Wednesday, December 02, 2020 | 02:06 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

बाय बाय मान्सून
रायगड
02-Oct-2020 05:52 PM

रायगड

यंदाच्या पावसाळ्यात धुवाँधार बॅटिंग करुन मान्सून आता आपल्या परतीच्या प्रवासाला लागला आहे. त्यामुळे आता मान्सूनला बाय बाय करण्याची वेळ आली आहे. यंदाचा संपूर्ण पावसाळा कोरोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीत गेला. शतकातून उद्भवलेल्या या स्थितीचा सामना आपण आजही करीत आहोत. आपण लॉकडाऊनमुळे घरात बसलो असलो तरीही निसर्ग मात्र आपले चक्र काही विसरत नाही. पावसासाठी मात्र लॉकडाऊनचा अपवाद होता. कोरोनामुळे सर्व देश लॉकडाऊनमध्ये असताना पावसाळा काहीसा उशिरा आला; परंतु आला त्यानंतर चांगलाच बरसला. यंदा समाधानकारक पाऊस बहुतांशी ठिकाणी पडला आहे. नेहमीच्या दुष्काळी भागातही त्याने आपले अस्तित्व दाखवून त्याने सर्वांनाच यंदा दिलासा दिला आहे. अनेक ठिकाणी नुकसानही करुन गेला आहे. मात्र, पावसाच्या येण्याचा दिलासा हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. जूनमध्ये सुरुवातीलाच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला हलवून सोडले. हे वादळदेखील शंभर वर्षांनंतर आले. आजवर कोकण किनारपट्टीला वादळ येण्याची परंपरा नाही. परंतु, अपवादात्मक स्थितीत वादळ येते, ते नेमके कोरोनाच्या काळातच आले, हे एक आणखी दुर्दैव. या वादळानंतर पावसाळा काहीसा लांबला; परंतु शेवटी त्याने आपला बाडबिस्तार उचलण्याच्या अगोदर आपल्या सरासरीपेक्षा जास्तच गाठून गेला. त्यामुळे यंदाचा पावसाळा सर्वांसाठीच समाधानकारक ठरला आहे. मुंबईसह यंदा सारसरी तीन वेळा पावसाने जबरदस्त तडाखा दिला. त्या काळात मुंबईसह तिची उपनगरे पाण्याखाली गेली. अशी परिस्थिती मुंबईत यंदा तीन वेळा आली. अर्थात, हे संकट पावसामुळे नाही, तर मनुष्याच्या नियोजनाअभावी आले, हे मान्यच करावे लागेल. मुंबईसारख्या दीड कोटी लोकसंख्या असलेल्या महाकाय शहरात 2005 साली अशीच तुफानी वृष्टी झाली होती. परंतु, त्यानंतर ज्यांच्या शिफारशी आल्या त्याला आपण लाल फितीत गुंडाळले. त्याची जर प्रभावी अंमलबजावणी आपण केली असती, तर यंदाचे मुंबईवर तीन वेळा आलेले संकट आले नसते, हेही तितकेच खरे. अर्थात, मुंबईकरांसाठी ही बाब आता दर पावसाळ्यातील ठरली आहे. आता पावसाने आपला बोर्‍या विस्तारा गुंडाळावयास सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हा परतीचा प्रवास 15 ऑक्टोबरच्या आसपास संपेल. दरवर्षीपेक्षा यंदा परतीचा प्रवास 11 दिवस उशिराने सुरु झाला असला तरी, नेहमीपेक्षा हा प्रवास लवकर संपेल, असा अंदाज आहे. राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश या भागातून हा परतीचा प्रवास सुरु होईल. नैऋत्य मोसमी वार्‍यांचा पाऊस थांबल्यावर दक्षिणेकडील राज्यातून 15 ऑक्टोबरच्या दरम्यान ईशान्य मोसमी वार्‍यांचे आगमन सुरु होते. सर्वसाधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस थांबला की, मध्य भारतातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊ लागते. अजूनही ईशान्येतील हे वारे सुरु झालेले नाहीत. खरे तर, पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेता, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. परंतु, गेली काही वर्षे पावसाचा परतीचा प्रवास लांबत चालला आहे. तसेच त्याने नियमित जूनमध्ये हजेरी लावल्यावर पुन्हा काही दिवस गायब होतो व जुलैपासून वेग घेतो, असा काही वर्षातला अनुभव आहे. त्यामुळे मान्सून आता महिन्याभराने लांबला आहे व त्यामुळे त्याचा परतीचा प्रवासही उशिराने सुरु झाला आहे. अर्थात, या बदलत चाललेल्या ऋतुचक्राचे कारण काही अद्याप समजलेले नाही. मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात पश्‍चिम राजस्थानातून होते. तेथून त्याची परतण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. त्यानंतर कधी पाऊस पडल्यास तो बिगर मोसमी असतो. हा पाऊस तसा दरवर्षी पडतोच असे नाही. मात्र, पडल्यास शेतीचे नुकसान करुन जातो. यंदाच्या चक्रीवादळाने तसेच अतिपावसामुळे झालेले कोकणातील नुकसान मोठे आहे. त्यात नारळ-सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. भाताचे कोठार समजला जाणारा रायगड जिल्हा आता ते कोठार राहिलेला नाही. वाढते औद्योगिकीकरण, न परवडणारी शेती, पावसाची अनिश्‍चितता यामुळे अनेक शेतकर्‍यांनी शेतीला राम राम केला आहे. सरकारचे शेतकर्‍यांकडे व शेतीकडे जे गेल्या काही वर्षात दुर्लक्ष झाले आहे; ते पाहता, शेती करणे हे काही फायद्याचे गणित नाही, हे लहान व मध्यम शेतकर्‍याला पटले आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा शहरात जाऊन नोकरी केलेली बरी, असा त्याचा कल आहे. अर्थात, त्याची ही भूमिका त्याच्या अर्थकारणातून आलेली आहे; परंतु हे देशाच्या हिताचे नाही. सर्वांनीच शेती करणे सोडले तर या देशात अन्नधान्य कोण पिकविणार, असादेखील सवाल आहे. अर्थात, ही स्थिती केवळ कोकणातील नाही, तर सर्वच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात यंदा हातातोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीमुळे गेली. त्यामुळे खरीपातील अनेक पिके वाया गेली. यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात पिके व फळांची स्थिती काही समाधानकारक नाही. दरवेळी संकटे दारात असलेल्या विदर्भातही यंदा काही वेगळी स्थिती नाही. बियाणे टंचाई, बोगस बियाणे, पीक कर्जाचे अल्प वाटप, या समस्यांना तोंड देत असताना, विदर्भात परतीच्या पावसाने अनेकांच्या तोंडी आलेला घास काढून घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातही हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहेत. मराठवाड्याच्या संकटात दरवर्षीप्रमाणे यंदाही काही बदल झालेला नाही. सततच्या संकटांमुळे येथीलही पिके हातची वाया गेली आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाला बाय बाय करताना पुढच्या वर्षी वेळेत ये आणि अतिवृष्टी नको, असेच सांगावेसे वाटते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top