कोकणासह बहुुतांशी राज्यातील भागात जोरदार पाऊस पडल्याने आता ओल्या दुष्काळाचे राज्यावर सावट निर्माण झाले आहे. परतीचा पाऊस आता सुरु झाला असून गेली काही वर्षे परतीचा पाऊस शेतकर्‍यांच्या हाताशी आलेले पिक हिरावून घेतो असा अनुभव आहे. रायगड जिल्ह्यात चार दिवस झालेल्या तुफान पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती ही गेल्या काही वर्षात परवडेनाशी झाली आहे. त्यातच अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांच्या नैराश्यात भर पडते. सरकारने आता पुढे येऊन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षात निसर्गाचे हे चक्र असेच काहीसे विचिञ झाले आहे. एक तर पावसाचे चक्र आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यात गेल्या काही वर्षात पाऊस येताना वेळेत म्हणजे जून महिन्यात आला तरी लगेचच तो महिनाभराची विश्रांती घेतो व जुलैपासून जोरदार पडायला सुरुवात होते. त्यामुळे अनेकदा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट येते. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी पेरणी करतो परंतु पावसाने त्याला चकवा दिल्याने लावलेले बियाणे पाण्याअभावी करपते. शेवटी पुन्हा पाऊस सुरु झाल्यावर दुबार पेरणी करण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय रहात नाही. अशा स्थितीत पिक चांगले हाताशी आल्यावर शेवटी जाणारा पाऊस धो-धो बरसतो व आलेले पिक हातचे निघून जाते अशी स्थिती आहे. यंदा देखील गेल्या चार दिवसात आलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. या पावसाने कोकणासह राज्यातील काही भागात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. सरकारने लगेचच त्याची पाहणी करुन पंचनाम्याचे काम हाती घेऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. कोरोनामुळे एकतर ग्रामीण भागाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना शेतकर्‍यावर हे नवीन संकट कोसळले आहे. यंदा पाऊस चांगला पडल्याने कोकणातील भाताचे पिक चांगलेच तरारले होते. त्यामुळे सुखावलेल्या बळीराजाच्या आनंदावर या पावसाने पाणी टाकले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाला आहे. त्यातील सिंधुदुर्ग जिल्यात तर सरासरी पेक्षा 1300 मि.मि. जादा पाऊस पडला आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातही सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस आहे. हवामान खात्याने आता परतीचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे असे जाहीर केले होते. परंतु आता परतीचा नव्हे तर मोसमी पाऊस आठ दिवस पडेल असे जाहीर केले आहे. गेले दोन दिवस ज्या प्रकारे पावसाने थैमान मांडले आहे ते पाहता ओला दुष्काळ सरकारला जाहीर करावा लागेल असेच दिसते आहे. यंदाचे वर्ष हे शेतकर्‍यांसाठी तसेच आम जनतेसाठी मोठे कसोटीचेच दिसत आहे. कोरोनाच्या संकटाने तर संपूर्ण जगाला घेरले आहे. पाऊस सुरु होत असतानाच कोकणाच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळ धडकले व शेतकरी यात उध्वस्थ झाला. यात शेतकर्‍याच्या उभ्या बागा आडव्या झाल्याने वर्षानुवर्षाची मेहनत मातीमोल झाली. माड बागायतींना मोठे नुकसान सोसावे लागले. सिंधुदुर्गपेक्षा रायगड व रत्नागिरी येथील शेतकर्‍यांचे या चक्रीवादळात मोठे नुकसान झाले. सरकारकडे बागायतदार शेतकरी मोठ्या आशेने डोळा लावून होता परंतु सरकारने तोंडाला पानेच पुसली. राज्य सरकारने फारशी मदत दिली नाही तर केंद्राची टीम फक्त पहाणी करुन गेली. त्यांच्याकडूनही काडीमाञ मदत काही झाली नाही. जाहीर झालेली नुकसानभरपाई नाममाञच होती. त्यामुळे झाड निहाय नुकसान भरपाई देण्याची मागणी झाली. परंतु झाड निहाय झालेली नुकसानभरपाई पाहता सरकारने त्यांची थट्टाच केली असे म्हणावे लागेल. चक्रिवादळातून सावरत असतानाच कोरोनाचे कोकणातील संकट  अधिकच गहिरे झाले व शेतकर्‍याची परिस्थिती आणखी खालावली. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परंतु यंदा चांगला पाऊस झाल्याने झालेले नुकसान शेतीतून भरुन निघेल असे वाटले होते, परंतु जाणार्‍या पावसाने घोळ केला व मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. तळ कोकणातील दोन जिल्ह्यात भात पिकाचेच 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. ऑक्टोबर महिन्यात कोकणात फारच क्वचित पाऊस पडतो, यंदा माञ ऑक्टोबर महिन्यात जुलै महिन्यासारखा पाऊस कोसळला आहे. आता भाताचे उभे पिक आडवे झाल्यावर खायचे काय असा प्रश्‍न या शेतकर्‍यांना पडला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी केली असली तरी सरकारच्या या आश्‍वासनांवर शेतकर्‍यांचा विश्‍वास नाही. कारण यापूर्वी अशा प्रकारे नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करुनही शेतकर्‍यांच्या हातात फारसे काही पडलेेेले नाही. त्यामुळे सरकारवर कोकणातील शेतकर्‍यांचा विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याअगोदरच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसानीचे पंचनामे करावेत. त्यानंतर तातडीने म्हणजे दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई हातात पडावी यासाठी प्रयत्न करावेत. 

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त