कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत धारावी पॅटर्नचे सर्वत्र मोठे कौतुक झाले. धारावीत महापालिका प्रशासन, पोलिस व डॉक्टरांनी केलेल्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. परंतु धारावीपेक्षाही अवघड प्रश्‍न असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी दिलेला लढा अतुलनीयच म्हणावा लागेल. लंडनस्थित डॉक्टर संग्राम पाटील यांनी मालेगाव पॅटर्नचे आपल्या युट्यूबवरील व्हिडिओत सर्वात प्रथम कौतुक केले व या कामगिरीचे सर्वांना दर्शन झाले. मालेगाव या मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या या शहरात कोरोना सुरु होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर नागरिकत्व विधेयकावरुन मोठी निदर्शने झाली होती. त्यामुळे त्यातच कोरोना सुरु झाल्याने पोलिस व प्रशासन आपल्या लढ्याला चिरडण्यासाठी कोरोनाचा बाऊ करीत आहेत अशी येथील जनतेची सुरुवातीला समजूत झाली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सरकारला कोणीच सहकार्य करीत नव्हते. एखाद्याला कोरोना झाल्यावर संपूर्ण कुटुंबालाच क्वॉरंटाईन केले जात असल्यामुळे अनेकांचा त्याला विरोध होता. तसेच व्हॉटपअ‍ॅपवरुन जातीय तेढ निर्माण होणारे संदेश पाठवून लोकांमध्ये चुकीचा संदेश दिला जात होता. त्यातच ईद आल्याने जबरदस्त पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरत होते. त्यातच मालेगाव हे धार्मिक तिढ्याचे केंद्र असल्याने तेथे नेहमीच तणाव असतो. धारावीप्रमाणे या शहरातही मोठी लोकसंख्या आहे. येथे प्रति चौरस किलोमीटरच्या विभागात 19 हजार लोक राहातात. येथे अल्पावधीतच कोरोनाचे 900 रुग्ण नोंदविले गेले होते. 15 एप्रिल रोजी या शहरातील रुग्ण दुपटीचा वेग 2.33 दिवस होता. त्यावरुन येथे किती झपाट्याने कोरोना फैलावत होता, त्याचा अंदाज येतो. मात्र त्यानंतर हा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 25 मे रोजी 46 दिवस तर 22 जून रोजी 126 दिवसांवर गेला. धार्मिक वातावरण व गरीबी याचा येथे बेमालून संगम झालेला आहे, असे असताना येथे कोरोना आटोक्यात आणणे ही काही सोपी बाब नव्हती. परंतु पालिका प्रशासनाने व पोलिसांनी घरोघरी जाऊन कोरोना विषयी जागृती केली व लोकांना पटवून दिले. लोकांचे म्हणणेही ऐकून घेतले गेले व त्यानुसार योग्य ते काही बदल केले. येथे लोकांना क्वॉरंटाईन केल्यावर ज्यांना गरज भासेल त्यांना नातेवाईकांना सुरक्षीत अंतर ठेऊन भेटण्याची तसेच घरुन जेवणाचा डबा घेण्याची सवलत दिली गेली. त्यामुळे लोकांनाही विश्‍वास वाटला. घरचे चांगले जेवण खायला मिळू लागले तसेच घरच्यांनाही भेटता येऊ लागल्याने रुग्णांची मानसिक स्थिती सुधारली. येथील डॉक्टरांचे दवाखाने सुरु करण्यात आले. या डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना क्वॉरंटाईन केले जाई. त्यामुळे लोकांना विश्‍वास वाटू लागला. त्यातून रुग्ण झपाट्याने बरेही होऊ लागले. याच काळात निर्माण झालेल्या मरकल प्रश्‍नातून येथे तेढ निर्माण करण्याचा काही जातीयवाद्यांनी जरुर प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हस्तक्षेप करीत त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. एकूण रुग्णातील 70 टक्के रुग्ण हे मुस्लिम असल्याने त्याला जातिय रंग देऊन काहींची बदनामी केली गेली. परंतु प्रशासनाने घरोघरी जाऊन याविषयी जागृती केली. व्हॉटसऑपवर भावना भडकविणारे संदेश पाठविणार्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करुन त्यांना जेरबंद केले. हे पहिल्याच लॉकडाऊनच्या काळात केले गेल्याने अशा प्रकारांना वेळीच आळा घातला गेला. पोलिसांनी मालेगाव शहर सिल केले. शहरात जाणारा पूल पूर्णपणे बंद करुन शहराची नाकेबंदी केली. फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच खरेदी विक्री करता येत होती. या काळात शहरात 1800 पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. त्यावरुन या शहरातील कडक बंदोबस्ताची कल्पना येते. पोलिसांनी मशिदीतूनच कुणी घरातून बाहेर पडू नये, अशी आवाहने करण्यास सांगितले होते. त्यामुळे लोकांच्या मनावर त्याचा मोठा परिणाम झाला व घरातच लोकांनी राहणे पसंत केले. ज्या लोकांना खाण्याची वानवा होती त्यांना घरपोच अन्न पोहोचविले गेले. ईदच्या आदल्या दिवशी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सने प्रत्येक गल्लीतून फ्लॅगमार्च केले होते. त्यामुळे शहरात तणावपूर्वक शांतता होती. मात्र त्याचा चांगला परिणाम दिसला. एकानेही बाहेर पाऊल टाकले नाही. प्रत्येक मुस्लिमांनी घरात राहूनच ईद साजरी केली. पोलिसांनी या कामी खूप मेहनत घेतली. सुमारे 200 पोलिसांना कोरोना झाला व त्यात तिघांचा मृत्यू झाला. प्रशासन, पोलिस व डॉक्टरांनी येथील कोरोना आटोक्यात येण्यासाठी जी मेहनत घेतली ती कामी आली. एका मशिदीतही क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. एकदा तेथील लोकांना वस्तूस्थिती समजल्यावर तेथील लोकांनी प्रशासनास सहकार्य करण्यास सुरुवात केली व त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. मालेगावातील कोरोना आटोक्यात आला आहे. मध्यंतरी अचानकपणे काही केसेस वाढल्या होत्या. परंतु त्याला आळा घालण्यात यश आले. धारावीप्रमाणे मालेगावातही कोरोना आटोक्यात आणणे ही काही सोपी बाब नव्हती. या दोन्ही ठिकाणी काही समान बाबी होत्या. मात्र मालेगावात धार्मिक तणाव असलेले शहर असल्यामुळे तेथे पोलिसांवरील जबाबदारी वाढलेली होती. धारावीत मात्र हा प्रश्‍न नाही. या दोन ठिकाणचा हाच काय तो महत्वाचा फरक होता. धारावी, मालेगाव या जटील प्रश्‍न असेलल्या भागातील कोरोनावर मात करण्यास यश आले आहे. शंभर टक्के यश नसले तरी येथील कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे आपण कोरोनाविरुध्दची लढाऊ यशस्वीपणे लढू शकतो हे सिद्द झाले आहे.

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन