्यासाठी आलेल्या मजुरांचे तांडेच्या तांडे तीन महिने वाट पाहून चालत आपल्या गावी गेले. सुमारे 15 करोडहून जास्त लोकांनी अशा प्रकारे भर उनातून शेकडो मैल चालत जाऊन आपले गाव गाठले. केंद्र सरकारने त्यांच्या घरी गावाला पाठविण्यासाठी कसलीही सोय केली नाही. लोकसभेत तर त्यांची काहीच माहीती उपलब्ध नसल्याचे निर्दयीपणे सांगितले. औरंगाबादजवळ रेल्वेखाली 12 मजूर आल्यावर सरकारचे डोके ताळ्यावर आले व त्यानंतर मजुरांसाठी खास रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय झाला. त्या गाड्यांचे भाडे देखील त्यांच्याकडून वसूल करण्यात आले. गरीबांसाठी चार महिने रेशनवर धान्य देण्याचा उपक्रम राबविला खरा परंतु त्याचा लाभ कितपत लोकांना मिळाला ते लाभार्थीच सांगू शकतील. कोरोनाच्या अगोदरच आपली अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. सरकारला आता अर्थव्यवस्थेचे खापर कोरोनावर फोडण्याची एक आयती संधी उपलब्ध झाली. आता आपण कोरोना रुग्णांच्या यादीत अमेरिकेच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर असून आपल्याकडील रुग्णसंख्या 90 लाखांवर गेली आहे. तर मृतांची संख्या लाखांवर गेली आहे. गेल्या पंधरा दिवसात आपल्याकडे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत होती. परंतु दिवाळीत ज्या प्रकारे लोकांनी गर्दी केल्याचे दिसले ते पाहता कोरोना पुन्हा उसळी घेणार हे नक्की आहे. आपल्याकडे गणपती असो की ओणम प्रत्येक सणांनंतर कोरोना वाढल्याचे चित्र दिसले. त्यामुळे आपल्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढतो हे आपल्याला पटूनही आपण त्यातून बोध घेत नाही. राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी केली असली तरी जनतेने आपली जबाबदारी विसरता कामा नये. सरकारने आता बहुतांशी क्षेत्रे खुली केली आहेत. परंतु याचा अर्थ कोरोना हद्दपार झाला असे नव्हे. आपल्याला लस बाजारात येईपर्यंत सावधानता ही बाळगावीच लागणार आहे. येत्या तीन महिन्यात कोरोनावरील लस बाजारात आल्यावर कोरोनाचा प्रभाव खर्‍या अर्थाने कमी होण्यास सुरवात होईल. कोरोनात एक वर्ष गेले आहे अजून किती काळ कोरोनाला हद्दपार करण्यात जाईल ते आता पहावे लागेल. कोरोनामुळे गेली सहा महिने बंद असलेली धार्मिक स्थळे आता सुरु झाली आहेत. देवळे उघडल्याने कोरोना थांबणार नाही तर कोरोनाला विज्ञानाने तयार केलेली लसच थांबविणार आहे. हे वास्तव आपण विसरता कामा नये.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top