Tuesday, April 13, 2021 | 01:09 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!
रायगड
26-Feb-2021 04:41 PM

रायगड

 

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन या अत्यंत गौरवास्पद अशा दोन्ही दिवसांच्या निमित्तानं साजरीकरण सुरू असताना अनेक महत्त्वपूर्ण बाबींचं अवलोकन करणं गरजेचं ठरतं. औचित्याचं आणखी एक  कारण म्हणजे येत्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नावाजलेले खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर भूषवत आहेत. त्यांचं संशोधनक्षेत्रातलं कार्य वादातीत आहेच खेरीज विज्ञानकथांना वेगळी प्रतिष्ठा आणि उंची देण्यातही त्यांचा मोलाचा हातभार आहे. म्हणूनच साहित्य संमेलनाच्या मंचावर यंदा भाषा आणि विज्ञान यांचा अपूर्व संगम जुळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर साजर्‍या होणार्‍या मराठी राजभाषा आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या या लागोपाठच्या दिवसांचा मुहूर्त साधायलाच हवा. 

सध्याचं युग विज्ञानयुग आहे. त्यामुळे विज्ञाननिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवणं गरजेचं आहे. आधुनिकता म्हणजे विवेक आणि विज्ञान असं समीकरण स्थिर होणं गरजेचं आहे. कारण विज्ञान शिकूनही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असेल तर काहीही साध्य होणार नाही. शोध आणि सिद्धांत जाणून घेण्याबरोबरच जगणं अर्थपूर्ण आणि सुकर करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे. कारण हे दुधारी शस्त्र आहे. बर्‍या आणि वाईट अशा दोन्ही अंगांनी त्याचा उपयोग करुन घेता येतो. म्हणूनच माणसाचं हित हाच विज्ञान आत्मसात करण्यामागचा अंतिम उद्देश असायला हवा. कुठलीही गोष्ट आंधळेपणानं न करण्याचं सूत्र विज्ञानाकडून शिकता येतं आणि पटलं तरच स्वीकारायचं हा दृष्टिकोन वैज्ञानिक विचारसरणीमुळे मिळतो. 

सध्या विज्ञानाच्या नानाविध शाखा विकसित झाल्या असून विज्ञानविकासाला अफाट गती लाभली आहे. मात्र अशा या विज्ञानाचं आकलन होण्यासाठी मातृभाषेतून शिकलं पाहिजे हा विचार जगानं मान्य केला आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये प्रगत विज्ञान शिकवण्यासाठी त्या त्या देशातल्या भाषेचाच माध्यम म्हणून स्वीकार होतो. चीनमधले 140 कोटी लोक एकच भाषा बोलतात आणि याच भाषेतून सगळ्या शाखांमधलं शिक्षण घेतात.  मात्र भारतातली स्थिती वेगळी असून विविध बोली भाषा ही आपली समृद्धी आहे. या देशात संविधानानं संमत केलेल्या प्रमुख 22 भाषा आहेत. याखेरीजही अनेक भाषांमधून व्यवहार होत असतो. या स्थितीमुळे आपल्या देशाची कोणतीही एक भाषा नाही. हिंदीलादेखील राष्ट्रभाषेचा दर्जा नाही. अनेक वर्षं इंग्रजी भाषिकांचं राज्य झेलल्यामुळे या भाषेला सरावलेल्या आणि रुळलेल्या वर्गानं इंग्रजी भाषेलाच संपर्कभाषेचा दर्जा दिला आणि या देशात इंग्रजांनीच आपल्या भाषेतून आधुनिक विज्ञान आणल्यामुळे तो स्थिर झाला. न्यायव्यवस्था, प्रशासन व्यवस्था, बँकिंग आदी ठिकाणी इंग्रजीचा वापर होत असल्यामुळे आपण इंग्रजीची कास धरत गेलो. यातूनच एक अभिजन वर्ग निर्माण झाला; ज्याचं इंग्रजीवर प्रभूत्व होतं. साहजिकच इंग्रजीची जाण हे या वर्गाचं वाढीव कौशल्य ठरलं आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध होत गेल्या. 

कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये सर्वप्रथम विद्यापीठांची स्थापना झाल्यामुळे या तीन राज्यांनी इंग्रजीसंदर्भात विशेष प्रगती केली. विशेषत: इंग्रजी भाषिक देशांमधल्या (अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी आयटी क्षेत्र विस्तारलेल्या) रोजगारसंधींसाठी त्यांना प्राधान्य दिलं गेलं. भारतामध्ये इंग्रजीची प्रतिष्ठा वाढत गेली आणि इंग्रजी म्हणजे ज्ञान हा गैरसमज पसरत गेला. मात्र इंग्रजी ही मराठीप्रमाणे केवळ एक भाषा आहे. त्यातून ग्रहण करता येणारं ज्ञान मराठीमधूनही मिळवता येतं, हा विचार मागे पडला आणि त्यातूनच मराठीची पिछेहाट होत गेली. केवळ साहित्य म्हणजे भाषा नसते तर भाषा हे ज्ञान आणि विज्ञान ग्रहण करण्याचं प्रभावी माध्यमही असतं. एखादा जर्मन माणूस जर्मन भाषेतून विज्ञानशाखेतलं शिक्षण घेऊन संशोधन, प्रयोग करुन आपला प्रबंध लिहित असेल तर ते मराठीतही सहजशक्य आहे. मात्र आपल्याकडे हा दृष्टिकोनच दिसत नाही. आजही 80 ते 85 टक्के प्रबंध इंग्रजीतूनच लिहिले जातात. कारण आपण इंग्रजी भाषा हीच  ज्ञानभाषा मानली आहे. राज्यातच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशातच हा समज इतका दृढ आहे की मध्यंतरी आंध्र प्रदेशमध्ये जगमोहन रेड्डी यांनी राज्यातल्या सगळ्या शाळा इंग्रजी माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे तसं झालं नाही हा भाग वेगळा, पण इतका टोकाचा वेडेपणा ही आजची वस्तुस्थिती आहे. 

आपल्याकडेही इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठी दरी आहे. इंग्रजी न जाणणार्‍या माणसाला कमी लेखण्याची आपली मानसिकता आजही कायम आहे. त्यामुळेच मध्यंतरी मी वर्णन केल्याप्रमाणे श्रीमंत इंग्रजी विरुद्ध गरीब मराठी अशी स्थिती पहायला मिळते. आज देशातले 25 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. म्हणजेच प्रत्येक चौथा मुलगा मातृभाषेत शिकत नाही. असं असताना मुलाची घरातली भाषा वेगळी आणि शाळेतली वेगळी अशी द्विधा स्थिती उत्पन्न होते आणि विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीवर याचा थेट परिणाम होतो. विशेषत: इंग्रजीतून शिकवल्या जाणार्‍या विज्ञान आणि गणिताच्या आकलनावर नकारात्मक परिणाम होऊन त्याची शैक्षणिक प्रगती खुंटते. याच कारणामुळे विज्ञानामध्ये पारंगत होऊन संशोधक, शास्त्रज्ञ होणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. सर्व उच्च शिक्षण इंग्रजीतून असल्यामुळे बरेच हुशार विद्यार्थी या क्षेत्रातून दूर राहतात. म्हणूनच विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मातृभाषेतून होणं गरजेचं आहे.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मुलाला मातृभाषेतून अधिकाधिक शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. नव्या शिक्षण धोरणामध्ये किमान आठवीपर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून मिळण्याची तरतूद केली आहे. परंतु त्याचा लाभ घ्यायला हवा. दाक्षिणात्य राज्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमात मातृभाषा सक्तीचा कायदा केला गेला. आपल्याकडेही मागच्या वर्षी हा कायदा झाला. त्यामुळे किमान इंग्रजी शाळांमध्ये द्वितीय भाषा म्हणून मातृभाषा शिकवली जाईल. याचा निश्‍चितच चांगला परिणाम होईल. आता विज्ञानशाखेतलं संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून देण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. हे सर्वात प्रथम तमिळनाडूने जाणलं आणि 1981 मध्ये तमिळ विद्यापीठ स्थापन केलं. तंजावरला 900 एकर परिसरात हे विद्यापीठ वसलं आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारनं हंपी इथे कन्नड विद्यापीठ सुरू केलं. 2011-12 मध्ये कोचीला मल्ल्याळी विद्यापीठ सुरू करण्यात आलं. या सर्व विद्यापीठांमधून पदव्युत्तर पातळीपर्यंतचे सर्व शाखांमधले अभ्यासक्रम आपापल्या भाषेत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजेच इथे एखाद्या विद्यार्थ्याला तमिळ अथवा कन्नडमधून एम.ए अथवा एम.एस.ई पर्यंतचं शिक्षण घेता येईल. या धर्तीवर मराठी माध्यमातूनही उच्च शिक्षण मिळण्याची सोय व्हायला हवी. तसं झालं तर विद्यार्थ्यांना हे उच्च शिक्षण अधिक सोप्या पद्धतीने घेता येईल. याचा निश्‍चितच फायदा होईल कारण विज्ञानाच्या संकल्पना मातृभाषेतून अधिक योग्य प्रकारे कशा समजतात हे मी स्वत: अनुभवलं आहे.

