Saturday, December 05, 2020 | 10:26 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

काळजी घेणे महत्त्वाचे...
रायगड
09-Nov-2020 07:26 PM

रायगड

कोरोनावर आपण आता नियंत्रण मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, ही अत्यंत समाधानाची बाब असली तरीही खबरदारी पावलोपावली घेण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला दिलेल्या सोशल मीडियावरील संदेशात प्रतिपादन केली आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे जनतेशी केलेला एक सुसंवाद असतो. गेल्या काही महिन्यात कोरोनाशी जबरदस्त लढा दिल्यावर आता एक नवा त्यांच्यात आत्मविश्‍वास दिसत आहे. अर्थात, मुख्यमंत्र्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते याबाबतचे कोणतेही श्रेय स्वत: घेताना दिसत नाहीत, तर त्याचे श्रेय ते जनतेच्या पदरात टाकतात. जनतेच्या हितासाठी वाईटपणा घेण्याची वेळ आली तर आपण घेऊ, असे खुलेपणाने सांगतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांचे भाषण म्हणजे घरातील एका कर्त्या पुरुषाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना समजाविल्यासारखे असते. एक सुसंस्कृत, विचारी, संयमी व पदाचा गर्व नसलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने आपल्याला लाभला आहे. आजवर कोरोनाच्या काळात व रविवारी त्यांनी केलेले भाषण हा एक जनतेशी साधलेला सुसंवाद होता व त्यात एक आपुलकीची झाक होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या या संदेशात अनेक महत्त्वाचे मुद्दे जनतेला सांगितले आहेत, त्याचे पालन करणे हे आपले कर्त्यव्यच ठरणार आहे. कारण, प्रत्येकाची ही जबाबदारी ठरणार आहे. सरकार प्रत्येक बाबतीत सक्ती करु शकत नाही, तर समजावू शकते. गेले आठ महिने आपण विविध सण घरातच साजरे करीत आहोत. प्रत्येक धर्मीयांनी त्याविषयी बंधन पाळले आहे. याबाबत त्यांनी सर्वधर्मियांनी पाळलेल्या संयमाचे कौतुक केले. आता दिवाळीसारखा मोठा सण येत आहे, त्यामुळे यात बाळगावयाची खबरदारी फार महत्त्वाची ठरणार आहे. दिवाळीच्या सणात फारसे कोणाला न भेटता, कुठे न फिरता, सण साजरा करणे गरजेचे आहे. दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण. तो सण दिव्यांच्या ज्योतींनी जरुर साजरा करा; परंतु मोजकेच फटाके लावा. सध्याच्या कोरोनाच्या अंधकारमय जीवनातून आपण दिवाळीच्या या प्रकाशातून एक नवा आशेचा प्रकाश शोधू. आपल्याकडे कोरोना कमी होत असला तरी दिल्लीसह काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढते आहे. आपल्याकडे कमी होत असली तरीही फटाके लावल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. देशातील पाच राज्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर बंदीच घातली आहे. राज्यात एवढी सक्ती करण्यात आलेली नसली तरी मुख्यमंत्र्यांनी जनतेला संयमाने वागा व फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. कारण, फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाचे वाईट परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागणार आहेत. त्यामुळे जनतेने यंदा फटाके फोडू नयेत, या आवाहनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे सध्या कोरोनाचा ग्राफ कमी होत असला तरी युरोपात असेच चित्र होते. मात्र, तेथे अचानक कोरोनाने आता उसळी घेण्यास सुरुवात केली असून, अनेक देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. आपल्याकडे तसे झाल्यास आपल्यावर मोठे संकट येईल, हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. आपल्याकडे आता बहुतांशी बाबी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी वाढत आहे. सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी झुंबड होत आहे. अशा स्थितीत दिवाळीनंतर आपल्याकडील कोरोनावाढीचा धोका जास्त आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वीच सावधानता बाळगणे गरजेचे ठरणार आहे. देऊळ व धार्मिक स्थळे उघडण्यासंबंधी सरकार घाई करणार नाही. कारण, त्याचे दुष्परिणाम जास्त भोगावे लागतील. एकदा का मंदिरे उघडली, की तेथे मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जातील व त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपण देवळे उघडण्याच्या सध्या तरी बाजूने नाही, हे मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रतिपादन योग्यच आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका. उद्या जर मंदिरे उघडली, तर जबाबदारी आमची म्हणजे सरकारची असणार आहे, हे विरोधक काही जनतेची जबाबदारी घेणार नाहीत, हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे योग्यच आहे. राज्य सरकारची ङ्गमाझे कुटुंब, माझी जबाबदारीफ ही मोहीम सर्वात यशस्वी झाली. त्यासाठी ज्या 60 हजार कर्मचार्‍यांनी कष्ट घेतले, त्यांचे त्यांनी हात जोडून विन्रमपणे आभार मानले. एवढा विन्रमपणा आजवर कोणत्या मुख्यमंत्र्यांमध्ये पाहावयास मिळालेला नव्हता. सरकारच्या या योजनेमुळे कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात ठेवण्यात यश आले व त्याला सर्वांनीच दाद दिली आहे. यानिमित्ताने राज्यातील विविध रोगांचे नेमके किती रुग्ण राज्यात आहेत, याचा आढावा सरकारला घेता आला. सरकारची ही योजना चांगलीच यशस्वी झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांची आगाऊ सूचना मिळू शकली. आज कोरोना नियंत्रणात आल्यासारखे दिसत असले तरी सावधानता बाळगावी लागणार आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात सतत धुवा व मास्क वापरा, हे सक्तीने प्रत्येकाला करावे लागणार आहे. तसे करुनच सध्याच्या स्थितीत आपण कोरोनाला आटोक्यात ठेवू शकतो. त्यादृष्टीने पाहता मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश फार महत्त्वाचा व मोलाचा ठरणार आहे. कोरोनाला आटोक्यात ठेवणे हे आपल्याच सर्वांच्याच हातात आहे. सध्या आपल्यावर दुसर्‍या लाटेची भीती आहे; परंतु हे संकट आपणच टाळू शकतो. त्यासाठी जी खबरदारी घ्यावयाची आहे, त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला व आपल्याला प्रेमळ भाषेत इशारा दिला आहे. आता आपल्या हातात सर्वच आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top