अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या अजून बरेच दिवस गाजणार असेच दिसत आहे. त्यातील अनेक कंगोरे आता उघड होऊ लागले आहेत. सुशांतसिंगचा खून नसून, ती आत्महत्याच आहे, असे डॉक्टरांनी जाहीर केल्यानंतर या प्रकरणातील सर्व हवाच निघून गेली आहे. भाजपने हा खून असल्याची एक नवी थेअरी मांडून त्यात मंत्री सहभागी असल्याची कंडी पिकवली होती. परंतु, हे सर्व झूठ आहे, बिहारच्या निवडणुकीवर डोळा ठेवून याचा राजकीय फायदा उठविण्यासाठी केलेली ही एक खेळी होती, हे आता उघड झाले आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा कंगोरा म्हणजे सोशल मीडियाचा वापर करुन जनतेचा बुद्धीभेद करण्याचा भाजपच्या सोशल मीडिया टीमने केलेला प्रयत्न. सध्या जनतेची दिशाभूल करण्याचे हे एक नवीन तंत्र गेल्या पाच-सात वर्षांत चांगलेच विकसित झाले आहे. सुशांतसिंगची आत्महत्या नव्हती व तो खूनच होता, तसेच यातील खून्यांना वाचविण्याचा प्रयत्न राज्यातील एक तरुण मंत्री करीत आहे, हे भाजपच्या सोशल मीडियाने जनतेवर ठासून सांगण्यासाठी जंगजंग पछाडले. मुंबई पोलिसांची यातून बदनामी करण्यात आली. त्यासाठी त्यांनी 80 हजार फेक अकाऊंट्स ओपन केले गेले व लोकांचा बुद्धीभेद करण्याची एक जोरदार मोहीम उघडण्यात आली. त्या 80 हजार फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून खोट्या बातम्या पेरण्यात आल्या. त्या खोट्या बातम्यांना न्यूज चॅनेल्सनी साथ दिली. ही त्यांनी साथ कशासाठी दिली? त्यामागे काही आर्थिक व्यवहार होता का? याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडिया जसा फायदेशीर, तसाच त्याचा वापर दिशाभूल करण्यासाठी सफाईतरित्या करता येतो. लोकांना याविषयी जागृती नाही. आपल्यासमोर सोशल मीडियात किंवा अगदी चॅनेल्सवर येणारी बातमी खरीच आहे, असे गृहीत धरुन लोक आपली मते बनवतात. आपल्याकडे लोक साक्षर जरुर झाले आहेत; परंतु बिटविन्स द लाईन्स वाचण्याची आपल्याकडे साक्षरता अजूनही विकसित झालेली नाही. त्याचबरोबर आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कोणत्याही बातमीची शहानिशा न करता ती आपल्या मित्रांना, नातेवाईकांना फॉरवर्ड करण्याची घाई करतो. याचा परिणाम असा होतो, की ही खोटी पेरलेली बातमी झपाट्याने पसरण्याचा हेतू सहज सफल होतो. अशा समाजविघातक बातम्या  पसरविण्याचा ज्या समाजकंटकाचा कट असतो, त्यात आपण नकळत ओढले जातो. ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरुन येणार्‍या बातम्या वाचून ज्या प्रकारे लोकांचे शिक्षण केले जाते, ते पाहून याला व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठ असे जे संबोधले आहे, ते योग्यच आहे. सोशल मीडियाचा वापर करुन व खोट्या बातम्या प्रसारित करुन भाजपने अनेकांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची गेल्या दहा वर्षांत अशाच प्रकारे सोशल मीडियाला हाताशी धरुन बदनामी करण्यात आली. त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली. त्यांनी राहुल गांधीच का टार्गेट केले होते? कारण, भाजपला सर्वात धोका वाटतो तो गांधी घराण्याचा. त्यामुळे काँग्रेसवर हल्ला करताना त्यांचे जे मूळ गांधी घराणे आहे, त्यावरच हल्ला करणे योग्य ठरेल, असे त्यांनी गणित आखून त्याची सर्व राजकीय व्यूहरचना तयार केली. अर्थातच यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा माध्यम प्रभावीपणाने वापर केला. लोकांना राहुल गांधींची जाणीवपूर्वक केली जाणारी बदनामी समजली नाही व त्यांची प्रतिमा मलिन करुन ङ्गपप्पूफ ही उपाधी त्यांना जोडून दिली. भाजप त्यात जरुर यशस्वी झाली असली तरी, हे दरवेळी होऊ शकत नाही. सुशांतसिंगच्या निमित्ताने हे सर्व उघड झाले आणि भाजपचा पोलखोल झाला. अर्थात, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांना शिक्षा करण्याची आवश्यकता आहे. भाजप यात कुठेही पुढे दिसणार नाही; परंतु सोशल मीडियाचे भाडोत्री लोक पुढे करुन हे केले जात असावे. अर्थात, त्यांच्या दृष्टीने भाजप हा क्लॉयंट आहे. मात्र, भाजपसाठी किंवा अन्य कुणासाठीही आपण चुकीचे काम अशा प्रकारे करणे व लोकांचा बुद्धीभेद करणे, हा मोठा गुन्हा आहे, हे त्यांना समजले पाहिजे. एकाच वेळी या कामासाठी 80 हजार नवीन खाती उघडून प्रचार करणे, हे तंत्र म्हणजे गोबेल्सनीतीहून काही वेगळे नाही. जर्मनीला रसातळाला नेणारा व जगाला महायुद्धात लोटणार्‍या हिटलरचा हा सहकारी गोबेल्स अशाच प्रकारे लोकांवर खोटे बिंबविण्याचे काम करायचा. त्यावरुन याला गोबेल्सनीती हे नाव पडले. आज हे आधुनिक काळातील गोबेल्स आहेत. सध्या सोशल मीडियाचा वापर करुन हे गोबेल्स सक्रिय झाले आहेत. ही गोबेल्सनीतीची किड वेळीच ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने याची चौकशी करुन यातील खरे गुन्हेगार देशापुढे आणले पाहिजेत. या माध्यमातून राज्य सरकारची व पोलिसांची बदनामी करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तडा लावत असतानाही त्यांच्यावर खोटे आरोप लावले गेले व ते कुणाला तरी वाचवित असल्याचे ठासविले गेले. हे सर्व उघड झाले पाहिजे व भाजपचा व त्यांच्या सोशल मीडियाचा पर्दाफाश केला पाहिजे. सोशल मीडियाचाही जनतेने वापर करताना किती सावधानगिरी बाळगली पाहिजे, याचा धडा जनतेने घेण्याची आवश्यकता आहे.