मराठी माध्यमात शालेय शिक्षण  घेऊन मी नांदेडला कॉलेजमध्ये शास्त्रशाखेत प्रवेश घेतला तेव्हा एक केरळी प्राध्यापिका शरीरशास्त्र शिकवायला आल्या. त्यांचं फर्डं इंग्रजी आम्हा मराठी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरुन जायचं. इंग्रजीशी जमवून घेण्यातच महिना निघून गेला. विषय समजायला त्रास होत होता. एकदा त्या आम्हाला किडनीची माहिती देत होत्या. रक्त शुद्ध करणं हे किडनीचं कार्य असल्याचं समजावत होत्या. मात्र इंग्रजीत सांगितल्या जाणार्‍या त्या संकल्पना काही केल्या आम्हाला कळत नव्हत्या. तेव्हा त्यांनी कसंबसं हिंदीत समजावलं, तुम्ही महाराष्ट्रवासी श्रीखंड बनवताना पांढर्‍या कपड्यात दही बांधून ठेवता तेव्हा पाणी निघून जातं आणि चक्का उरतो. अगदी तशाच पद्धतीने किडनीचं काम होतं. शरीरातली अशुद्ध द्रव्यं लघवीवाटे निघून जातात. असं त्यांनी सांगितलं तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट झाली. इतकी की आजही आम्ही ती विसरु शकलो नाही! मातृभाषेतून शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे हे यावरुन तरी कळावं!

थोडक्यात, विज्ञाननिष्ठ समाज घडवायचा असेल तर हा विचार करावाच लागेल. त्यासाठीच आम्ही सरकारकडे मराठी विद्यापीठाची मागणी करत आहोत. मराठी भाषेतून संशोधन, बोलीभाषांचं संवर्धन, अनुवादरुपानं मराठीत ज्ञान-विज्ञान आणणं यासारख्या अनेक गोष्टी या माध्यमातून साध्य होतील. त्यामुळे मराठीजनांना जगातल्या ज्ञानाचा परिचय होईल. 

सर्व शाखांमधलं शिक्षण देताना पुस्तकं इंग्रजीबरोबरच मराठीमध्येही देणं किंवा पानाच्या एका भागात इंग्रजी आणि दुसर्‍या भागात मराठी मजकूर देऊन विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देणं शक्य आहे. कारण ज्ञान मिळणं महत्त्वाचं; ते कोणत्याही भाषेतून मिळालं तरी फरक पडणार नाही. भाषा हे ज्ञान ग्रहण करण्याचं माध्यम आहे. सुदैवानं मराठी ही समृद्ध भाषा आहे, त्यामुळेच हे माध्यम अधिकाधिक सशक्त करणं आणि मराठीचा गौरव त्रिखंडात पोहोचवणं हाच मराठी राजभाषा दिनानिमित्त केला जाणारा यथोचित संकल्प ठरेल.

शब्दांकन- स्वाती पेशवे

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top