Thursday, January 21, 2021 | 01:24 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

कोरोना उतरणीला?
रायगड
02-Dec-2020 05:07 PM

रायगड

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे, ही सर्वात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे लागलेले ग्रहण आता सुटायला लागले आहे, असे सध्या तरी दिसत आहे. मात्र त्यामुळे हुरळून जाता कामा नये कारण कदाचित दुसरी लाट येण्यापूर्वीची ही नांदी तर नव्हे, अशी शंका येऊ शकते. कारण आजवर तज्ज्ञांचे जे अंदाज व्यक्त झाले होते त्यानुसार, दुसरी लाट ही अटळ आहे व त्याची सुरुवात युरोप व अमेरिकेत झाली आहे. आपल्याकडे अजूनही दुसरी लाट येणारच नाही असे अंदाज बांधून निर्धास्त राहणे चुकीचे ठरेल. जोपर्यंत कोरोनाची लस बाजारात येत नाही व तिचे लसीकरण सर्वांना होत नाही तोपर्यंत कोरोनाचा धोका संपला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सर्व राज्य सरकारने कोरोनाची संभाव्य लाट येऊ शकते असा अंदाज बांधून रुग्णसेवेची सर्व तयारी करुन ठेवली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रुग्णसंख्या घटल्याने जी कोव्हिड सेंटर्स उभारली होती ती आता ओस पडू लागली आहेत. मात्र ती बंद करण्याचे धाडस सरकार करीत नाही. कदाचित पुन्हा लाट आली तर, कोव्हिड सेंटरची गरज पडेल हे लक्षात घेऊन ती बंद केलेली नाहीत. राज्य सरकारचे हे धोरण योग्यच आहे. रुग्णसंख्या कमी झाली म्हणून निर्धास्त होण्याची अजून वेळ आलेली नाही. उलट सध्याच्या घसरणीनंतर दुसरी लाट येऊ नये यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपल्याकडे मात्र कोरोनाची घसरण सुरु झाल्याचे आकडेवारी सांगते. 11 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात रुग्णवाढीचा वेग 7.15 टक्क्यावरुन 6.69 टक्क्यांवर घसरला आहे. हे सर्व प्रमाण जगातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता खूपच कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणार्‍यांची संख्या जास्त होती. कोरोनाच्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांचे प्रमाण 4.60 टक्क्यांवर घसरले आहे. संपर्ण देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी आपल्याकडे दररोज 90 हजारांच्या घरात रुग्ण आढळत होते. ती संख्या आता 31 हजारांवर आली आहे. एकूणच हे चित्र समाधानकारक आहे. अर्थात हे कशामुळे झाले, हा एक प्रश्‍नच सर्वांसमोर आहे. एकूणच देशातील बहुसंख्य जनतेला कोरोना होऊन गेला असावा. कारण आपल्याकडे कोरोनाच्या चाचण्या फारशा होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची तपासणी होत नाही, आपल्याकडील लोकसंख्येचा विचार करता तशी तपासणी करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे जे संशयीत आहेत त्यांचीच तपासणी केली जात आहे. असे असले तरीही आपल्याकडे बहुतांशी लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील काही संस्थांनी जी पहाणी केली होती त्यात त्यांच्या अंदाजानुसार, डिसेंबरपर्यंत मुंबईकरांची सामुहिक प्रतिकारशक्ती वाढेल असा होता. मुंबईतील झोपडपट्टीतील रहिवाशांची प्रतिकारशक्ती लवकर वाढली होती व त्यातुलनेत इमारतीत राहण्यार्‍यांची प्रतिकारशक्ती कमी वाढली होती. मुंबईतील हा सॅम्पल सर्व्हे प्रमाणे देशातील चित्रही पालटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना कमी होण्याचे नेमके कारण लवकरच आपल्याला समजेल. कोरोनाची साखळी तोडण्यात जर यश आले तर, सर्वांनाच लस देण्याची काही गरज नाही असे महत्त्वाचे विधान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष बलराज भार्गव यांनी म्हटले आहे. त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ लसीकरण आवश्यक असणारच आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडली गेली तर कोरोनावर आपण खर्‍या अर्थाने विजय मिळवू शकतो व अशा स्थितीत आपल्याला लस प्रत्येकाला देण्याची गरज भासेल असेही नाही. त्यामुळे लसीकरणापेक्षा कोरोना विषाणूची साखळी तोडणे फार महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसात बहुतांशी क्षेत्रे सरकारने खुली केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे हे मात्र निश्‍चित. कोरोनामुळे आलेली अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली गेल्यामुळे नोव्हेंबरमधील जी.एस.टी.द्वारे जमा झालेले करसंकलन एक लाख कोटींच्यावर पोहोचले आहे. एप्रिलमध्ये लॉकडाऊन सुरु झाल्यावर हेच करसंकलन 32 हजार कोटींवर घसरले होते. त्यामुळे आता कर संकलनाचे प्रमाण आता कोरोनापूर्व स्थितीला येऊन ठेपले आहे. अर्थात आपल्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या पूर्वीपासूनच ग्रहण लागले होते. अर्थव्यवस्थेची घसरण कोरोनापूर्वी पासूनच होत होती. मात्र कोरोनाचे निमित्त झाले व अर्थव्यवस्थेला घसरणीचे एक सबळ कारण मिळाले. आता केंद्र सरकारच्या तिजोरीत जी.एस.टी.च्या रुपाने पैसा चांगला जमा होऊ लागला आहे. त्यामुळे विविध राज्यांचे जे त्यांनी करोडो रुपये थकवून ठेवले आहेत ते देण्यास सुरुवात करण्याची गरज आहे. त्यात कोणताही राजकीय आकस ठेऊन न वागणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यांना मोठा खर्च झाला आहे व त्यासाठी त्यांना पैसा उपलब्ध करुन देणे ही केंद्राची जबाबदारीच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आत पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही. उलट आता जास्त काम करुन आजवर झालेले नुकसान भरुन काढण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमध्ये ज्यांच्या नोकर्‍या गेल्या त्या पुन्हा मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. कोरोनातील नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने एक कार्यक्रम आखला पाहिजे. कोरोना उतरणीला लागला आहे ही चांगलीच बाब आहे. मात्र खबरदारी घेत आता पुढील काळात वाटचाल करावी लागणार आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top