Monday, March 08, 2021 | 08:20 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका
रायगड
20-Jan-2021 06:56 PM

रायगड

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात तशी काहीशी स्थिती सध्या आपण अनुभवत आहोत. वर्षभरापूर्वी कोरोना विषाणू हजारो मैलावरुन आला आणि त्यानं सगळ्यांना व्यापून टाकलं. त्यातून थोडी सुटका होण्याची चिन्हं दिसत असतानाच आता बर्ड फ्लूची दहशत अनुभवायला मिळत आहे. जगभरात कोरोनाचं संकट असताना सर्वप्रथम जपान, फ्रान्ससारख्या देशांमध्ये बर्ड फ्ल्यू आला. बघता बघता तो जगाच्या अन्य भागातही पसरला. सैबेरिया किंवा अन्य देशांमधले स्थलांतरित पक्षी तिथल्या थंड हवामानामुळे ठराविक काळात मुख्यतःभारतात येतात. इथे साधारणतःऑक्टोबर ते मार्चपर्यंत त्यांचा मुक्काम असतो.हिमाचल प्रदेशमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यानं कदाचित स्थलांतरित पक्ष्यांंनीच बर्ड फ्लू भारतात आणला असावा, असं मानायला जागा आहे. हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान,गुजरात, पंजाब, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्ल्यूचं संकट आलं आहे.अन्य राज्यांमध्येही त्याचा वेगाने प्रसार होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड आणि झारखंडमध्ये यासंदर्भात सर्वात आधी अलर्ट जारी करण्यात आला. 

सर्वसाधारणतःकोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचं प्रमाण जास्त असतं.त्यांच्यात तो वेगानं पसरतो; परंतु या वेळचं चित्र थोडं वेगळं होतं. स्थलांतरित पक्षी,कावळे, बदकानंतर तो कोंबड्यांमध्ये दिसला.14 वर्षांपूर्वी बर्ड फ्ल्यू भारतात आला तेव्हा त्याची सुरुवात नवापूरपासून झाली होती.अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला होता.बर्ड फ्ल्यू पसरतो तेव्हा तिथले पक्षी मारले जातात.त्यावेळीही लाखो पक्षी अक्षरशःमातीत गाडून टाकावे लागले होते.या पक्ष्यांना जपणार्‍या शेतकर्‍यांनीच स्वतःच्या हातानं त्यांना मूठमाती दिली होती.चिकनसह त्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ भारतातून मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात केले जातात.परंतु बर्ड फ्ल्यू असणार्‍या भागात मांस आयात करण्यावर अनेक देश बंदी घालतात.कुक्कुटपालन उद्योगाला त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो.आताही अनेक राज्यांमध्ये चिकन,अंड्यांवर बंदी घातली गेली आहे.बर्ड फ्लू किंवा एविएन इन्फ्लुएन्जा हा एक संसर्गजन्य आजार आहे.हा आजार एवियन इन्फ्लूएन्जा व्हायरस एच5एन1मुळे होतो.हा व्हायरस मुख्यतःपक्ष्यांना लक्ष्य करतो.1990 च्या दशकात बर्ड फ्ल्यूचा नवा स्ट्रेन समोर आला होता.हा स्ट्रेन पक्ष्यांमधले गंभीर आजार आणि मृत्यूचं कारण ठरु शकतो. पाळीव पक्ष्यांना म्हणजेच,बदक,कोंबडी किंवा टर्की आदींना या विषाणूचा अधिक धोका असतो.बाधित पक्ष्यांमुळे या विषाणूचा संसर्ग होतो.व्हायरस म्युटेशन होतं, तसंच काही म्युटेशन जास्त संसर्गजन्य असल्यामुळे धोकाही संभवतो. परंतु सध्या देशात थैमान घालणार्‍या बर्ड फ्ल्यूचं म्युटेशन जास्त संसर्गजन्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे.

