Saturday, December 05, 2020 | 11:37 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

इंटरनेटचा वाढता प्रसार
रायगड
18-Nov-2020 07:40 PM

रायगड

सध्याच्या  काळात  रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजांच्या बरोबरीने इंटरनेटने स्थान पटकाविले आहे. सध्याच्या काळात इंटरनेट ही अत्यंत गरजेची किंवा मूलभूत गरज असलेली बाब ठरली आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला रस्ते, वीज व पाणी या देशासाठी तसेच अन्न, वस्त्र व निवारा व्यक्तीगत मूलभूत गरजा होत्या. यातील बहुतांशी बाबींवर आपण आता गेल्या सत्तर वर्षात मोठे काम केले आहे. या बाबी आपण पुरविण्यात शंभर टक्के यशस्वी झालो नसलो तरी पन्नास टक्के तरी आपण या बाबी जनतेला पुरविण्यात यशस्वी झालो आहोत.  हे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही. अन्नधान्य उत्पादनात तर आता आपण निर्यात करण्याच्या स्थितीत आलो आहेत. हे खरे असले तरीही देशात एकवेळचे जेवण्याची आर्थिक स्थिती असलेली लोकसंख्या किमान 60 टक्के आहे. वस्त्र निर्मितीमध्ये आपण कधीच स्वयंपूर्ण झालो आहेत. निवारा अजूनही शंभर टक्के लोकांना पुरविण्यात सरकारला अपयश आले असले तरी भविष्यात त्याविषयी नियोजन करुन आपण प्रत्येक कुटुंबाला निवारा देऊ शकतो. रस्ते, वीज व पाणी या बाबी पुरविण्यात शंभर टक्के यश आलेले नसले तरीही पन्नास टक्के आपण निश्‍चितच यश मिळविले आहे. मूलभत गरजांच्या या यादीत आता एकविसाव्या शतकात आता इंटरनेटची भर पडली आहे. इंटरनेटचा प्रसार गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला आहे, हे वास्तव विसरुन चालणार नाही. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालानुसार आपल्या देशात आता इंटरनेटची एकूण 75 कोटी कनेक्शन्स झाली आहेत. आपल्याकडे इंटरनेटचे  युग सुरु  होऊन केवळ 25 वर्षे लोटली आहेत आणि या पाव शतकात 75 कोटी  लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचले आहे. आपल्याकडे 15 ऑगस्ट 1995 साली इंटरनेट अधिकृतरित्या सुरु झाले. मार्च 2016  सालापर्यंत  इंटरनेटची कनेक्शन्स  ही  34 कोटी होती. सप्टेंबर 2018 साली हीच कनेक्शन्स 50 कोटींवर पोहोचली. त्यामुळे इंटरनेट वाढीचा वेग हा खर्‍या अर्थाने 2016 सालापासून सुरु झाला. शहरात इंटरनेटच्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे, यात काहीच शंका नाही. मात्र गेल्या चार वर्षात ग्रामीण भागातही इंटरनेट झपाट्याने पसरले. देशातील एकूण नेट  कनेक्शन्सपैकी 61 टक्के कनेक्शन्स ही शहरी भागात आहेत व त्यातील 97 टक्के कनेक्शन्स  ही मोबाईल फोन्सद्वारे  घेण्यात आली आली आहेत. अजूनही देशाच्या 50 टक्के भागात इंटरनेटची कनेक्शन्स वाईट आहेत. त्या परिणामी इंटरनेचा प्रसार अधिक जोमाने होऊ शकलेला नाही. राज्यांचा विचार करता कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या देशातील पाच राज्यात एकूण 26 कोटी कनेक्शन्स आहेत. म्हणजे देशातील एकूण इंटरनेटच्या ग्राहकांमध्ये 35 टक्के वाटा या पाच राज्यांचा आहे. कंपन्यांचा विचार करता जिओ ही रिलायन्सची कंपनी मोबाईल व इंटरनेट सेवा त्याव्दारे पुरविणाच्या क्षेत्रात ग्राहक संख्येत आघाडीवर आहे. त्याखालोखाल एअरटेल व व्होडाफोन यांचा क्रमांक लागतो. एक महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की, देशाने टेलिकॉम क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केले व त्यापाठोपाठ इंटरनेट आले. त्यामुळे इंटरनेच्या प्रसारात टेलिकॉम उद्योगातील या खासगी कंपन्यांचा मोलाचा वाटा आहे. आता तर सर्व भविष्यातील सर्व व्यवहार, व्यापार व उद्योगांचा बेस हा इंटरनेट असेल. आपल्याकडे त्याची आता कुठे सुरुवात झाली आहे. विकसीत देशात त्याची यापूर्वीच सुरुवात झाली होती. त्यामुळे देसात शंभर टक्के उत्कृष्ट इंटरनेट सेवा देणे ही आता भविष्यातील गरज ठरणार आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटमुळे फार मोठी सुविधा घरुन काम करण्यार्‍यांसाठी उपलब्ध झाली. जर इंटरनेट नसते तर घरुन काम करताच आले नसते. त्यामुळे भविष्यात इंटरनेट ही काळाची मोठी गरज ठरणार आहे. आपल्याकडे इंटरनेटचा गेल्या पाच वर्षात झपाट्याने प्रसार झाला मात्र आता तर भविष्यात इंटरनेट हे एक उद्योगधंद्याच्या वाढीचे महत्वाचे केंद्र ठरणार आहे. आगामी काळ हा डिजिटल युगाचा आहे व त्यात अनेक उद्योगांसाठी इंटरनेट हा त्याचा मुख्य पाया ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला इंटरनेटच्या प्रसारासाठी आता महत्वाची पावले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाला अतिशय सवलतीच्या दरात इंटरनेट उपलब्ध करुन देणे ही सरकारची जबाबदारी ठरणार आहे. त्यासाठी या क्षेत्रात कोणत्याही एका कंपनीची मक्तेदारी होणार नाही हे देखील सरकारने तपासले पाहिजे. या उद्योगात विविध कंपन्या कार्यरत राहून ग्राहकांना इंटरनेट खरेदीचे विविध पर्याय उपलब्ध असले पाहिजेत. इंटरनेटमुळे आपल्याकडे हळूहळू सर्व कामे डिजिटल मार्गाने सुरु होणार आहेत. सध्या देखील अनेक कामे होतात, परंतु इंटरनेटच्या अपुर्‍या वापरामुळे अनेक कामे डिजिटल मार्गाने होण्यात अडचणी आहेत. महत्वाचे म्हणजे इंटरनेटच्या वापराने विविध कार्यात आपल्याला पारदर्शकता आणता येते. या पारदर्शकतेमुळे अनेक भ्रष्टाचाराची असलेली अनेक कुरणे थांबविता येऊ शकतात. त्याचबरोबर कमी कालावधीत जास्त कामे करता येऊ शकतील. त्यासाठी इंटरनेटचा प्रसार जोरात होण्याची आवश्यकता आहे. सध्याची गती चांगलीच आहे परंतु शंभर टक्के लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचले पाहिजे. यातून देशाचा चेहरामोहरा बदलता येऊ शकेल.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top