मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात मुंबई लोकल लगेचच सुरु करणे शक्य नाही, तसेच शैक्षणिक संस्थाही लवकर सुरु होणार नसल्याचे सुतोवाच केले आहे. मुंबईतील मेट्रोची कारशेड आरे कॉलनीतून कांजूरमार्गला हलविणार असल्याचीही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणा स्वागतार्ह आहेत. कोरोनावर अजून अपेक्षित नियंत्रण आलेले नाही. त्यामुळे मंदिरे व धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था व मुंबईची लोकल सुरु करणे धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे जनतेच्या प्रेमापोटीचा हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते खरेच आहे. कारण, जूनपासून लॉकडाऊन सुरु झाल्यापासून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जी गर्दीची ठिकाणे नाहीत, ती सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही; परंतु लोकांना आता सर्व खुले करावे, असे वाटू लागले आहे. गणपती उत्सव सरकारने निर्बंध घालून साजरा कपण्यास परवानगी दिली होती. अनेकांनी ते निर्बंध पाळण्याचा जरुर प्रयत्न केला; परंतु गणपतीत उत्साहाच्या भरात मर्यादा सोडल्या गेल्या. त्यामुळे गणपती उत्सवानंतर कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढले. सरकार अनेक नियम करते, ते जनतेच्या हिताचेच असतात; परंतु ते नियम पाळणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना दंडुका वापरण्याची वेळ येता कामा नये. जनतेने सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन जबाबदारपणाने वागण्याची हीच वेळ आहे. तसे न केल्यास त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. गुजरात सरकारने दांडियावर यावेळी अधिकृतरित्या बंदी घातली आहे. मात्र, राज्य सरकारने दांडिया खेळू नका, नवरात्रींच्या काळात गर्दी करु नका, असे आवाहन केले आहे. आता जनतेनेच समजूतदारपणा दाखवून नवरात्रीच्या काळात घरात बसले पाहिजे, अन्यथा सध्या कोरोना आटोक्यात येण्याची जी चिन्हे दिसत आहेत, त्याला आळा बसेल. कोरोना लगेचच आटोक्यात येणार नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला सावधानतेने करावी लागणार आहे. कोरोनावरील लस बाजारात यायला अजूनही तीन-चार महिने लागतील, असा अंदाज आहे. लस आली तरी ती किती प्रभावी असेल, ते आता सांगता येत नाही. अशा स्थितीत प्रत्येकाने जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. राज्यातील बहुतांशी क्षेत्रे आता खुली झाली आहेत. त्यात समाधान मानून पुढे वाटचाल करावी लागणार आहे. सध्या राज्यातील कोरोनाचे प्रमाण घसरत चालले आहे. कोरोनावर मात करणारे रोज वाढत आहेत, ही मोठी समाधानाची बाब असली तरीही मृतांचे प्रमाण घसरत नाही, ही चिंतेची बाब आहे. यावर मात करण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला पाहिजे. विरोधकांनी जनतेला भडकविण्यासाठी धार्मिक स्थळे सुरु करण्याचा आग्रह धरला. त्यामागे केवळ सत्ताधार्‍यांना अडचणीत आणणे व लोकांना भडकाविणे, हा हेतू होता. परंतु, जनतेने विरोधकांना सुनाविण्याची वेळ आता आली आहे. सध्या मंदिरातील देवाची पूजा करण्याऐवजी घरच्या देवाला नमस्कार करु, असे जनतेने सांगितले पाहिजे. लोकलच्या बाबतीतही असेच आहे. मुंबईची लोकल सुरु झाली तरच या महानगरीचे जीवन खर्‍या अर्थाने सुरु होईल, हे सत्य असले, तरीही लोकलमधील गर्दी कोरोना मोठ्या प्रमाणात पसरविण्यास हातभार लावणार आहे. कोरोनापूर्वी दररोज 50 लाख लोकांची, म्हणजे जवळपास अर्ध्या मुंबईची वाहतूक लोकलद्वारे होत होती. जर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली, तर कोरोना किती झपाट्याने मुंबईत पसरेल, याचा विचार करता येत नाही. त्यामुळे लोकल सध्या सुरु करणे धोकादायक आहे. शैक्षणिक संस्थांच्या बाबतीतही तसेच आहे. मुलांना ठराविक अंतरावर राहा, असे सांगूनही ती राहणार नाहीत. त्यामुळे मुलांच्या आयुष्याशी खेळण्यात अर्थ नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्था एवढ्यात सुरु करणार नाही, ही सरकारची भूमिका पटण्याजोगी आहे. राज्य सरकारने आरेचे वन संरक्षण करण्यासाठी तेथील नियोजित मेट्रो कारशेडचे स्थलांतर कांजूर मार्ग येथे करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने स्वागत केले आहे. खरे तर, फडणवीस सरकारच्या काळातच समितीने कांजूर हेच ठिकाण निश्‍चित केले होते. परंतु, फडणवीस सरकारने ही सूचना डावलून आरेच्या जंगलावर अतिक्रमण केले होते. त्यासाठी रातोरात जंगलातील झाडे कापून ही जमीन सपाट करण्यात आली होती. याला शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी पर्यावरवाद्यांना पाठिंबा दिला होता व त्यावेळी शिवसेनेचे सरकार आल्यास हे रद्द करण्याचे आश्‍वासन दिले होते. अखेर या आश्‍वासनाची पूर्तता केली आहे. आरे कॉलनीतील संरक्षित वन ही मुंबईची फुफ्फुसे आहेत, ती संरक्षित केली तरच मुंबई वाचेल, अन्यथा मुंबईचा पर्यावरणाचा समतोल ढासळत जाईल. सध्या मुंबईतील काँक्रिटच्या जंगलाने या शहराला वेढले आहे. परंतु, शहरात ही काँक्रिटची जंगले टाळता येणार नाहीत, हे सत्य जेवढे आहे, तेवढेच सध्या येथे असलेल्या वनाचे संरक्षण करण्याची नितांत गरज आहे. तसे झाले तरच मुंबईचा पर्यावरण समतोल साधला जाईल.