मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील विविध प्रश्‍नांना स्पर्श केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या भक्कमतेविषयी विश्‍वास व्यक्त केला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सामनाला मॅरेथॉन मुलाखत द्यायचे. तीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरु ठेवली आहे. यंदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या मुलाखतीला विशेष महत्त्व होते. कारण, त्यांनी व्यक्त केलेल्या मतांतून सरकारची दिशा नेमकी काय आहे, धोरण काय आहे, हे प्रतिध्वनीत होते. त्यादृष्टीने त्यांनी जर लोकांची इच्छा असेल, तर नाणार पुन्हा कोकणात येऊ शकते, असे सूचित करीत असताना, बुलेट ट्रेन विषयी सुप्त शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या दोन्ही भूमिकांचे स्वागत करावे लागेल. नाणार प्रकल्प हा कोकणचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अर्थातच हा प्रकल्प जरी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात उभा राहणार असला, तरीही तो संपूर्ण कोकणाच्या तसेच राज्याच्या हिताचा आहे. तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात एकाच जागी करण्यात येणार असल्याने कोकणाचे चित्र यामुळे पालटण्यास मोठी मदत होणार आहे. नेहमीप्रमाणे या प्रकल्पाला जोरदार विरोध पर्यावरणवाद्यांपासून ते विविध राजकीय पक्षांनी केला होता. पर्यावरणवाद्यांनी पर्यावरणासंबंधी उपस्थित केलेले सर्व मुद्दे आजवर या विषयातील अनेक तज्ज्ञांनी खोडून काढले आहेत. प्रामुख्याने कोकणातील आंबा नष्ट होईल, तसेच मासेमारी संपुष्टात येईल, हे सर्वात महत्त्वाचे आक्षेप घेतले जाणार मुद्दे होते. परंतु, रिलायन्सच्या गुजरात येथील जामनगर प्रकल्पात जी आंबराई उभी राहिली आहे, ते पाहता, कोकणातील आंबा काही नष्ट होणार नाही, हे सिद्ध झाले. त्यात सिंगापूर येथील शहरात तर भरवस्तीत असलेल्या रिफायनरीने प्रदूषण काही होत नाही, हे जगाने पाहिले आहे. त्यामुळेे हा रिफायनरी प्रकल्प कोकणाच्या मुळावर घाव घालणारा नसून, कोकणात समृद्धी आणणारा आहे, हे आजवर अनेकवेळा सांगून झाले आहे. परंतु, पर्यावरणाद्यांना काही पटत नाही किंवा त्यांच्याकडे नवीन कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांच्याकडे तेच-तेच जुने मुद्दे उगाळत बसण्याशिवाय आता दुसरे काही हातात नाही. या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता. अर्थात, हा विरोध त्यांचा राजकीय होता. तसाच विरोध त्यांनी जैतापूरच्या प्रकल्पालाही केला होता. परंतु, तेथे नारायण राणेे यांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे शिवसेनेचा विरोध होता. परंतु, जैतापूरच्या प्रकल्पाला पाठिंबा देणारे राणे मात्र तेथून हाकेच्या अंतरावर उभ्या राहणार्‍या या नाणार प्रकल्पाला विरोध करीत होते. परंतु, ते भाजपवासी झाल्यावर त्यांचाही विरोध आता संपला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने सुतोवाच केल्याने आता नाणार होईल, अशी शुभ चिन्हे दिसत आहेत. 90च्या दशकात एन्रॉन या प्रकल्पाचेही असेच झाले होते. या प्रकल्पाला सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला होता. अरबी समुद्रात बुडविण्याची भाषा केलेला हा प्रकल्प शिवसेनेने सत्ता येताच समुद्रातून बाहेर काढला होता. आता नाणारचेही तसेच होण्याच्या मार्गावर आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात, ते पटते आहे. नाणार प्रकल्प प्रत्यक्षात उतरला तर राज्याच्या उत्पन्नात दोन ते तीन टक्के वाढ होणार आहे. नाही तर हा प्रकल्प गुजरातकडे नेण्यास आपले पंतप्रधान तयार आहेत, त्यामुळे आपल्या राज्याच्या भल्यासाठी हा प्रकल्प तातडीने मंजूर करावा. शिवसेनेने नाणारसंबंधी आपली भूमिका बदलली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करावयास हवे. नाणारचे एकीकडे स्वागत केले जात असताना, एक लाख कोटी रुपये खर्चुन उभारल्या जाणार्‍या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मात्र विरोध केला जात आहे व मुख्यमंत्र्यांनीही या विरोधाच्या दिशेनेच सुतोवाच केले आहे, ते स्वागतार्ह आहे. एक तर, हा प्रकल्प राज्याच्या हिताचा नाही. गुजरातला मोठे करण्यासाठी व येथील प्रकल्प अहमदाबादमध्ये नेण्यासाठी बुलेट ट्रनेचा घाट पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी घातला. त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या फडणवीस सरकारला माना डोलविण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. मात्र, शिवसेनेने या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला होता. प्रामुख्याने विरारपासून पुढील टप्प्यात जमीन संपादन केली जात असताना, त्याला शिवसेनेने सत्तेत असतानाही कडवा विरोध केला होता. मात्र, फडणवीस सरकारने त्यांचे काही ऐकले नव्हते. नाणार जसा राज्याच्या हिताचा आहे, तसेच बुलेट ट्रेन हा राज्याच्या विकासाचा प्रकल्प नाही. उलट, राज्याचा जास्त पैसा यासाठी खर्च होणार आहे व फायदा मात्र गुजरातचा होणार आहे. यापूर्वीच केंद्रातील सरकराने गुजरातच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र हे गुजरातला हलविले. आता बुलेट ट्रेन सुरु करुन मुंबईचे महत्त त्यांना कमी करावयाचे आहे. गुजरातचे-मोदींचे हे राजकारण आता उघड झाले आहे. त्यामुळे मोदींचा हा डाव ठाकरे यांनी उडवून लावावा व बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करावा. आपल्याला नाणार पाहिजेे, तर बुलेट ट्रेन नको आहे, त्यामुळेे उद्धव ठाकरे यांनी त्यादृष्टीने सुतोवाच केले आहे. कृषीवलने नेहमीच नाणार प्रकल्पाच्या बाजूने व बुलेट ट्रेनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन याविषयी घोषणा करावी. जनता त्यांचे अभिनंदन करेल.

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन