येत्या 30 जूनपर्यंत असलेले लॉकडाऊन सुरुच राहणार की संपविले जाणार, असा मोठा प्रश्‍न राज्यातील जनतेला पडला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढेही लॉकडाऊन सुरुच राहणार याचा पुनरुच्चार केल्याने जनतेच्या मनातील संभ्रम आता दूर झाला आहे. पाचवे लॉकडाऊन संपल्यावर सरकारने हळूहळू शिथीलता आणण्यास सुरुवात केली होती. खरे तर, त्याची आवश्यकताच होती. ही आवश्यकता जनतेला जशी होती, तशी सरकारलाही होती. परंतु, त्यानंतरच्या काळात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला असे दिसू लागले आहे. कोरोनाची आकडेवारीच त्यासंबंधी स्पष्ट दिसते. आतादेखील आपण आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्पही करु शकत नाही. तर, दुसरीकडे लोकांना किती काळ घरी बसविणार, असाही सवाल होता. त्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन कायम ठेवत शिथिलता करण्याचे काम सरकारने केले. आतादेखील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, पुन्हा लॉकडाऊन शंभर टक्के करणे काही शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या विभागात सक्तीने बंद पाळण्याचे सत्र सुरु केले. त्याचे चांगले निकाल हाती येऊ लागले आहे. त्यामुळे संपूर्ण शहर बंद करुन अर्थव्यवस्था ठप्प करण्यापेक्षा विभागवार जे संदेवनाक्षम विभाग आहेत, तेथे कडकडीत बंद ठेवणे शहाणपणाचे ठरु लागले आहे. धारावीतील कोरोनाचे रुग्ण याच धर्तीवर कमी करण्यात सरकारला यश आले आहे. आता तोच पॅटर्न सर्वत्र राबविणे योग्य ठरणार आहे, असेच दिसते. कोरोना शंभर टक्के संपल्यावर किंवा लॉकडाऊन संपल्यावर आपण कामाला सुरुवात करु असे म्हणणे योग्य ठरणारे नाही. कोरोनाची साथ आपल्याला काही काळ घेऊनच पुढील वाटचाल करावयाची आहे, हे मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या संवादात जे म्हटले, ते योग्यच आहे. आपल्याला आता कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. त्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम टाळणे, हात नियमित धुणे व दोन व्यक्तींमधील दोन फुटाचे अंतर ठेवणे, असे करणे हेच कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. आता विविध सण येऊ घातले आहेत; परंतु ते मर्यादेत साजरे करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने अतिशय चांगली पावले पडली आहेत. यातील आपल्या गणपती उत्सवातील उत्साहाला यंदा मुरड घालावी लागणार आहे. त्यासाठी सार्वजनिक मंडळांनी स्वतःहून पुढे येत यंदाचा गणपती शांततेत व गर्दीशिवाय करण्याचे मान्य केले आहे. यावेळी गणपतींच्या मूर्ती जास्तीत जास्त चार फुटांच्या असतील, तसेच कोणतेही सार्वजनिक दर्शन नसेल. गणपतीची प्रतिष्ठापना व विसर्जन हे मोजक्याच लोकांनी करावयाचे आहे. सध्याच्या कोरोनाच्या साथीचा वेग पाहता, गणेशोत्सव अशा प्रकारे साध्या पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे. तसेच त्यानंतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करता येणार नाहीत. येत्या 1 जुलैला आषाढी एकादशी आहे, तेथेही यंदा वारकर्‍यांना तसेच भक्तांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. सर्वांचे प्रतिनिधीत्व राज्याचे मुख्यमंत्री करतील व या कोरोनापासून मुक्तीचे साकडे घालतील. आपल्याकडे शेकडो वर्षांची असलेली वारीची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली आहे. त्याचे अनेकांना दुःख आहे.परंतु, सध्याची अभूतपूर्व परिस्थितीच त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वारी रद्द करावी लागली आहे. सर्वच धर्मीयांनी आपले उत्सव यंदा घरातच साजरे करण्याचे ठरविले आहे, त्याचे स्वागत झाले पाहिजे. कोरोना किती काळात आटोक्यात येईल, त्याचा अंदाज सध्याच्या क्षणी देता येत नाही; परंतु 2020 साल हे असेच जाणार, असे दिसू लागले आहे. कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला स्वत:वर निर्बंध घालून घेणेच गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी कोणत्याही सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालावीच लागणार आहे. खरे तर, सरकारने बंदी घालण्यापेक्षा जनतेनेच स्वत:हून हे कार्य्क्रम रद्द करण्यासाठी पुढे आले पाहिजे. गोविंदाचा धमाल उत्सवही यंदा अशाच प्रकारे होणार नाही. सरकार काय करते, यापेक्षाही जनतेने त्यात पुढाकार घेऊन आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. पुनश्‍च हरिओम या अंतर्गत आता सरकारने बर्‍याच गष्टी सुरु केल्या आहेत. मात्र, अजून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करण्यास मज्जाव केला आहे. सलून्स, जीम नुकतीच सुरु झाली आहेत. त्यामुळे हळूहळू विविध लोकांचा रोजगार पुन्हा सुरु कसा होईल ते पाहिले जात आहे. समाजातील स्वयंरोजगार असलेला एक मोठा विभाग रोजगारापासून सध्या दूर होता. आता हळूहळू त्यांचाही रोजगार कसा सुरु होईल, हे सरकारकडून पाहिले जात आहे. कोरोनाने जगात अभूतपूर्व स्थिती आली आहे. अशा प्रकारे काही होईल असे कोणालाच वाटले नव्हते. परंतु, आलेल्या परिस्थितीचा आपल्याला मुकाबला करावा लागणार आहे. रोजगारनिर्मिती हे सरकार पुढील एक मोठेे आव्हान नजीकच्या काळात असेल. मात्र, समाधानाची बाब म्हणजे, अगदी सध्याच्या कठीण काळातही सरकारकडे 16 हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. यातून राज्यात नव्याने रोजगारनिर्मिती होईल. लॉकडाऊन सुरु असले तरी आपल्याला आता सावधगिरी बाळगत पुढील वाटचाल करावी लागणार आहे. आपले भविष्य अंधारात असले तरीही त्यातून आपल्याला वाटचाल करावयाची आहे व यातून यशस्वी व्हायचे आहे, असा निर्धार बाळगायचा आहे. तरच आपण यात यशस्वी होऊ शकतो.