कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जगातले उद्योग, वाहतूक ठप्प झाली. कच्च्या तेलाचा वापर कमी झाला. जगाचं अर्थकारण पेट्रोल-डॉलरवर अवलंबून असतं. आखाती राष्ट्रातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाचा खप कमी झाल्यानंतर जगातल्या तेल उत्पादक संघटनेने तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला; परंतु, त्याला रशियाने सहकार्य केलं नाही. बर्‍याच काळानंतर या प्रश्‍नातून मार्ग निघाला, तरी जगात कोरोनाचं संकट कमी झालं नाही. त्यात जगाच्या इतिहासात प्रथमच कच्च्या तेलाच्या किंमती शून्याच्या खाली आल्या. लगेच भारतात राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी भारतात पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी का होत नाहीत, असा सवाल करून सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत; परंतु जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे सौदे, त्याचे भाव, आयात तेल संबंधित देशांमध्ये पोहोचण्याचा कालावधी आणि संबंधित देशाची कच्च्या तेलाची साठवण क्षमता यावर त्या-त्या देशातले इंधनाचे दर ठरत असतात. ते टीका करणार्‍यांच्या लक्षात येत नाही.

अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट या कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती शून्याच्या खाली उतरल्या. त्याचा परिणाम जागतिक बाजारात पाहायला मिळाला. बाजार सुरू झाल्याच्या पहिल्या अर्ध्या तासात कच्च्या तेलाच्या किंमती 95 टक्क्यांनी घसरून 15 डॉलरवरून थेट दोन डॉलर इतक्या कोसळल्या आणि पुढच्या अर्ध्या तासात ही घसरण 300 टक्क्यांपर्यंत पोहोचली. कच्च्या तेलाच्या किंमती उणे 37 डॉलरपर्यंत पोहोचल्या. अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था तेलाच्या गणितावर अवलंबून असल्यामुळे हा जगासाठी धक्का आहे. या घटनेचा थेट अर्थ असा की, तेल उत्पादक कंपन्या ट्रेडर्स आणि तेल प्रक्रिया उद्योजकांना सांगत आहेत, की तुम्ही आमच्याकडून तेल घेऊन जा. त्याचे पैसे आम्हाला नकोत. उलट, ते घेऊन जाण्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देतो. तेलही घ्या आणि वर पैसे घ्या. हे म्हणजे, बँकेत पैसे ठेवून वर ते सुरक्षित ठेवल्याबद्दल बँकेलाच आपण पैसे देण्यासारखं झालं.

2018 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 107 डॉलर प्रतिपिंप होत्या. दीड वर्षांमध्ये जगातल्या एका बाजारपेठेत त्या शून्याच्याही खाली गेल्याने तज्ज्ञ आणि सामान्यही चक्रावून गेले आहेत. तेलाच्या किंमती नेमक्या का घसरल्या? त्या आणखी किती काळ घसरलेल्या राहतील? जगावर या घटनेचे नेमके काय परिणाम होणार आहेत? भारताला या घटनेचा फायदा होणार की तोटा? या प्रश्‍नांचा विचार केला, तर सामान्यांच्या शंकांचं निरसन होईल. कच्च्या तेलाचा साठा हा जमिनीखाली असतो. तिथून ड्रिलिंग पद्धतीने तो बाहेर काढला जातो. बाहेर काढलेलं हे कच्चे तेल मग शुद्धीकरण आणि इतर प्रक्रिया करून इंधन या स्वरुपात वापरलं जाऊ शकतं. हे इंधन विमानांसाठी लागणारं इंधन, पेट्रोल, डिझेल, रॉकेल अशा अनेक प्रकारचं असतं. या प्रक्रिया उद्योगांना विकेपर्यंत ते पिंप किंवा पाईपमध्ये साठवलं जातं. जमिनीखालून तेल काढल्यानंतर ते अशा प्रकारच्या इंधन प्रक्रिया करणार्‍या उद्योगांना विकलं जातं. शिवाय, या बाजारात काही गुंतवणूकदारही आहेत, जे नफ्यासाठी कमॉडिटी म्हणून व्यवहार करतात. जगात सध्या टाळेबंदी आहे. त्यामुळे इंधनाची मागणी खूपच कमी आहे. अनेक ठिकाणी टाळेबंदीमुळे तेल प्रक्रिया उद्योगही बंद आहेत. विमानं आणि गाड्याही रस्त्यांवर नाहीत. त्यामुळे पेट्रोल, डिझेललाही जवळ-जवळ शून्य मागणी आहे. अशा वेळी बाजारात इंधनाची मागणी नगण्य झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहे.

