Monday, March 08, 2021 | 08:29 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!
रायगड
14-Jan-2021 06:55 PM

रायगड

   काही वर्षांपूर्वी चालकविरहीत मेट्रो असं कुणी म्हणालं असतं, तर कुणीच विश्‍वास ठेवला नसता; किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं; परंतु एका दशकापूर्वी जगात चालकविरहीत ट्रेनची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. भारतही त्यात मागे राहिलेला नाही. आता भारतातली पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो दिल्लीच्या 38 किलोमीटर अंतराच्या मजेंटा लाईनवर धावण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीतल्या मेट्रोचं जाळं 390 किलोमीटर परिसरावर पसरलं आहे. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद अशा शहरांनाही हे जाळं जोडतं. दिल्ली मेट्रो ही देशातली सर्वात मोठी मेट्रोसेवा आहे. 24 सप्टेंबर 2002 रोजी शाहदरा ते तीस हजारी स्थानकादरम्यान 8.4 किलोमीटरच्या मार्गावर पहिली मेट्रो धावली. 2002 नंतर दिल्ली मेट्रोमध्ये अनेक बदल झाले. ड्रायव्हरलेस मेट्रो आणण्यासाठी मेट्रो रेल्वेज जनरल रुल्स 2020 मध्येही बदल करण्यात आले. यापूर्वी या नियमानुसार चालकाविना मेट्रो चालवण्याची परवानगी नव्हती.

मजेंटा लाईन दिल्लीतल्या जनकपुरी पश्‍चिम आणि नोएडामधल्या बोटॅनिकल गार्डनला जोडते. या लाईनवर पहिल्यांदा ड्रायव्हरलेस मेट्रोची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालकविरहीत रेल्वेला हिरवा कंदिल दाखवला. पिंक लाईन (मजलिस पार्क ते शिव विहार) वर 2021 पर्यंत ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू करण्याची योजना आहे. डीएमआरसीनं दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ट्रेन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून म्हणजेच ऑपरेशन रुममधून नियंत्रित केल्या जातील. या केंद्राला ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर अर्थात ओसीसी असं म्हटलं जातं. अभियंत्यांचा गट ट्रेनच्या रिअल टाईम वाटचालीवर नियंत्रण ठेवेल. विमानांच्या वाहतुकीसाठी एअर ट्रॅॅफिक कंट्रोल असतं, तशा पद्धतीनं याचं काम चालेल. डीएमआरसीकडे सद्यस्थितीत तीन ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर आहेत- दोन मेट्रो मुख्यालयात तर एक शास्त्री सेंटर इथे. कोणत्या लाईनवर ट्रेनची वाहतूक सुरू आहे यावर ड्रायव्हर किंवा ट्रेन ऑपरेटर यांच्याकडे किती नियंत्रण आहे हे अवलंबून असतं. जुन्या मार्गावर ट्रेनचा वेग तसंच दरवाजे उघडणं, बंद होणं हे ड्रायव्हरच्या हाती असतं. ठराविक वेगापेक्षा जास्त वेगाने ते ट्रेन चालवू शकत नाहीत.

नव्याने सुरु झालेल्या मार्गिकांवर ड्रायव्हर ट्रेन चालवण्याची कमांड देतात. या मार्गांवर ऑटोमॅटिक कंट्रोल बंद करण्यात येतो; जेणेकरून ड्रायव्हर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहील. 28 डिसेंबरपासून मजेंटा मार्गावरील मेट्रो ड्रायव्हरविना चालवल्या जाण्यास सुरुवात झाली आहे. यालाच तांत्रिक भाषेत ड्रायव्हरलेस ट्रेन ऑपरेशन (डीटीओ) म्हटलं जातं. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना ट्रेन चालवली जाऊ शकते. डीएमआरसीच्या तीन कमांड केंद्रांच्या माध्यमातून हे काम केलं जाईल. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग तंत्र ट्रेनची ये-जा तसंच तांत्रिक बिघाडाप्रसंगी दुरुस्ती करू शकतो. एखादं हार्डवेअर बदलण्याच्या वेळेस मात्र मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता असेल. ड्रायव्हरलेस ट्रेन हा तांत्रिकतेचा एक मापदंड असतो; ज्याला ग्रेड्स ऑफ ऑटोमेशन (जीओए) म्हटलं जातं. जीओए 1 प्रकारात ड्रायव्हर ट्रेनचं सारथ्य करतो. जीओए 2 आणि जीओए 3 नुसार ड्रायव्हरची भूमिका दरवाजे उघडणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनचं नियंत्रण स्वत:कडे घेणं एवढ्यापुरती मर्यादित असते. ट्रेन चालू होणं आणि थांबणं स्वयंचलित पद्धतीने होतं. जीओए 4 मध्ये ट्रेनचं सगळं परिचालन स्वयंचलित पद्धतीने होतं.2017 पासून डीएमआरसीकडे ही प्रणाली आहे; मात्र ही प्रणाली कार्यान्वित करण्यापूर्वी कठोर परीक्षण करण्यात आलं. या प्रणालीची सुरुवात मे 2020 मध्येच होणार होती; मात्र कोरोना टाळेबंदीमुळे तेव्हा हे संक्रमण स्थगित करण्यात आलं. 

