जगातील कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारताचा क्रमांक आता तीनवर आला आहे. अर्थात ही बाब आपल्याल भूषणावह नाही. आपल्याकडील रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. भारतात महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याची परिस्थिती आता हाताबाहेर जात असल्याचे दिसू लागले आहे. गेल्याच पंधरवड्यात सरकारने लॉकडाऊन कायम ठेवत अनेक उद्योगांना कामकाज सुरु करण्यस परवानगी दिल्यावर रुग्ण वाढले आहेत. आता तर हॉटेल्स व लॉजिंग सुरु होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच जाणार यात काही शंका नाही. जवळपास तीन महिने बंद केल्यावर जनताही हैराण झाली होती तसेच सरकारलाही निर्बंध हटविल्याशिवाय थांबलेले अर्थचक्र सुरु करता येणार नव्हते. अशा स्थितीत रुग्ण वाढणार हे उघडच होते. पंरतु सर्वच ठप्प करुन काही साध्य होणार नाही हे लक्षात आल्यावर सरकारने एक-एक निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली. अशा काळात एकमेकांना सांभाळून घेऊन वाटचाल करण्याची वेळ आहे. कोरोनाने संपूर्ण जग वेढले आहे. सुमारे 200 हून जास्त देशात कोरोना पोहोचला आहे. सुमारे एक कोटींच्यावर जगातील रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर सुमारे मृतांची संख्या पाच लाखावर गेली आहे. अमेरिकेत सध्या साथीचा कहर झाला असून मृतांची संख्या दीड लाखावर गेली आहे. भारतात अजूनही एकूण लोकसंख्येचा विचार करता रुग्णसंख्या व मृतांचे आकडे नियंत्रणात आहेत. मात्र यामुळे निर्धास्त राहून चालणार नाही. आता भारतात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. गेले काही दिवस आपल्याकडेही दररोज रुग्ण संख्या वीस हजाराने दररोज वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर आत्ताकुठे आपल्याकडे सुरु झाला असे म्हणता येईल. मध्यंतरी काही देशात कोरोना उतरणीला लागल्याचे चित्र होते. त्यामुळे आता कोरोना हळूहळू संपत चालला आहे असे आशादायी चित्र निर्माण होत होते. परंतु ही आशा अल्प मुदतीचीच ठरली व पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. चीन, उत्तर कोरीया, जपान या देशात पुन्हा एकदा नव्याने रुग्ण दिसू लागले आहेत. न्यूझीलंडने मोठ्या विश्‍वासाने कोरोना हद्दपार करणारा पहिला देश असा सन्मान मिळविला खरा परंतु तेथे देखील नवीन रुग्ण दिसले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, आता 81 देशात पुन्हा एकदा कोरोनाची नव्याने लाट सुरु झाली असून ही दुसरी लाट ठरावी. कोरोना सुरु झाला त्यावेळी तो मर्यादित राहावा यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न झाले. मात्र तो सर्वत्र पसरलाच. यात काही देशांनी या साथीच्या रोगाविषयी गांभीर्याने न घेतल्यामुळे हा रोग झपाट्याने पसरला होता. त्यात आपला भारतही होता. त्यावेळी जगात पुन्हा दुसरी लाट येऊ नये अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. कारण गेल्या वेळी म्हणजे 1920 साली ज्यावेळी जगात स्पॅनिश फ्लू ची साथ आली होती, त्यावेळी ही साथ बरी होत असतानाच दुसरी लाट आली व त्यात मोठ्या संख्येने लोक मरण पावले होते. आता त्याच धर्तीवर दुसरी लाट येत असल्यास त्याचे धोके जास्त आहेत. त्यामुळे आता पुन्हा खबरदारी घेण्याची सर्वात मोठी गरज आहे. आपल्यासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात धोके हे पावलोपावली आहेत. सध्या  केवळ आपल्याला शहरात मोठ्या संख्येने लाट असल्याचे दिसत होते,परंतु आता ग्रामीण भागातही ही साथ पसरल्याचे दिसू लागले आहे.  मुंबई,  पुणे, अहमादाबाद,  दिल्ली, कोलकाता या महानगरांमध्ये ही साथ झपाट्याने पसरली आहे. लोकसंख्या जास्त असल्याने व दाटीवाटीची वस्ती असल्याने येथे साथ पसरण्याचे प्रमाणही जास्त असणे स्वाभाविक आहे. मुंबईतील मृतांच्या आकडेवारीत 50 वर्षावरील रुग्ण 77 टक्के आहेत. त्यामुळे आजही जास्त वय असणारे व ज्यांना विविध व्याधींनी ग्रासले आहे त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. गेल्या पंधरा दिवसात सरकारने नियमात शिथीलता आणल्याने लोक थोडे निर्धास्त झाले, गरज नसतानाही लोकांचे भटकणे वाढले. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत प्रामुख्याने रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत विभागवार नव्हे तर संपूर्ण लॉकडाऊन कडकपणे लादण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनावर अजूनही औषध उपलब्ध नाही. अजून तरी नजीकच्या काळात औषध किंवा लस निर्माण होण्याची शक्यता दूरच वाटते. त्यामुळे हातांची नियमित स्वच्छता व दोन व्यक्तींतील सुरक्षित अंतर राखणे हेच त्यावरील उपाय आहेत. याची कडक अंमलबजावणी केवळ लॉकडाऊनमुळेच होऊ शकते. मुंबईतील काही भागात जिकडे रुग्ण आहेत त्या ठिकाणीच म्हणजे घरीच लोकांना क्वॉरंटाईन केले गेले आहे. हे उपाय पुरेसे नाहीत हे गेल्या पंधरा दिवसातील अनुभवातून पटले आहे. अशा स्थितीत रुग्ण वाढीच्या संख्येवर मर्यादा येण्यासाठी संपूर्ण मुंबईत कडक लॉकडाऊनची गरज आहे. तसेच आता ग्रामीण भागातही रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रायगड जिल्ह्यात आजवर मंद गतीने वाढत असलेल्या कोरोनाचा प्रसार वाढला आहे. ही गंभीर बाब आहे. मात्र जिल्हा प्रशासनाला अजूनही त्याचे गांभीर्य नाही. रायगडातही आता चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपाय योजण्याची गरज आहे. अलिबागसह ज्या तालुक्यात प्रादुर्भाव वाढला आहे तेथे काही काळ लॉकडाऊन लादण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!