Wednesday, December 02, 2020 | 03:07 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

मोफत लसीचे गाजर
रायगड
23-Oct-2020 07:15 PM

रायगड

बिहार निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे तेथील सत्तेचा संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. सुरुवातीला भाजपाने अशी हवा निर्माण केली की आपल्याच हाती शंभर टक्के सत्ता येणार व आपल्याला विरोधच नाही. परंतु जशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी सत्ताधारी व विरोधक यांच्यात कडवा संघर्ष होणार असे दिसू लागले आहे. विरोधी पक्षांच्या युतीचे नेते व लालू पुञ तेजस्वी यादव यांचे पारडे आता जड होऊ लागल्यावर बिहारमधील सत्ताधाऱयांची हवा निघू लागली आहे. त्यातून लोकांना अवास्तव आश्‍वासने देणे हा एक सत्ताधार्‍यांचा हुकमी एक्का ठरतो. बिहारमध्ये भाजपाने आपला निवडणूक जाहिरनामा प्रसिध्द केला आणि त्यातून दिलेल्या आश्‍वासनाने एकच गोंधळ माजला. तसे होणे स्वाभाविकच होते. कारण भाजपाने पुन्हा सत्तेत आल्यास कोरोनावरील लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. अर्थात ही घोषणा म्हणजे मतदारांना दिलेली एक मोठी लाचच आहे असे म्हणता येईल. म्हणजे भाजपाला  मत द्या तरच मोफत लस मिळेल अशी छुपी धमकावणीही त्यात आहे. अशा प्रकारच्या घोषणेतून आपल्याकडील राजकारणी सत्ता मिळविण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे आपल्याला दिसते. केंद्र सरकारने लशीच्या संदर्भात एक जुजबी धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, डॉक्टर, आरोग्यसेवक, जवान यांना सर्वात प्रथम लस उपलब्ध करुन दिली जाईल. त्यानंतर टप्प्यात अन्य नागरिकांना दिली जाईल. अर्थात ही लस मोफत दिली जाईल का? व कोणत्या राज्याला प्राधान्याने दिली जाईल त्या संबंधीचे ठोस धोरण काही जाहीर झालेले नाही. त्यामुळे बिहारला भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लस मोफत मिळेल व सत्तेत न आल्यास मोफत मिळणार नाही हे उघड आहे. अशा प्रकारे भाजपा बिगर भाजपा सत्ता असलेल्या राज्यावर अन्याय करणार हे उघड झाले आहे. त्यामुळे ही घोषणा आक्षेपार्ह आहे. याला सर्वच विरोधी पक्षांनी विरोध केला आहे व निवडणूक आयोगानेही याला आक्षेप  घेतला पाहिजे. परंतु निवडणूक आयोग हा सत्ताधार्‍यांच्या हातातील बाहुले झालेले असल्याने ते काही आक्षेप घेणार नाहीत. केंद्र सरकारने लस बाजारात येण्याअगोदर आपली यासंबंधीची भूमिका व धोरण स्पष्ट केले पाहिजे. एक तर ही लस सर्व जनतेला मोफत देणे सरकारला परवडणारे नाही. ज्यांची आर्थिक कुवत नाही अशांना मोफत देणे त्यासाठी योग्य ठरेल. अंबानींना पासून सर्वात गरीबाला लस मोफत देण्याची काही गरज नाही. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देऊन आपण फार काही मोठे साध्य करु असे नाही. त्यासाठी गरीबानांच मोफत लस द्यावी. त्याचबरोबर ज्या राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत तसेच ज्या राज्यात कोरोनाने जास्त मृत्यू झाले आहेत त्या राज्यांना लस देताना प्राधान्य दिले गेले पाहिजे. तसेच जी राज्ये पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत उदा. केरळ, गोवा त्या राज्यातील जनतेलाही प्राधान्य दिले पाहिजे. कारण अशा भागात पर्यटन सुरु झाल्यास कोरोनाला नियंञणात ठेवणे गरजेचे ठरणार आहे. त्याबरोबर आपल्याला सर्व जनतेला मोफत द्यायची झाली किंवा 70 टक्के गरीब जनतेला द्यायची झाली तर किती खर्च येईल याची काही आखणी सरकारने अद्याप केलेली नाही. प्रत्येक लस हजार ते दीड हजार रुपयाच्या दरम्यान पडली तरी त्याचा देशाच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा सरकारने विचार केला आहे का? बिहारच्या सुमारे 12 कोटी जनतेला मोफत लस द्यायची झाली तरी किती खर्च करावा लागेल याचा विचार भाजपाने केला आहे का? बिहारची ही लोकसंख्या म्हणजे अर्ध्या युरोपाच्या लोकसंख्येवढी आहे. बिहारची जनता अशिक्षित आहे त्यांना काही आश्‍वासन दिले तरी चालेल व ते भूलून आपल्याला मतदान करतील असा भाजपाचा अंदाज आहे. त्यांचा हा अंदाज  चुकण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण गेल्यावेळी पाच वर्षापूर्वी मोदींनी निवडणूक प्रचारात भरघोस आश्‍वासने दिली होती. त्यातल्या एकाही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यावेळी लालू व नितीशकुमार हे एकञ लढले होते. या दोघांनी मोदींच्या या घोषणांची टिंगल टवाळी केली होती. माञ नंतर सत्ता आल्यावर एका वर्षाच्या आतच नितीश यांनी लालूंची साथ सोडली व भाजपाबरोबर गेले. माञ त्यांनी भाजपासोबत जाऊनही त्याचा फायदा काही बिहारला करुन दिला नाही. मोदींनी जी आश्‍वासने गेल्या निवडणुकीत दिली होती त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी नितिश कुमारांवर होती. शेवटी बिहारच्या नशिबी गरीबी, बेकारी व स्थलांतरीतांचे जीणे आले. आता लशीच्या बाबतीतही असेच होणार आहे. अजून लस कधी तयार होईल व तिचे देशात वितरण कधी होईल याचा ठोस पता नसताना मोफत देण्याचे आश्‍वासन देणे म्हणजे हा निवडणुकीसाठी जनतेला गाजर दाखवून आता त्यांची मते पदरात पाडून घेण्याचा प्रकार आहे. लॉकडाऊनमध्ये बिहारी स्थलांतरीत मजुरांचे जे हाल झाले त्याविषयी बिहारमधील सत्ताधार्‍यांनी जनतेची अगोदर माफी मागावी. तसेच गेल्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांची किती पूर्तता झाली याचा हिशेब दाखवूनच नंतरच अशा प्रकारच्या मोफत लशीची गाजरे दाखवावीत. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top