आता इंधनाची मागणी शून्यावर आणि उत्पादन जास्त अशा परिस्थितीत तेल साठवण्यासाठी तेल उत्पादन कंपन्यांना पिंप आणि पाईपही कमी पडत आहेत. अतिरिक्त तेलाचा साठा करणं शक्य नाही. तेल उत्पादन तर वाढलं आणि बाजारात मागणी जवळ-जवळ शून्य अशा दुष्टचक्रात जगभरातला तेल उद्योग सापडला आहे. अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतात तेलाचे साठे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तेल उत्पादन आणि त्यांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट ही तिथल्या तेलाचा व्यवहार करणारी एक मोठी बाजारपेठ आहे. याच एक्सचेंजमध्ये सोमवारी तेलाच्या किमती शून्याखाली उतरल्या. तेलाचे व्यवहार फ्युचर मार्केटमध्ये म्हणजे आगाऊ तारखेला होतात. शून्य दर घसरला तो मे महिन्याच्या सौद्यांमध्ये. जूनचे सौदे अजूनही 20 डॉलर प्रतिपिंपाच्या आसपास आहेत. अमेरिकन बाजारात तेलाच्या पडलेल्या किंमती या काही काळापुरत्याच असू शकतात. असं असलं, तरी सध्याची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 20 ते 30 डॉलरच्या आसपास राहतील. अमेरिकेत लाईट क्रूड तेलाचं उत्पादन होतं. जगात ब्रेंट क्रूड तेल वापरलं जाते. भारतही ब्रेंट क्रूड वापरतो. अमेरिकेत इंधनाच्या किंमती कमी झाल्या तरी भारतात किंमती कमी का झाल्या नाहीत, या प्रश्‍नाचं उत्तर या इंगितात आहे.

आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचे जाणकार चंद्रशेखर चितळे यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकतात. ते म्हणतात, अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमती शून्यापेक्षाही खाली गेल्या. याचं कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा तेलाच्या मागणीपेक्षा जास्त आहे. मागणी जवळपास शून्याकडे सरकायला लागली आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तेलाच्या आयातीवर अवलंबून असणार्‍या भारतासारख्या देशात कच्चं तेल कमी दरात उपलब्ध होणार आहे. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा की, फक्त तेलाचे दर कमी झाले आहेत म्हणून भारताने पुढच्या काळात लागणार्‍या तेलाची खरेदी आत्ताच केली आहे किंवा निदान आपण भविष्यातले व्यवहार मोठ्या प्रमाणावर केले आहेत, असा इतिहास नाही. त्यामुळे आपण आत्ता एक देश म्हणून कमी दरातली मागणी नोंदवली किंवा खरेदी केली तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. दुसरा मुद्दा हा की, आपण एक देश म्हणून कोणत्या दराने तेल घेतो आणि तेल कंपन्या ते कोणत्या दराने लोकांना विकतात याबाबत आपल्या देशात बरीच तफावत आहे. जागतिक बाजारात तेलाचे भाव कमी झाल्यानंतर आपण फार वेगाने तेलाचे भाव कमी केलेले नाहीत. आपण तेलाचे साठे करून ठेवतोय असं म्हटलंय. गेल्या 32 दिवसांत आपण तेलाचे दर वाढवलेले नाहीत. त्यामुळे सरकारला कमी दराने तेल मिळू शकण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्या देशात सर्वसामान्य वैयक्तिक ग्राहक किंवा औद्योगिक उत्पादन करणार्‍या कंपन्यांना याचे लाभ मिळू शकतील असं नाही. आज पेट्रोलपंपांवर गाड्यांच्या रांगा नाहीत. मात्र, पुढच्या काळात पेट्रोलपंपावर कमी दराने इंधन मिळेल का, हा खरा प्रश्‍न आहे.

असंच काहीसं औद्योगिक क्षेत्रातल्या ग्राहकांबद्दल म्हणता येईल. त्यामुळे म्हटलं तर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होणं हे सुचिन्ह आहे, पण प्रत्यक्षात ते किती वेगाने आणि किती प्रमाणात अमलात येतं, यावर बरंच काही अवलंबून असेल. दुसरं म्हणजे फक्त कमी दराने तेल मिळतंय म्हणून कोणताही उद्योजक ते खरेदी करणार नाही. त्याला उत्पादनासाठी कच्च्या तेलाची गरज लागते. उद्योजक तेलाचा साठा करून ठेऊ शकणार नाहीत. उत्पादनवाढीच्या वेगावर तेलाची मागणी अवलंबून असेल. सुरुवातीच्या काळात हे करण्यासाठी आपल्याला लॉजिस्टिक्स म्हणजे वाहतूक व्यवस्थेची गरज पडणार आहे. कच्च्या किंवा पक्क्या मालाच्या वाहतुकीसाठी लॉजिस्टिक्सची गरज लागेल. त्यामुळे लॉजिस्टिक्स उद्योगाला कमी दराने तेल मिळालं, किंबहुना सरकारने ते कमी दराने दिलं तर त्यांचा फायदा होईल आणि त्याचे लाभ सर्वसामान्यांना मिळू शकतील. पण त्यातही किंतू-परंतु आहेतच... 

 

अवश्य वाचा