अनेकदा पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा संसर्ग नैसर्गिकरित्या होतो. तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो.विष्ठा,नाकातला स्राव,तोंडातली लाळ किंवा संक्रमित पक्ष्यांच्या डोळ्यांमधून बाहेर पडणार्‍या पाण्यामुळे हा आजार मानवांमध्ये पसरतो. एच 5 एन 1 हा एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस माणसाला संक्रमित करतो. हा विषाणू पक्षी तसंच मानवांसाठी खूप धोकादायक आहे. एखादी व्यक्ती बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या संपर्कात आल्यास या आजाराची लागण होऊ शकते. संसर्ग झालेला पक्षी,त्याचे पंख किंवा विष्ठेच्या संपर्कात आल्यानेही मानवाला बर्ड फ्ल्यूूचा संसर्ग होऊ शकतो.आजारी पक्ष्यांची काळजी घेणार्‍या व्यक्तींना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो.जगभरात अनेक पोल्ट्री फार्म आहेत.अशा ठिकाणी दररोज अनेक माणसं पक्ष्यांच्या संपर्कात येतात. असं असलं तरी या बाबतीत अपवादात्मक प्रकरणं समोर आली आहेत. पक्ष्यांची अंडी किंवा  विष्ठेशी अप्रत्यक्ष संपर्कात आल्यानं धोका अधिक वाढतो. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्यानंतर साधारणतः दोन ते आठ दिवसांनी लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य फ्ल्यू सारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांमध्ये ताप,खोकला, घशात खवखव, उलटी,डोकेदुखी, सांधेदुखी, इन्सोम्निया आणि डोळ्यांचे आजार यासारखी लक्षणं दिसून येतात.मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही या लक्षणांचा सामना करावा लागतो.हे संक्रमण वाढून न्यूमोनिया होऊ शकतो.कधी-कधी श्‍वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. 

हिमाचल प्रदेशातल्या कांडगा जिल्ह्यातल्या पोंग बांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे विषाणू आढळल्यामुळे आपल्याकडे हे संकट गडद होताना दिसत आहे. राजस्थानमधल्या अनेक जिल्ह्यांमधूनही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.तिथे कावळे, बगळे आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाडमधल्या पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळमध्ये असणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. त्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली.परभणी, बीड, ठाणे आदी जिल्ह्यांमध्येही बर्ड फ्ल्यू आढळला.केरळमधल्या अलपुझ्झा आणि कोट्टायम इथे या विषाणूच्या प्रसाराची माहिती मिळाल्यामुळे प्रभावित क्षेत्रातल्या बदक,कोंबड्या आणि अन्य पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले.महाराष्ट्रात परभणीसह अन्य भागांमधल्या लाखो पक्ष्यांची आहुती द्यावी लागली. बर्ड फ्लूचा हा धोका आणि मानवामध्येही याच्या संसर्गाचा धोका असल्यामुळे आता मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

केवळ माणूस आंतरराष्ट्रीय प्रवास करत नाही,त्याच्याबरोबर अनेक विषाणूही प्रवास करत असतात.कोरोनाचा विषाणू प्रथमत:सापडल्यानंतर केवळ दोनमहिन्यांमध्ये तो 194 देशांमध्ये पोहोचला. म्हणजेच माणसाच्या प्रवासाच्या वेगाइतकाच विषाणू पसरण्याचा वेग असतो. बर्ड फ्ल्यूबाबत तसंच घडलं आहे. 2017-18 या वर्षातही बर्ड फ्ल्यू आला होता. त्याला घालवण्यात आपल्याला यश आलं असं वाटलं होतं;पण तो विषाणू कुठे ना कुठे राहतो. त्याच्याशी अविरत झुंज द्यावी लागते. माणसांच्या प्रवासावर किंवा हालचालींवर लक्ष ठेवता येतं,त्यांना रोखता येतं, परदेशातून येणार्‍यांना सरळ विलगीकरणात टाकता येतं;परंतु पक्ष्यांचं दळणवळण कसं रोखणार,हा मोठा प्रश्‍न आहे. 

गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय रसातळाला गेला. कोंबड्यांचं मांस खाल्ल्याने कोरोना होतो, असा अपप्रचार करण्यात आला. पोल्ट्री व्यावसायिकांना जिवंत कोंबड्या जमिनीत गाडून टाकाव्या लागल्या. गेल्या चार महिन्यांपासून मात्र हा व्यवसाय बर्‍यापैकी सावरला. पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्यानं झालेलं नुकसान भरून निघत असतानाच आता बर्ड फ्ल्यूचं संकट ओढावलं. काही राज्यांमध्ये एच फाइव्ह आणि एन आठ बर्ड फ्ल्यू विषाणूचा स्ट्रेन आढळून आला आहे; मात्र भारतात कुठेही त्याचा मानवी संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं नाही. माणसांमध्ये संसर्ग झाल्यास हा विषाणू अधिक वेगाने पसरतो. सहाजिकच संसर्गवाढीचा धोका वाढीस लागतो. सध्या तरी तशी लक्षणं आढळून आलेली नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारं पोल्ट्री व्यवसायात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवत आहेत. काही राज्यांनी प्राणी-पक्षी संग्रहालयं बंद केली आहेत.काही राज्यांनी आंतरराज्य पक्षी वाहतूक बंद केली आहे.खबरदारीचा उपाय म्हणून हे केलं पाहिजे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top