डीएमआरसीच्या मते, मेट्रो सर्वस्वी मानवी हस्तक्षेपाविना सुरू होण्याआधीच अनेक कामं स्वयंचलित पद्धतीने होत होती. हाय रिझोल्यूशन कॅमेरे लावले असल्यानं केबिनच्या माध्यमातून ट्रॅकवर देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही. नव्या प्रणालीनुसार, ट्रेन आणि ट्रेनच्या डोक्यावरच्या विजेचा पुरवठा करणार्‍या तारा यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल. आपत्कालीन स्थितीमध्ये तातडीने उपाययोजना केली जाईल. कमांड सेंटरमधून संपूर्ण मार्ग सुस्पष्टपणे दिसायला हवा आणि ट्रेनवर लावण्यात आलेले कॅमेरे आर्द्रता, धुकं यापासून मुक्त राहायला हवेत, असे या ट्रेनच्या वाहतुकीसंदर्भातले निर्देश आहेत. ड्रायव्हरलेस मेट्रोच्या वाहतुकीचं निरीक्षण आणि परीक्षणासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. डीएमआरसीकडून ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू झाल्यानंतर कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांना यासंदर्भात अहवाल देण्यात येईल. कमांड सेंटर या ठिकाणी इन्फॉर्मेशन कंट्रोलर अर्थात माहिती नियंत्रक असतील. प्रवासी आणि गर्दी यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम ते करतील. 

ट्रेनशी निगडीत अन्य माहिती तसंच सीसीटीव्हीचं नियमित परीक्षण केलं जाईल. डीएमआरसी संपूर्णत: युटीओ प्रणाली अंगीकारत नाही, तोपर्यंत या मार्गावरील ट्रेनमध्ये प्रशिक्षित मेट्रो ऑपरेटर असेल. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तो परिस्थिती हाताळेल. मेट्रोतली प्रत्येक गोष्ट टिपणारे कॅमेरे काम सुरू करतील तेव्हा ड्रायव्हर नसतील. काही काळानंतर ड्रायव्हरची केबिन आणि कंट्रोल पॅनेलही नसेल. सध्याच्या मेट्रो ट्रेनमध्ये सुरुवातीला आणि शेवटी ड्रायव्हरची केबिन असते. आता लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांमुळे ट्रॅकवर गडबड झाल्यास टिपली जाऊ शकत नाही. ट्रॅकचं फुटेज रिअल टाईममध्ये कमांड सेंटरला बघता यावं यासाठी काही बदल करण्यात येतील.

ड्रायव्हरलेस मेट्रोची तीन प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. तिची यंत्रणा इतकी सुरक्षित आहे की दोन मेट्रो एकाच मार्गावर आल्यास आपोआप काही अंतरावर थांबतील. ड्रायव्हरलेस ट्रेनमध्ये धक्के बसत नाहीत. ट्रेनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ड्रायव्हरलेस मेट्रोचा प्रवास संचार आधारित ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टीम (सीबीटीसी) ने सुसज्ज आहे. ही प्रणाली वाय-फायप्रमाणे कार्य करते. ही यंत्रणा मेट्रोला सिग्नल देते, त्यातून ती ऑपरेट होते. सिग्नल मिळाल्यानंतर रिसिव्हर्स मेट्रो ट्रेन पुढे नेतात. परदेशात अनेक महानगरांमध्ये ही प्रणाली वापरली जाते. जगातल्या 46 शहरांमध्ये स्वयंचलित मेट्रो गाड्या धावतात. द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट (यूआयटीपी) च्या म्हणण्यानुसार 2019 पर्यंत जगातल्या 46 शहरांमध्ये 64 स्वयंचलित मेट्रो गाड्या धावत आहेत. जगातली पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो 2011 मध्ये जपानच्या कोब सिटीमध्ये सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतातली पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू केली. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top